भट्टाचार्य, कृष्णचंद्र : (१८७५-१९४९). आधुनिक कालातील ज्या अतिशय थोडया भारतीय तत्वचिंतकांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते, त्यांत कृष्णचंद्र भट्टाचार्य यांची अग्रक्रमाने गणना करावी लागेल. जन्म बंगालमधील सेरामपूर येथे एका गरीब कुटुंबात. बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी आपले उच्च शिक्षण संपादन केले व ते १८९८ मध्ये बंगालच्या शासकीय शिक्षण खात्यात तत्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. शेवटी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण झाल्यावर हुगळी कॉलेजच्या प्राचार्य पदावरुन ते सेवानिवृत्त झाले (१९३०). त्यानंतर दोन वर्षे कलकत्ता विद्यापिठाच्या पदव्युत्तर विभागात तत्वज्ञानाचे अध्यापन केल्यावर १९३३-३५ या काळात अमळनेरच्या ‘तत्वज्ञान मंदिरा’चे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यापुढील दोन वर्षे कलकत्ता विद्यापिठात पंचम जॉर्ज-तत्वज्ञान अध्यासन भूषवून १९३८ साली ते निवृत्त झाले व कलकत्त्या जवळील सेरामपूर येथील आपल्या घरी तत्वज्ञान विषयक लिखाण करीत व जिज्ञासूंशी तत्वचर्चा करीत उर्वरित आयुष्य त्यांनी घालविले.
‘मूरहेड लायब्ररी ऑफ फिलॉसॉफी’ या ग्रंथमालेतील डॉ. राधाकृष्णन यांनी संपादिलेल्या कंटेपोररी इंडियन फिलॉसॉफी या पुस्तकातील ‘द कन्सेप्ट ऑफ फिलॉसॉफी’ या भट्टाचार्यांच्या लेखात त्यांच्या तात्विक विचारांचे सार आले आहे. १९२९ साली त्यांनी अमळनेर येथे दिलेली व्याख्याने द सब्जेक्ट ॲज फ्रिडम या पुस्तकात संग्रहीत झालेली आहेत. हे त्यांचे पुस्तकही विशेष महत्वाचे आहे. त्यांचे एक पुत्र गोपीनाथ यांनी त्यांचे सर्व लिखाण कृष्णचंद्र भट्टाचार्य : स्टडीज इन फिलॉसॉफी (२ खंड-१९५६,५८) मध्ये संग्रहीत केलेले आहे.
स्वातंत्र्याने विलसत असणारे असीम चैतन्य हे सत्याचे स्वरुप होय. ज्याला आपण ‘मी’ अथवा ज्ञाता म्हणतो त्याचा, अखिल ज्ञेय विषयांच्या निराकरणद्वारा शोध घेऊ जाता, अखेर त्या स्वयंप्रकाश निरुपाधिक चैतन्यापाशी येऊन पोहोचतो, अशा रीतीने भट्टाचार्यांचा तात्विक विचार थोडक्यात सांगता येईल.
पण हा सिद्धांत तर अद्वैत वेदान्तावरील ग्रंथांतून फार पूर्वीच सांगून ठेवला गेला आहे. पण भट्टाचार्यांचे वैशिष्टय हे, की तो सांगण्यासाठी त्यांनी ग्रंथवचनांचा आधार न घेता स्वतःची अशी एक पद्धत निर्माण केली. त्या पद्धतीस ‘आध्यात्मिक अंर्तमुखता’ अथवा ‘अतीत-मानस पद्धती’ अशी नावे त्यांनी दिली आहेत. ती पद्धत मानसघटनाशास्त्रीय वा रुपविवेचनवादी (फिनॉमेनॉलॉजिकल) आहे असाही अभिप्राय मार्व्हिन फेबर यांसारख्या काही लेखकांनी दिला आहे.
