ब्रेन्टानो, फ्रँझ : (१६ जानेवारी १८३८ – १७ मार्च १९१७). जर्मन तत्ववेत्ते. जन्म जर्मनीत बोपार्डजवळील मारीनबेर्क येथे. त्यांचे काका क्लेमेन्स ब्रेन्टानो हे कवी होते व वडील रोमन कॅथलिक लेखक होते. ⇨ आलेक्सिअस माइनोंग, ⇨ एटमुंट हुसर्ल, टॉमस मासारिक, क्रिस्तीआन एरेनफेल्स हे त्यांचे विद्यार्थी होते. ब्रेन्टानो हे धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि १८६४ मध्ये ते रोमन कॅथलिक धर्मगुरू झाले. पण १८७३ मध्ये त्यांनी रोमन कॅथलिक चर्चचा त्याग केला. पोप हे धार्मिक सिद्धांताविषयी जेव्हा अधिकृत मत मांडत असतात त्यावेळी ते स्खलनातीत असतात, ह्या चर्चने स्वीकारलेल्या नवीन सिद्धांताविषयी मतभेद झाल्यामुळे ते चर्चबाहेर पडले. वुर्ट्‌सबर्ग विद्यापीठात १८६६ ते १९७३ पर्यंत त्यांनी तत्वज्ञानाचे अध्यापन केले. त्यांच्या अध्यापनाचा त्यांच्या विद्यार्थ्यांवर खूपच प्रभाव पडला. नंतर १८७४ मध्ये ते व्हिएन्ना विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गेले. १८८॰ पर्यंत ते तेथे होते. १८८॰ मध्ये राजीनामा दिल्यावरही त्यांनी १८९५ पर्यंत व्हिएन्ना  येथे अध्यापनाचे काम केले. १८९६ ते १९१५ पर्यंत फ्लॉरेन्स येथे त्यांनी आपले सेवानिवृत्त जीवन व्यतीत केले. झुरिक येथे ते निधन पावले.

त्यांनी जर्मन भाषेत विपुल लिखाण केले पण त्यातील थोडेच त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाले. ह्या प्रकाशित झालेल्या लिखाणात Psychologie Vom empirischen standpunkt (१८७४, इं. शी. सायकॉलॉजी फ्रॉम ॲन इंपीरियल स्टँडपॉइंट) हा ग्रंथ प्रमुख आहे. त्यांचे इतर अप्रकाशित लेखन व ग्रंथ त्यांच्या शिष्यांनी नंतर संपादून प्रसिद्ध केले आहेत. त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे: Psychologie des Aristoteles (१८६७) Vom Dasein Gottes (१८६८, इं. शी. ऑन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड)Ursprung Sittlicher Erkenntnis (१८८४, इं. भा. द ऑरिजिन ऑफ आवर नॉलेज ऑफ राइट अँड राँग १९०२)Ueber die Zukunft der Philosophie (१८९३)Die Vier Phasen der Philos(१८९५)Versuch Uber die Erkenntnis (संपा. १९२५, इं. शी. एन्क्वायरी इन टू द नेचर ऑफ नॉलेज) Walirheit and Evidenz(संपा. १९३२, इं. शी. द ट्रु ॲड द एव्हिडन्स) Grundlegund and Aufbau der Ethik(संपा. १९५२, इं. शी. द फाऊंडेशन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ एथिक्स) इत्यादी.

मानसिक घटनांचे ब्रेन्टानो ह्यांनी केलेले विश्लेषण हा त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे. ह्या विश्लेषणाप्रमाणे मानसिक घटनांचे स्वरूपवैशिष्ट्य त्यांच्या ‘सविषयते’त असते. पाहणे, विचार करणे, रागावणे इ. मानसिक घटना घेतल्या तर त्यांतील कोणत्याही घटनेला विषय असतो. मी काही तरी पहात असतो, कशाचा तरी विचार करीत असतो, मला कशाचा तरी राग आलेला असतो. तेव्हा मानसिक घटनेमध्ये तिचा विषय अनिवार्यपणे अंतर्भूत असतो. भौतिक घटनेचे असे नसते. मानसिक घटनेची मानसिकता तिच्या सविषयतेमध्ये सामावलेली असते.

