ब्वेनस एअरीझ: अर्जेंटिनाची राजधानी, प्रमुख बंदर व देशाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या २९,८५,००० (१९८० अंदाज). हे अटलांटिक महासागरापासून २७५ किमी. अंतरावर ला प्लाता नदीकाठी वसलेले आहे.
सोन्याच्या शोधार्थ निघालेल्या पेद्रो दे मेनदोसा याच्या नेतृत्वाखाली स्पॅनिशांनी १५३६ मध्ये येथे ‘न्यूएस्त्रा सेनोरा सांता मारीआ देल ब्वेन एअर’ या नावाची वसाहत स्थापन केली परंतु इंडियनांच्या हल्ल्यामुळे त्यांना ही जागा सोडून द्यावी लागली. १५८० मध्ये व्हान दे गाराई या स्पॅनिश सैनिकाने पुन्हा पहिल्या जागी कायम वसाहत केली. वसाहतीच्या मूळ नावावरूनच शहरास‘ब्वेनस एअरीझ’ हे नाव पडले असावे. त्यानंतरच्या सु. तीनशे वर्षांच्या काळात म्हणजे हा भाग स्वतंत्र होईपर्यंत (१८१६), या शहराचा इतिहास हा ब्रिटिश, स्पॅनिश व स्थानिक लोक यांच्या सत्तासंघर्षाचा आहे [→अर्जेंटिना]. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्वेनस एअरीझमधील केंद्रवादी व संघवादी लोकांत यादवी सुरू झाली. त्यामुळे १८८० मध्ये हे शहर केंद्रशासित करण्यात आले.
पहिल्या महायुद्धानंतर या शहरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्याचे दिसून येते. मांस डबाबंदीकरण हा येथील भरभराटलेला व्यवसाय असून, त्याशिवाय येथे तेलशुद्धीकरण, जहाजबांधणी, रसायने, कापड, तंबाखू पदार्थ, यंत्रसामग्री, विमाने, विद्युतसाहित्य इ. उद्योग विकास पावलेले आहेत. देशातील ४०% पेक्षा जास्त आयात व ३०% पेक्षा जास्त निर्यात येथून होते.
रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग व जलमार्ग यांनी होणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीने या शहरास महत्व आहे. हे पॅराग्वाय, बोलिव्हिया, चिली, अँडीयन सरोवर विभागाशी तसेच देशातील मोठमोठ्या शहरांशी लोहमार्गाने, तर ‘पॅन अमेरिकन हायवे’ द्वारा चिलीशी जोडलेले आहे. शहरात भुयारी लोहमार्गांचीही सोय आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे. या इतिहास प्रसिद्ध व सतत गजबजलेल्या बंदराच्या परिसरातील लोक स्वतःस ‘बंदराची रयत’ (पीपल्स ऑफ पोर्ट) समजतात.
देशाच्या विविध भागांतील लोकांचे येथे सतत आगमन होत राहिल्याने शहराच्या लोकसंख्येत वाढ होत गेलेली आहे. येथे स्पॅनिश व इटालियन लोकांचे प्रमाण जास्त असून इंग्रज, फ्रेंच, जर्मन, तुर्की, पोर्तुगीज इ. लोकही येथे आढळतात. शहराच्या महापौराची नियुक्ती राष्ट्राध्यक्षाकडून होते. नगरपरिषद व कार्यकारी मंडळ यांमार्फत तो शहराचा कारभार पाहतो. नगरपरिषदेचे ३० सदस्य चार वर्षांसाठी निवडले जातात. त्यांतील निम्मे दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.
येथील ब्वेनस एअरीझ विद्यापीठ (स्थापना १८२१) प्रसिद्ध असून शहरात आणखी आठ विद्यापीठे आहेत. काही विषयांच्या अकादमी व संशोधनसंस्थाही येथे असून राष्ट्रीय ग्रंथालयही आहे. येथे अर्जेंटिनातील प्रमुख शैक्षणिक संस्था, संशोधनसंस्था, संग्रहालये, ग्रंथालये असून राष्ट्रीय वाचनालय प्रसिद्ध आहे. शहरातील सु. ४० रंगमंदिरांपैकी ‘ट्रिएट्रो कोलोन ऑपेरा हाउस’ हे जगप्रसिद्ध असून ते बॅले आणि स्वरमेळ (सिंफनी) यांचे केंद्र आहे. येथील १६ संग्रहालयांपैकी ‘अर्जेंटाइन म्यूझीयम ऑफ नॅचरल सायन्सेस’ मध्ये जीवाश्मांचा समृद्ध संग्रह असून ‘नॅशनल म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्स’ जगप्रसिद्ध कलावंतांच्या तसेच अर्जेंटिनी चित्रकार व शिल्पकार यांच्या कलाकृती, तर ‘नॅशनल म्यूझीयम ऑफ डेकोरेटिव्ह आर्ट्स’ या संग्रहालयात चित्रजवनिका व पुरावस्तू आहेत. ‘म्यूझीयम ऑफ स्पॅनिश अमेरिकन आर्ट’ हे संग्रहालय पुरावस्तू व अनेक चांदीच्या वस्तूंच्या प्रतिकृती यांकरिता विख्यात आहे. येथे ४ दूरचित्रवाणी केंद्रे व १३ नभोवाणी केंद्रे तसेच अनेक चित्रपटगृहे आहेत.
शहराचा काही जुना भाग वगळता, एकूण नगररचना आधुनिक स्वरूपाची आहे. राजमार्ग, उपवने, भव्य इमारती, प्रेक्षणीय मूर्ती संग्रहालये, क्रीडांगणे इत्यादींनी हे शहर आकर्षक झाले आहे.
शहराच्या ‘कॅपिटल झोन’ या भागात अनेक शासकीय कार्यालये असून ‘प्लाझा दे मायो’ या चौकातील राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान उल्लेखनीय आहे. ‘९ जुलै’ (स्वातंत्र्यदिन) या अर्थाच्या नावाचा ४० मी. रुंदीचा रस्ता विशेष प्रसिद्ध आहे. शहरातील जॉर्ज वॉशिंग्टनचा पुतळा तसेच होसे दे सान मार्तीनची कबर, चर्च ऑफ सान ईग्नास्यो (१७२२), सान फ्रांथीस्को इ. चर्चवास्तू व अनेक उद्याने उल्लेखनीय आहेत.
शहाणे, मो. शा. गाडे, ना. स.
“