ब्रूसेल्स स्प्राउट्स : (लॅ. ब्रॅसिका ओलेरॅसिया, प्रकार गेमिफेरा कुल-क्रुसीफेरी ब्रॅसिकेसी). ह्या ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पतीचे मूलस्थान प. यूरोप असून बेल्जियममध्ये हिची लागवड इ.स. १२०० इतक्या पूर्वीपासून होती व १५८७ मध्ये तिचे प्रथम वर्णन केले गेले, असा उल्लेख सापडतो. ⇨ कोबी व ⇨ नवलकोल यांच्या जातीचा हा एक प्रकार असून अनेक लक्षणांत त्यांच्याशी हिचे साम्य आहे. ही दोन वर्षे जगणारी असून हिच्या पानांच्या बगलेत कोबीसारख्या लहान कळ्या (स्प्राउट्स, २.५-५ सेंमी. लांब) येतात. हिचे पूर्ण वाढलेले खोड सु. ०.६-०.९ मी. उंच असते व खोडाच्या वरच्या भागात विशेषेकरून त्या कळ्यांची गर्दी आढळते. हिची लागवड कोबीसारखी करतात. सकस जमीन, थंड हवा व भरपूर पाणी हिला आवश्यक असते. डोंगरावर फेब्रुवारी ते मार्चमध्ये बी पेरतात आणि जुलै ते सप्टेंबरात पीक काढतात. सखल भागात ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये पेरणी आणि फेब्रुवारी ते मेमध्ये कापणी व मळणी होते. पीक साधारणतः तीन ते चार महिन्यांत येते. यूरोपात पीक हिवाळ्यात तर उष्ण कटिबंधात उंच प्रदेशात घेतात. भारतात महाराष्ट्र व गुजरात येथे लागवड करतात. ‘हाफ ड्वार्फ’, ‘कॅट्स किल’ हे हिचे प्रकार लोकप्रिय आहेत. इंग्लंड, यूरोप व अमेरिका येथे हिची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कळ्यांची भाजी परदेशात लोकप्रिय आहे. लोणी व लसूण घालून ती लज्जतदार करतात. कोवळी पाने, खोडाचे शेंडे व कळ्या खाद्य आहेत. भारतात ही फारशी खाण्यात नाही. कोबीपेक्षा ही अधिक नाजूक असते.
ह्या पिकाला झाडे सु. ३० सेंमी. उंच होईपर्यंत दर पंधरवड्यास एकदा सुपरफॉस्फेट आणि पोटॅशियम सल्फेट यांच्या द्रवमिश्रणाचे खत देतात. तसेच कळ्यांची वाढ होत असताना अमोनियम सल्फेट अथवा सोडियम नायट्रेट हे वरखत देणे फायदेशीर असते. खोडांची टोके खुडल्यास कळ्यांची वाढ चांगली होते. कळ्यांमध्ये प्रतिशत जलांश ८४.६, प्रथिन ४.७, मेद ०.५, कार्बोहायड्रेटे ९.२, खनिजे १.०, कॅल्शियम ०.०५ व फॉस्फरस ०.८ असून लोह, अ जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व वगैरेही त्यात असतात.
पहा :कोबी क्रुसीफेरी
क्षीरसागर, व. ग. परांडेकर, शं. आ.
“