मानसिक घटनेमध्ये घटना आणि तिचा विषय यांच्या दरम्यानचा हा जो अनुलक्षित असण्याचा विषय अंतर्भूत असतो, त्याचे ब्रेन्टानो तीन प्रकार कल्पितात : (१) मानसिक घटनेमध्ये एखादा विषय मनापुढे किंवा जाणिवेपुढे केवळ उपस्थित असू शकेल. अशी मानसिक घटना ही कल्पना असते किंवा विचार असतो. उदा., सोनेरी पर्वताचा मी केवळ विचार केला, सोनेरी पर्वत मी मनापुढे आणला, तर मी सोनेरी पर्वताची कल्पना करीत आहे असे होईल. (२) अनुलक्षित विषयाची केवळ कल्पना न करता मी त्याच्याविषयी काही बौद्धिक भूमिका धारण करीन त्याचा स्वीकार करीन किंवा अव्हेर करीन. अशा वेळी ती मानसिक घटना हा एक निर्णय असतो. (३) अनुलक्षित विषयासंबंधी मी एक भावनिक भूमिका धारण करीन. ही भावनिक भूमिका अनुकूल किंवा प्रतिकूल रुचीची किंवा द्वेषाची अशी असेल. ह्या भावनिक घटना असतात आणि त्यांच्यामध्ये भावना आणि इच्छा दोन्ही अंतर्भूत असतात.

ह्या तीन भूमिकांना-केवळ जाणिवेची भूमिका, बौद्धिक भूमिका व भावनिक भूमिका–विषयलक्षी संबंध (इन्टेन्शनल रिलेशन) म्हणूया. विषयलक्षी संबंधाविषयी दोन मुद्दे ध्यानात घ्यावे लागतील. एक असा, की निर्णयामध्ये आणि भावनिक घटनांमध्ये उपस्थितीचा संबंध अंतर्भूत असतो. ‘पांढरी फुले असतात’ हा माझा निर्णय घेतला तर ‘पांढरी फुले’ हा त्याचा विषय आहे. ह्या विषयाचा स्वीकार करणे, त्याला मान्यता देणे, होकार देणे म्हणजे ‘पांढरी फुले असतात’ असा निर्णय करणे होय. तेव्हा हा विषय, म्हणजे पांढरी फुले मनापुढे उपस्थित असल्याशिवाय असा निर्णय होऊ शकत नाही. तसेच ‘पांढऱ्या फुलांविषयीची माझी आवड’ ही जी भावनिक घटना आहे तीही पांढऱ्या फुलांचा विचार माझ्या मनात असल्याशिवाय, म्हणजे पांढरी फुले माझ्या जाणिवेपुढे उपस्थित असल्याशिवाय अस्तित्वात असणे शक्य नाही.

दुसरा मुद्दा असा, की निर्णयामध्ये दोन परस्परविरोधी संबंध अंतर्भूत असतात. निर्णयामध्ये विषयाचा स्वीकार तरी केलेला असतो किंवा अव्हेर तरी केलेला असतो. भावनिक घटनेविषयी ही गोष्ट सत्य असते. भावनिक घटनेमध्ये विषयाविषयी प्रेम तरी असते, अनुकूल वृत्ती तरी असते किंवा द्वेष, प्रतिकूल वृत्ती तरी असते. एखाद्या विषयाची केवळ कल्पना करण्यात किंवा केवळ विचार करण्यात असे दोन परस्परविरोधी संबंध अंतर्भूत नसतात.

निर्णय आणि भावनिक घटना यांच्यामध्ये असलेले दुसरे साम्य असे, की त्यांच्यात अंतर्भूत असलेले संबंध बरोबर किंवा चूक, योग्य किंवा गैर असू शकतात. ‘भूते आहेत’ ह्या निर्णयात भूतांना मी जी मान्यता दिली आहे ती गैर असेल. किंवा ‘ज्ञानाचा द्वेष‘ ही जी माझी भावना आहे तिच्यात ज्ञानाविषयी मी जी द्वेषाची वृत्ती धारण केली आहे ती अयोग्य, चूक असेल. उलट विषय जाणिवेपुढे उपस्थित असण्याचा केवळ जो संबंध आहे त्याच्यात बरोबर किंवा गैर असे काही असत नाही.


