ब्रुक्स, विल्यमकीथ : (२५ मार्च १८४८ – १२ नोव्हेंबर १९०८). अमेरिकन प्राणिशास्त्रज्ञ. सागरी प्राण्यांचे शारीर (प्राण्यांचे रूप व संरचना यांचा अभ्यास करणारे शास्त्र) व भ्रूणविज्ञान (भ्रूणाची – अपक्व जीवाची – उत्पत्ती व विकास यांचा अभ्यास करणारे शास्त्र) या विषयांत त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांचा जन्म क्लीव्हलँड (ओहायओ, अमेरिका) येथे झाला. १८७० साली त्यांनी विल्यम्स कॉलेजातून (मॅसॅचूसेट्स) पदवी संपादन केली व लुई आगास्सिझ यांच्या मार्गदर्शनाखाली १८७५ साली त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली. १८७६ साली ते तेथेच प्रकृतिविज्ञानाचे साहाय्यक प्राध्यापक व १८९१ साली प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक झाले तसेच १८९४ साली ते तेथील जीवविज्ञान विभागाचे प्रमुखही झाले. मृत्यूपावेतो ते या पदांवर होते.

सागरी प्राण्यांचा त्यांच्या स्वाभाविक निवासक्षेत्रात अभ्यास केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. अशा तऱ्हेने त्यांनी पृष्ठवंशींशी (पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांशी) संबंधित अशा चोलधारी (उदा., साल्पा वंशातील), कवचधारी (उदा., चिमोरा) व मृदुकाय (उदा., ऑयस्टर) या प्राण्यांचा शारीर व भ्रूणविज्ञान यांच्या दृष्टीने अभ्यास केला. पैकी साल्पा वंशातील प्राण्यांवर त्यांनी बरेच संशोधन केले तर ल्युसिफर या कवचधारी प्राण्याच्या भ्रूणविकासावरील त्यांचे संशोधन बहुमोल आहे. सीलेंटेरेटा (आंतरगुही) संघातील काही प्राण्यांच्या जीवनवृत्ताची त्यांनी उकल केली. चार्ल्‌स डार्विन यांची क्रमविकासाची (उत्क्रांतीची) संकल्पना त्यांनी स्वीकारली होती व तसे करताना त्यांनी एकोणिसाव्या शतकातील वर्णनात्मक आकारविज्ञानाची परंपरा चालू ठेवली. तथापि ई. बी. विल्सन, टी. एच्. मॉर्गन, आर्. जी. हॅरिसन वगैरे त्यांच्या विद्यार्थ्यांवर त्यांचा जो प्रभाव पडला त्यामुळे विसाव्या शतकातील जीवविज्ञानाच्या (विशेषतः कोशिकाविज्ञान-पेशीविज्ञान, आनुवंशिकी व भ्रूणविज्ञान यांच्या) अभ्यासाला प्रायोगिक व कार्यकारणभावाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चेझापीक प्राणिवैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन केली (१८७८) हे फिरते सागरी केंद्र होते. तसेच मेरिलंड राज्याच्या आमसभेचे आयुक्त असताना त्यांनी चेझापीक उपसागरातील ऑयस्टरांचे संरक्षण करण्याच्या मोहिमेत पुढाकार घेतला होता. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांपैकी पुढील महत्त्वाची आहेत : प्रोव्हिजनल हायपोथेसिस ऑफ पॅनजेनेसिस (१८७७),हेरिडिटी (१८८३), द ऑयस्टर (१८९१) व फाउंडेशन्स ऑफ झूलॉजी (१८९९). शिवाय त्यांचा द जिनस ऑफ साल्पा (१८९३) हा व्याप्तिलेखही प्रसिद्ध आहे. ते लेक रोलँड (मॅडिसन) येथे मृत्यू पावले.

चंदाराणा, प्रतिमा न.