प्युनिकेसी : (ग्रॅनेटेसी दाडिम कुल). फुलझाडांपैकी (आवृत्तबीज, द्विदलिकित) ⇨ मिर्टेलीझ गणातील (जंबुल गणातील) एक लहान कुल. यामध्ये प्युनिका हा एकच वंश अंतर्भूत असून जी. बेंथॅम आणि जे. डी. हुकर यांच्या वर्गीकरण पद्धतीप्रमाणे पूर्वी ⇨ लिथ्रेसी कुलात (मेंदी कुलात) तो समाविष्ट करण्यात आलेला होता. ह्या वंशात फक्त दोनच जाती (प्युनिका ग्रॅनॅटम = डाळिंब सं. दाडिम व प्यु. प्रोटोप्युनिका) असून पहिलीचा प्रसार यूरोप ते हिमालयापर्यंत व दुसरीचा सोक्रोत्रात (द. येमेन) आहे. ⇨ डाळिंब फार पूर्वीपासून लागवडीत असून हल्ली उष्ण प्रदेशात त्याचा प्रसार झाला आहे. या कुलातील वनस्पती काष्ठयुक्त व बहुधा काटेरी क्षुपे (झुडपे) किंवा लहान वृक्ष असून त्यांच्या फांद्या शेंड्याकडे काटेरी व शूलाकृती असतात. पाने साधी, समोरासमोर, क्वचित काहीशी एकाआड एक व अनुपपर्ण (उपपर्णे नसलेली) फुले द्विलिंगी, नियमित फांद्यांच्या टोकांस एकाकी किंवा पानांच्या बगलेत झुपक्यांनी येतात. संदले व प्रदले (पाकळ्या) ५—८, सुटी व रंगीत (लालसर, शेंदरी), पाकळ्या कळीमध्ये अनियमितपणे दुमडलेल्या असतात केसरदले अनेक व पुष्पासनाच्या आतील बाजूस, किंजपुटाच्या वरच्या पातळीत चिकटलेली किंजदले अनेक, जुळलेली किंजपुटपुष्पासनास चिकटलेला, अधःस्थ व अनेक कप्प्यांचा बीजकविन्यास (बीजकांची मांडणी) प्रथम अक्षलग्न पण पुढे तटलग्न, एकंदरीत जटिल बीजके अनेक व अधोमुख [→ फूल] मृदुफळ रसाळ (दाडिमसम), गोलसर, चिवट सालीचे फळावर सतत संवर्त असतो बियांवरचे बाहेरचे आच्छादन रसाळ बिया अपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश नसलेल्या) असतात.

जमदाडे, ज. वि.