सामान्यपणे निर्णयाचा आशय ‘देव आहे’ किंवा ‘देवदत्त शहाणा आहे’ ह्यासारखे विधान असते असे मानले जाते. ब्रेन्टानो यांचे मत वेगळे आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘देव आहे’ ह्या निर्णयात ‘देव’ याचा स्वीकार करण्यात आला असतो किंवा त्याला मान्यता देण्यात आलेली असते.‘देव नाही’ ह्या निर्णयात ‘देव’ ह्याचा अव्हेर करण्यात आलेला असतो. ‘देवदत्त शहाणा आहे’ या निर्णयात ‘शहाणा देवदत्त’ ह्याला मान्यता देण्यात आलेली असते. ‘कुणीही माणूस परिपूर्ण नसतो’ ह्या निर्णयात ‘परिपूर्ण माणूस’ ह्याचा अव्हेर करण्यात आलेला असतो इत्यादी.

ही उपपत्ती ब्रेन्टानो यांनी संयुक्त निर्णयांनाही लावली आहे. ‘माणसे आहेत आणि पशू आहेत’ ह्या निर्णयात ‘माणसे आणि पशू’ ह्या संयुक्त समूहाला मान्यता देण्यात आलेली असते. ‘जर वारा आला तर पाऊस पडेल’ ह्या सोपाधिक किंवा व्यंजक निर्णयाचे विश्लेषण अधिक गुंतागुंतीचे आहे. ‘वारा आला’ हा निर्णय आणि ‘पाऊस पडणार नाही’ हा निर्णय सुसंगतपणे एकत्र असू शकणार नाहीत असा ह्या निर्णयाचा अर्थ ब्रेन्टानो लावतात. ‘वारा येणे’ ह्याला ‘व’ म्हणू या आणि ‘पाऊस पडणे’ह्याला ‘प’ म्हणू या. ‘वारा आला’ हा निर्णय जे बरोबर घेतात (म्हणजे त्यांनी केलेला हा निर्णय सत्य असतो), त्यांना ‘बरोबर व – स्वीकारक’ म्हणू या. तसेच ‘पाऊस पडणार नाही’ असा बरोबर निर्णय जे घेतात त्यांना ‘बरोबर प- अव्हेरक’ म्हणू या. मग ‘वारा आला तर पाऊस पडेल’ हा निर्णय म्हणजे ‘बरोबर व -स्वीकारक आणि बरोबर प -अव्हेरक’असे दोन्ही असलेल्यांचा अनिवार्यपणे केलेला अव्हेर ठरतो. ह्या विश्लेषणात ‘अनिवार्यपणे केलेला स्वीकार किंवा अव्हेर’ ही संकल्पना ब्रेन्टानो यांनी वापरली आहे. ‘शक्यता’ ह्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी ती आवश्यक ठरते. उदा., ‘अ’ चा अव्हेर करणे म्हणजे ‘अ नाही’ असे म्हणणे. पण ‘अ’ चा अनिवार्यपणे अव्हेर करणे म्हणजे ‘अ ची शक्यता नाही’, ‘अ अशक्य आहे’ असे म्हणणे. तेव्हा ‘वारा आला तर पाऊस पडेल’ ह्या निर्णयाचे वर जे विश्लेषण दिले आहे त्याचा अर्थ असा होतो : ‘वारा आला’ हा निर्णय बरोबर आहे आणि ‘पाऊस पडणार नाही’ हा निर्णयही बरोबर आहे असे दोन्ही असणे अशक्य आहे.

