भगत, निरंजन : (१८ मे १९२६ — ). गांधीयुगानंतरच्या काळात गुजरातीत जे दोन अत्यंत तेजस्वी कवी झाले, त्यापैकी एक म्हणजे निरंजन भगत आणि दुसरे ⇨ राजेंद्र शाह (१९१३ – ). निरंजन भगतांचा जन्म अहमदाबाद येथे झाला. मुंबई विद्यापिठातून इंग्रजी घेऊन ते एम्.ए. झाले (१९५०) व नंतर अहमदाबाद येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले (१९५०). उत्तम प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक आहे. साहित्य ह्या गुजराती त्रैमासिकाचे ते काही काळ संपादक होते. १९७६ मध्ये पोरबंदर येथे भरलेल्या गुजराती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.
गांधीयुगाच्या आदर्शवादी व काही ना काही सिद्ध करण्याची भूमिका घेणाऱ्या कवितेपेक्षा या कवीची कविता सर्वस्वी वेगळी आहे. सौंदर्यनिष्ठा तसेच भाषा, लय, भावना, अलंकार, रचनापद्धती इ.बाबतीत ही कविता आधीच्या पिढीच्या कवितेहून सर्वस्वी वेगळी आहे. या दृष्टिने निरंजन भगत यांचा छंदोलय आणि राजेंद्र शाह यांचा ध्वनि हे काव्यसंग्रह नव्या युगाचे निदर्शक मानले जातात.
भगत हे लयीवर असामान्य प्रभुत्व असणारे कवी होत. त्यांनी पारंपारिक संस्कृत छंदातही काही रचना केली आहे तथापि त्यांच्या गीतांतून व भावकवितेतून वाचकांस झपाटून टाकणारी जी लय आहे, ती त्यांची स्वतःची अशी लय आहे. त्यांनी काही उत्कृष्ट सुनिते व मुक्तकेही लिहीली आहेत. रेखीव-कोरीव शब्दकळा, संपन्न लय व शब्दांचा काटेकोर वापर ही त्यांची काही वैशिष्टे.
प्रवाळद्वीप हा त्यांनी मुंबई महानगरावर लिहिलेल्या काहीकवितांचा गुच्छ असून त्यात ह्या महानगरीय सभ्यता-संस्कृतीचे मार्मिक चित्रण त्यांनी केले आहे. फ्रेंच कवी शार्ल बोदलेअर व रायनर रिल्के यांच्या काव्यातील उत्तम तत्वे त्यांनी आत्मसात केली असावीत, असे दिसते.
कवितांनू संगीत (१९५३) हा त्यांचा समीक्षापर लेखांचा संग्रह असून त्यात त्यांच्या काव्यविषयक सखोल व्यासंगांचा व चिंतनाचा प्रत्यय येतो. सौंदर्यवादी दृष्टीचे एक चिकित्सक समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे.
त्यांचे लेखन अल्प आहे; पण जे आहे ते फार मोलाचे आहे. जुन्या व नव्या पिढीतील काव्यसमीक्षकांत निरंजन भगतांबद्दल फार आदराचे स्थान आहे. काही इंग्रजी कवितांचाही त्यांनी गुजरातीत उत्तम अनुवाद केला आहे.
छंदोलय (१९४९), किन्नरी (१९५०), अल्पविराम (१९५४) आणि ३३ काव्यो (१९५८) हे त्यांचे आजवर प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह होत. नंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कवितांचा छंदोलयबृहत् (१९७४) हा संग्रह होय. १९८२ मध्ये त्यांनी मीरेच्या कवितेवर एक ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.
ब्रोकर, गुलाबदास (गु.); कालेलकर, ना. गो. (म.)