कांटने म्हटले होते, की ज्ञातृतत्त्व अथवा ‘मी’ हा अनुभवाचा विषय होत नसला, तरी बुद्धी त्याचा विचार करु शकते. हे म्हणणे भट्टाचार्यांनी अमान्य केले. ‘मी’ हा विचारगम्य आहे असे म्हटल्यास त्यास ज्ञान-विषयत्व येते आणि मग ज्ञाता हे त्याचे स्वरुप संपून जाते. कोणत्याही ज्ञात विषयाच्या ठिकाणी ज्ञातता हा धर्म असतोच. ज्ञात अशा विषयापासून त्या धर्मास अलग करुन त्याचा मागोवा घेत गेल्यास ज्ञानाचा अ-विषय आहे अशा रीतीने ज्ञातृतत्वाचे अस्तित्व स्वानंद रुपाने समजते. ‘एन्जॉइंगली अंडरस्टूड’ असा शब्दप्रयोग भट्टाचार्य या ठिकाणी करतात. (मुळात हा प्रयोग स्पेस टाइम अँड डीइटी या पुस्तकात एस्. अलेक्झांडर यांनी केला आहे.) एखाद्या विषयापासून आनंद होऊ शकतो पण आनंदाचा काही विषय नसतानाही आनंदी असणे संभवते. त्याच रीतीने ज्ञानाचा विषय नसतानाही आनंदी असणे संभवते. त्याच रीतीने ज्ञानाचा विषय न होताही ज्ञात्याच्या अस्तित्वाचे भान होते. हे ज्ञातृतत्व ही वास्तवता होय. विषयांचा निरास करीत करीत तेथे पोहोचता येते. विषयांपासून मुक्तता या अर्थाने त्या वास्तवतेस स्वातंत्र्य येते म्हणता येते. पण अखेर विषयत्वच संपून जाते तेव्हा त्याचे प्रतियोगी असलेले ज्ञातृत्वही नाहीसे होते. जे उरते ते निरुपाधिक सत्य होय. (‘वास्तव’ आणि ‘सत्य’ यांत भट्टाचार्यांनी फरक केला आहे).
तत्वज्ञानात ज्या गोष्टींचे आपण व्यवस्थापन करतो त्यांच्या बाबतीत ‘वाणीने निर्देश केला जाणे’ हे आवश्यक आहे. मात्र वाणीने त्यांच्या अर्थाचे ज्ञापण होत नाही. ते व्यवस्थापन संकेतात्मक चिन्हांचे असते. विज्ञानाची गोष्ट याहून उलट आहे. विज्ञानातील आणि नित्याच्या व्यवहारातील विषयांच्या बाबतीत ‘वाणीने निर्देश करता येणे’ ही आगंतुक बाब आहे. कारण ऐंद्रिय संवेदनांच्या रुपाने यांचा आशय आधीच यथास्थित असतो. कल्पित कथांचा आशयही त्याच प्रकारचा असतो, पण विज्ञानातील विधानांवर विश्वास ठेवावा अशी जो अपेक्षा असते. ती कल्पित कथांच्या बाबतीत नसते-त्या खरेपणाचा दावा करीत नाहीत. पण तत्त्वज्ञानात ज्या पदार्थांचे प्रतिपादन केलेले असते. ते खरेपणाचा दावा करतात मात्र वाणीने निर्देश झाल्याविना त्या पदार्थांना स्वतःचा असा आशय नसतो. वाणी निर्देश करते तो स्वनिर्मित सांकेतिक चिन्हांचा.
जाणिवेत जे काही घडते राहते त्याच्याकडे अत्यंत अंतर्मुखतेने अवधान दिल्यास ज्यात जाणीव आणि तिचा विषय यांत भेदच नाही असे निखळ निरुपाधिक चैतन्य उरते. शरणागतीची परसीमा गाठून ज्यात अहंकाराचा विलोप झाला आहे अशा विशुद्घ धार्मिक अनुभवातही त्याचाच प्रत्यय येतो. हा अनुभव अनेक तऱ्हांनी येऊ शकतो. म्हणून एका धार्मिक अनुभवाच्या भूमीकेवर उभे राहून दुसऱ्या धर्माचे आलोचन करता येणार नाही. धर्मावरील टीका आणि तत्वज्ञानात्मक टीकासुद्धा, त्या त्या परंपरेच्या अंतर्गतच असू शकते. सत्य निरुपाधिकच असले, तरी ते पर्यायी स्वरुपात लभ्य होते. हा भट्टाचार्यांचा विचार नविन आहे. कृष्णचंद्राचे तृतीय पुत्र, विश्वभारती विद्यापिठाचे भूतपूर्व कुलगुरु, कालिदास भट्टाचार्य यांनी या विचाराचा विस्तार केलेला आहे.
संदर्भः 1. Dutta, D.M.Ed.The Chief Currents of Contemporary Philosophy,Calcutta, 1961.
2. Yale University,Journal,Review of Metaphysics,Vol.IX, No.
3. New Haven, March,1956.
दीक्षित, श्री. ह.
“