ह्या प्रकारचे विश्लेषण ब्रेन्टानो यांना का करावे लागते ह्याचे कारण ध्यानात घेणे आवश्यक आहे. ब्रेन्टानो यांच्या मताप्रमाणे फक्त मूर्त, विशिष्ट वस्तू आहेत आणि ह्याच्या पलीकडे काही नाही. म्हणून प्रत्येक निर्णय हा मूर्त, विशिष्ट वस्तूविषयीचा निर्णय असतो व तिचा तो स्वीकार करतो किंवा अव्हेर करतो. एखादा निर्णय अमूर्त गोष्टीविषयी असल्यासारखा दिसतो, पण तो वास्तविक मूर्त वस्तूविषयी असतो. उदा., ‘तांबडा हा एक रंग आहे’ हा निर्णय तांबडेपणा ह्या गुणाविषयी, म्हणजे एका अमूर्त गोष्टीविषयी आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण ‘प्रत्येक तांबडी वस्तू ही तांबडी वस्तू म्हणून रंगीत असते’ अशा स्वरूपात हा निर्णय मांडता येतो आणि मग तो मूर्त वस्तूविषयीचा निर्णय आहे हे दिसून येते. आता, “वारा आला’ हा निर्णय आणि ‘पाऊस पडणार नाही’ हा निर्णय हे दोन्ही सत्य असणे अशक्य आहे” हा सबंध निर्णय घेतला, तर तो दोन निर्णयांविषयीचा निर्णय आहे आणि निर्णय ही अमूर्त गोष्ट आहे. तेव्हा ह्याचे मूर्त वस्तूविषयीच्या निर्णयात भाषांतर करणे आवश्यक आहे. ह्यासाठी ब्रेन्टानो त्याचे निर्णय करणाऱ्या व्यक्तीविषयीच्या निर्णयात भाषांतर करतात. म्हणजे, वर म्हटल्याप्रमाणे ‘व स्वीकारक‘ आणि ‘प स्वीकारक‘ यांच्याविषयीच्या निर्णयामध्ये भाषांतर करतात. कारण ह्या व्यक्ती मूर्त आहेत.

निर्णयाच्या स्वरूपाविषयी ब्रेन्टानो यांनी जी भूमिका मांडली आहे तिच्यापासून काही महत्वाचे निष्कर्ष निष्पन्न होतात. उदा., ‘अस्तित्व असे विधेय नाही’ असे कांटचे प्रसिद्ध वचन आहे. हे तत्व ब्रेन्टानो यांच्या भूमिकेपासून निष्पन्न होते. ‘भूते आहेत’ह्या वाक्याने जो निर्णय व्यक्त होतो त्याच्यात अस्तित्व ह्या विधेयाची भूतांशी सांगड घातलेली नसते, तर हा निर्णय म्हणजे ‘भूते’ ह्यांना दिलेली मान्यता असते, असे ब्रेन्टानो यांचे म्हणणे आहे. भूतांना बौद्धिक मान्यता देण्याच्या कृतीमध्ये जो निर्णय सामावलेला असतो तो भाषेत मांडताना ‘भूते आहेत’ह्या वाक्याने मांडण्यात येतो पण निर्णयामध्ये ‘भूतांच्या अस्तित्वा’ ला मान्यता दिलेली नसते, तर भूतांनाच मान्यता दिलेली असते, अशी ही भूमिका आहे.

ब्रेन्टानो यांचे पुढे असे म्हणणे आहे की, आपले निर्णय हे प्रत्ययाधिष्ठित तरी असतात किंवा ‘आंधळे’ तरी असतात. निर्णयांचे समर्थन करणारे किंवा त्यांना आधार देणारे प्रत्यय दोन प्रकारचे असतात. प्रत्ययांचा एक प्रकार म्हणजे आंतरिक अनुभव. उदा., ‘आता मला एक टेबल दिसल्यासारखे भासत आहे’ किंवा ‘मी सकाळी सहा वाजता उठलो असे स्मरण मला होत असल्यासारखे वाटत आहे’ हे निर्णय आंतरिक अनुभवावर आधारलेले आहेत. ‘येथे टेबल आहे’ हा निर्णय आंतरिक अनुभवावर आधारलेला नाही. आंतरिक अनुभव आहे तो टेबल दिसल्यासारखे भासण्याचा अनुभव आहे. तो टेबलदिसण्याचा अनुभव नव्हे कारण जे पहाण्याचा तो अनुभव आहे ते टेबल आहे असे सिद्ध करता येत नाही व म्हणून त्या अनुभवाचे टेबल दिसण्याचा अनुभव, असे वर्णन करता येत नाही. ‘टेबल दिसत आहे असे वाटणे किंवा भासणे’ असे त्याचे वर्णन करावे लागते आणि म्हणून ह्या प्रत्ययावर आधारलेला निर्णय ‘मी टेबल पाहत आहे असे मला भासत आहे’ असा मांडावा लागतो.

