ब्रेमेन: पश्चिम जर्मनीच्या याच नावाच्या राज्याची राजधानी. लोकसंख्या ६,९५,१०० (१९७९ अंदाज). हँबर्गनंतर प. जर्मनीचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर व औद्योगिक आणि व्यापारी केंद्र. उत्तर समुद्राला मिळणाऱ्या बेझर नदीच्या मुखापासून ६४ किमी. अंतरावर असून मुखाजवळील पहिल्या मंद उतारावर दोन्ही काठांवर ४३ किमी. लांब पसरले आहे. उत्तर तीरावर इ. स. ८४५ पासूनचे जुने आणि दक्षिण तीरावर इ. स. १६२२ पासूनचे नवे शहर असून सागरी लाटांपासून शहराचे संरक्षण करणाऱ्या भिंती ११६ किमी. लांबीच्या आहेत. नदीवर महामार्गांसाठी तीन आणि लोहमार्गांसाठी एक पूल आहे. दक्षिणेस नवी उपनगरे अर्धचंद्रकार वसली आहेत. हा दक्षिण भागच मुख्यतः औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या महत्वाचा आहे. येथे जहाजबांधणी, तेलशुद्धी, मद्यार्क, साखरनिर्मिती, इ. उद्योगधंदे असून पोलाद व पोलादी वस्तू, यंत्रसामग्री, विजेची उपकरणे, सुती व लोकरी कापड, बीर, खाद्यपदार्थ, कॉफी, चॉकोलेट, तंबाखूचे पदार्थ इत्यादीचे उत्पादन होते. येथून कापूस, लोकर, ताग, कातडी, तंबाखू, धान्य, कॉफी, खनिज तेलपदार्थ यांचा व्यापार चालतो. येथे कलावीथी व अनेक वस्तुसंग्रहालयेही आहेत. तेराव्या शतकात स्वीडनपर्यंत प्रभावी असलेली आर्चबिशपची सत्ता झुगारून देऊन ब्रेमेन स्वतंत्र झाले व हॅन्सीॲटिक लीगला मिळाले. ब्रेमेनला स्वतःचे कायदेकानून व अनेक विशेषाधिकार होते. नेपोलियनच्या काळानंतर ब्रेमेन ‘फ्री हॅन्स सिटी’ या दर्जाने जर्मन कॉन्फेडरेशनमध्ये दाखल झाले (१८१५). १८२७ मध्ये ब्रेमरहेवेन वसवून व्यापार वाढविण्यात आला. १८७१ मध्ये ते जर्मन साम्राज्यात सामील झाले. पहिल्या महायुद्धानंतर येथे १९१८-१९ मध्ये समाजवादी प्रजासत्ताक स्थापन झाले होते परंतु ते अल्पकालीन ठरले. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी ब्रेमेनवर अतोनात बाँबवृष्टी केली. त्यामुळे जुने ब्रेमेन जवळजवळ संपूर्ण उद्ध्वस्त झाले परंतु सिटी हॉल, कॅथीड्रल, रोमन व गॉथिक वास्तुशिल्पांचे मिश्रण असलेल्या काही इमारती, स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून १४०४ मध्ये उभारलेला रोलँड हा मध्ययुगीन वीराचा पुतळा इ. तीतून बचावले. अमेरिकेच्या सैन्याच्या हालचालींसाठी उपयुक्त म्हणून या बंदराची पुन्हा लवकरच उभारणी झाली. १९४७ मध्ये ब्रेमेन आणि ब्रेमरहेवेन यांचे मिळून ब्रेमेन हे एक राज्य झाले व १९४९ मध्ये ते जर्मन संघराज्यात सामील झाले.
शहाणे, मो. शा. पंडित, अविनाश
“