ब्रुक, रूपर्ट : (३ ऑगस्ट १८८७ -२३ एप्रिल १९१५). इंग्रज कवी. रग्बी येथे जन्मला. केंब्रिजच्या किंग्ज कॉलेजात त्याचे शिक्षण झाले. तेथेच काही काळ तो अधिछात्रही होता. पोएम्स (१९११) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. काव्याविषयीची आस्था वाढीला लावण्याच्या हेतूने काही कवींनी मिळून प्रसिद्ध केलेल्या जॉर्जिअन पोएट्री (५ खंड, १९१२ – २२) ह्या काव्यसंग्रहात जॉन ड्रिंकवॉटर, जॉन मेसफील्ड, रॉबर्ट ग्रेव्हज आदींच्या कवितांबरोबर ब्रुकच्या कविताही अंतर्भूत आहेत.
पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रुक एक अधिकारी ह्या नात्याने सैन्यात शिरला. एका लष्करी मोहिमेवर असताना, स्कीरॉस बेटावर, त्यास मरण आले. ब्रुकने लिहिलेली युद्धसुनिते १९१४ अँड अदर पोएम्स ह्या नावाने त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आली. ह्या कवितांना फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. ब्रिटिश जनतेपुरते तरी ब्रुक हे नाव देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या असंख्य, अज्ञात तरुण वीरांचे प्रतीक ठरले.
ब्रुकच्या कवितेत प्रखर देशप्रेम आणि एक प्रकारचा स्वप्नाळूपणा ह्यांची प्रचीती येते. तथापि युद्धाची भीषणता मात्र त्याच्या काव्यात क्वचितच व्यक्त होते. युद्धोत्तर काळात ब्रुकच्या कवितेची लोकप्रियता ओसरत गेली. ‘द सोल्जर’, ‘द ग्रेट लव्हर’ ह्यांसारख्या त्याच्या काही कविता मात्र आजही लोकप्रिय आहेत. जॉन वेब्स्टर अँड द एलिझाबेदन ड्रामा (१९१६) हा त्याने लिहिलेला ग्रंथही उल्लेखनीय आहे.
संदर्भ : Hassall, Christopher Vernon, Rupert Brook : A Biography, London, 1964.
बापट, गं. वि.