तसेच सकाळी सहा वाजता उठल्याचे स्मरण होण्याचा अनुभव मला येत नाही. कारण ‘सकाळी सहा वाजता उठल्याचे मला आठवते आहे’, ह्या म्हणण्यात मी वस्तुतः सकाळी सहा वाजता उठलो असे अभिप्रेत आहे आणि ही घटना वस्तुतः घडली ह्याचा प्रत्यय आता मला येऊ शकत नाही. तेव्हा आता मला जो प्रत्यय होत आहे त्याची मांडणी ‘मी सकाळी सहा वाजता उठल्याचे स्मरण मला असल्यासारखे वाटत आहे’ अशी करावी लागते. ह्यामुळे ‘येथे टेबल आहे’ ह्यासारखे बाह्य वस्तूंविषयीचे निर्णय किंवा ‘मी सकाळी सहा वाजता उठलो’ ह्यासारखे भूतकालाविषयीचे निर्णय हे प्रत्ययाधिष्ठित नसतात. ते ‘आंधळे’ असतात. पण ‘आंधळे’ असले तरी ते त्याज्य नसतात. कारण ब्रेन्टानो पुढे म्हणतात, की ‘भौतिक वस्तूंचे बनलेले बाह्य जग आहे’ ह्या अभ्युपगमाच्या ठिकाणी अतिशय मोठी अशी संभाव्यता आहे आणि म्हणून त्याच्यावर आणि त्याच्या तपशिलाचे वर्णन करणाऱ्या ‘येथे टेबल आहे’ ह्यांसारख्या निर्णयांवर विश्वास ठेवणे योग्य आहे. त्याचप्रमाणे स्मृतीवर आधारलेले निर्णय ‘आंधळे’ असले, तरी अनेकदा परस्परांशी सुसंगत असतात व अशा सुसंगत असलेल्या भूतकालविषयक निर्णयांचा समूह विश्वासार्ह असतो.


निर्णयाच्या संदर्भात ‘युक्ततेने किंवा बरोबर केलेला स्वीकार (किंवा अव्हेर)’ह्या बौद्धिक संबंधाला प्रथमिक स्थान आहे. युक्ततेने केलेला स्वीकार (किंवा अव्हेर) म्हणजे प्रत्ययावर आधारलेला असा स्वीकार (किंवा अव्हेर). अशा स्वीकाराने (किंवा अव्हेराने) घडलेला निर्णय सत्य असतो, पण ह्यापुढे एक मुद्दा उपस्थित होतो. निर्णय फक्त मूर्त वस्तूंविषयी असू शकतात, अमूर्त गोष्टींविषयी असू शकत नाहीत हे आपण पाहिलेच आहे. ‘अमूक निर्णय सत्य आहे’ हा निर्णय त्या निर्णयाविषयी आहे आणि निर्णय ही मूर्त वस्तू नाही. म्हणून ह्या निर्णयाचे मूर्त वस्तूविषयीच्या निर्णयात भाषांतर करावे लागते आणि हा निर्णय त्या मूर्त वस्तूचा स्वीकार किंवा अव्हेर अशा स्वरूपाचा असतो. उदा., ‘ईश्वर आहे हे सत्य आहे’ ह्या निर्णयाचे ‘ईश्वराचा बरोबर (प्रत्ययाधिष्ठित) अव्हेर करणाऱ्यांचा अनिवार्यतेने केलेला अव्हेर’ असे भाषांतर करावे लागते. म्हणजे सत्यता हे अस्तित्वासारखे खरेखुरे विधेय नाही.

