ब्राइटन : ग्रेट ब्रिटनच्या पूर्व ससेक्स परगण्यातील शहर. लोकसंख्या १,५२,००० (१९७९ अंदाज). हे लंडनच्या दक्षिणेस ८२ किमी. इंग्लिश खाडीवर वसलेले आहे. निसर्गरम्य परिसर, आल्हाददायक हवामान यांमुळे विश्रामधाम म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहे. १९७४ मध्ये हे पूर्व ससेक्स या परगण्याचा एक भाग बनले.

प्रारंभी हे एक लहानसे मच्छिमारी खेडे होते. डूम्झडे बुक (१०८६) या नोंदणी पुस्तकात ब्रिस्टलमेस्ट्यून असा त्याचा उल्लेख असून ब्राइन्स्टन (१३२४), ब्राइथमस्टन (१५१४) व ब्राइथेल्मस्टन (१८१६) या नावांनीही ओळखले जाई. रिचर्ड रसेल याने सागरी पाण्याच्या उपयोगासंबंधी अभ्यास करण्यासाठी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे यास विशेष प्रसिद्धी मिळाली. चौथा जॉर्ज प्रिन्स ऑफ वेल्स असताना त्याच्या येथील वास्तव्यामुळे शहराच्या विकासास गती मिळाली. त्याने येथे भारतीय पद्धतीचे परंतु अंतर्भागात चिनी पद्धतीने सुशोभित केलेले ‘रॉयल पॅव्हिल्यन’ बांधले. येथील सभागृह, संग्रहालय, कलावीथी इ. उल्लेखनीय आहेत. लोहमार्गाच्या सुविधांमुळे (१८४१) येथील विद्युतसाहित्य, यंत्रसामग्री, रंग, निर्वात यंत्रे, कातडी वस्तू, अन्नप्रक्रिया इ. उद्योगांच्या विकासास चालना मिळाली.

येथील रोडीन हे मुलींचे विद्यालय, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, ब्राइटन महाविद्यालय (१८४५) व ससेक्स विद्यापीठ (१९६१) इत्यादींमुळे एक शैक्षणिक केंद्र म्हणूनही ते महत्त्वाचे आहे. ब्राइटनचा सागरकिनाऱ्याचा परिसर राजमार्ग, भव्य हॉटेले, सुंदर पुळणी, मत्स्यालय (१९२७) इत्यादींमुळे आकर्षक बनलेला आहे. तसेच रॉयल थिएटर, बूथ बर्ड म्यूझीयम (१८९३), घोड्यांच्या शर्यतीची व इतर खेळांची क्रीडांगणे, सेंट निकोलस चर्च, सेंट जॉन्स रोमन कॅथलिक चर्च इत्यादींमुळे शहराची वेधकता वाढली आहे.

यार्दी, ह. व्यं. गाडे, ना. स.