ब्लूमफील्ड, मॉरिस : (२३ फेब्रुवारी १८५५ – १३ जून१९२८). थोर अमेरिकन भारतविद्यावंत. सध्या द. पोलंडमध्ये असलेल्या बीलिट्स शहरी जन्मला. १८५९ मध्ये ब्लूमफील्ड कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले. अमेरिकेतील शिकागो आणि फर्मन विद्यापीठांतून त्याने शिक्षण घेतले. १८७७ मध्ये एम्. ए. झाल्यानंतर तो येल विद्यापीठात प्रा. व्हिटनी यांच्या बौद्धिक मार्गदर्शनासाठी दाखल झाला. तेथून अधिछात्र म्हणून हॉपकिन्झ विद्यापीठात अधिछात्र असताना प्रा. लानमन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने डॉक्टरेट मिळविली (१७८९). पुढील दोन वर्षे बर्लिन व लाइपसिक येथे बेवर, ओल्डेनवर्ग आदी नामवंत भाषाशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तौलनिक व्याकरण आणि भाषाशास्त्र भारतीय, केल्टिक आणि स्लाव्हिक भाषाशास्त्र आदी विषयांत त्याने प्रावीण्य संपादिले. त्यानंतर हॉपकिन्झ विद्यापीठात संस्कृत आणि तौलनिक भाषाशास्त्र ह्या विषयांचे तो अध्यापन करू लागला.
ग्रंथ, शोधप्रबंध, निबंध, ग्रंथपरीक्षणे अशी त्याची विविध प्रकारची लेखन संपदा आहे. हिम्स ऑफ द अथर्ववेद (१८९७), सर्बरस द डॉग ऑफ हेडीझ (१९०५), ए वेदिक कनकॉर्डन्स (१९०६), द रिलिजन ऑफ द वेदाज (१९०८), ऋग्वेद रिपिटिशन्स (१९१६), द लाइफ अँड स्टोरीज ऑफ द जैन सेव्हियर पार्श्वनाथ (१९१९) ह्यांसारखे त्याचे ग्रंथ अभ्यासकांना आजही अपरिहार्य आणि मोलाचे वाटतात.
हॉपकिन्झ विद्यापीठाचा प्रतिनिधी ह्या नात्याने ब्लूमफील्ड तीन वेळा ‘इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटॅलिस्ट’ मध्ये उपस्थित राहिला (हँबर्ग १९०२, अल्जिअर्स १९०५ आणि कोपनहेगन १९०८). प्रिन्स्टन, फर्मन आणि शिकागो ह्या विद्यापीठांकडून त्याला अनुक्रमे एल्एल्. डी. (१९०६), एल्. एच्. डी. (१९०६) आणि एल्. एच्. डी. (१९१६) अशा सन्माननीय पदव्या देण्यात आल्या. सॅन फ्रॅन्सिस्को येथे तो निवर्तला.
भट, गो. के.