ब्रेन्टानो यांच्या मते नीतीचा वा मूल्यांचा संबंध तिसऱ्या प्रकारच्या मानसिक घटनांशी, म्हणजे भावनिक घटनांशी पोहोचतो. मूल्यांविषयीची ब्रेन्टानो यांची उपपत्ती सत्य निर्णयांविषयीच्या त्यांच्या उपपत्तीसारखी आहे. ‘क्ष चांगले आहे किंवा मूल्यवान आहे’ ह्या म्हणण्याचा अर्थ ‘क्ष चा युक्ततेने द्वेष करणे अशक्य आहे,’ असा होतो. म्हणजे, ‘अशक्य’ ह्याच्या वर दिलेल्या अर्थाप्रमाणे, ‘क्ष चा युक्ततेने द्वेष करणाऱ्यांचा अनिवार्यतेने केलेला अव्हेर’ असा होतो. सत्य निर्णय ज्याप्रमाणे प्रत्ययाधिष्ठित असतो त्याप्रमाणे युक्ततेने केलेल्या प्रेम आणि द्वेष ह्या भावनाही प्रत्ययाधिष्ठित असतात. विशिष्ट विषय (उदा., ज्ञान) आणि त्याला अनुलक्षून असलेली प्रेमाची भावना ह्यांचा अनुभव जेव्हा आपल्याला येतो, तेव्हा ही युक्त अशी भावना  आहे असा साक्षात् प्रत्यय आपल्याला येतो. मूल्यांकनविषयीची ही उपपत्ती आणि जी. ई. मुर यांची उपपत्ती काहीसे साम्य असल्याचे दिसून येईल.

ज्ञान आणि सत्संकल्प या गुणांनी युक्त असलेला आणि विश्वाची निर्मिती व रचना करणारा ईश्वर ब्रेन्टानो यांना मान्य होता. जे आहे ते जर यादृच्छिक (क्वन्टिन्जन्ट) असेल, तर त्याचे पर्यांप्त असे कारण असेल पाहिजे आणि अशा कारणांच्या मालिकेचे आद्य कारण अनिवार्यतेने अस्तित्वात असले पाहिजे असे ते मानीत. जग सुरचित आहे ह्या पुराव्यावरून जगाच्या निर्मात्याच्या ठिकाणी ज्ञान आणि सत्संकल्प हे गुण असले पाहिजेत हे अनुमानही ते स्वीकारीत. देहाहून भिन्न असलेला असा आत्मा आहे आणि तो अमर आहे ह्या सिद्धांताचे समर्थन ते करीत. आत्म्याला संकल्पस्वातंत्र्य असते कारण संकल्पस्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्तीला तिच्या कृत्यांबद्दल जबाबदार धरता येणार नाही, असे ते प्रतिपादन करीत. शिवाय एखाद्या परिस्थितीत काय करावे ह्याचा खल करून आपण काय करणार ते ठरवितो आणि ते करतो ह्या अनुभवावरूनही संकल्पस्वातंत्र्य सिद्ध होते, असे त्यांचे म्हणणे होते.

तत्वज्ञानाच्या इतिहासाविषयी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी उपपत्ती ब्रेन्टानो यांनी मांडली आहे. भरभराटीच्या अवस्थेपासून जेव्हा तत्वज्ञानाची अवनती सुरू होते तेव्हा प्रथम सैद्धांतिक प्रश्नांपासून लक्ष सुटून व्यावहारिक प्रश्नांवर केंद्रित होऊ लागते. मग संशयवाद बोकाळतो आणि अखेरीस तत्ववेत्ते गूढवादाचा आश्रय घेतात व ही तत्वज्ञानाची सर्वांत अवनत अवस्था होय, असे ब्रेन्टानो यांचे म्हणणे होते. ग्रीक तत्वज्ञानाच्या इतिहासात तसेच आधुनिक तत्वज्ञानाच्या इतिहासात हा ऱ्हासाचा क्रम आढळून येतो. आधुनिक काळात देकार्त, लॉक, लायप्निट्स यांचे युग हे तत्वज्ञानाच्या भरभराटीचे युग होय आणि प्रबोधन कालीन व्यवहारवादी तत्वज्ञान, ह्यूमचा संशयवाद आणि कांट व नंतरच्या चिद्‌वाद्दांचा गूढवाद ह्या त्याच्या ऱ्हासाच्या काळातील अधिकाधिक अवनतीच्या अवस्था होत, असे मत त्यांनी मांडले आहे.

पहा : रूपविवेचनवाद.

संदर्भ : 1. Chisholm, Roderick, Ed. Realism and the Background of Phenomenology, Glencoe, III, 1960.

             2. Spiegelberg, Herbart, The Phenomenological Movement, The Hague, 1960. 

     

रेगे, मे. पुं.