ब्रॉग्ली, मॉरिस दः (२७ एप्रिल १८७५-१४ जुलै १९६०). फ्रेंच भौतिकीविज्ञ. क्ष-किरणांविषयीच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध.

ब्रॉग्ली यांचा जन्म पॅरिस येथे झाला. एकोल नॅव्हेल या संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर १८९५-१९०४ या काळात, तसेच पुढे पहिल्या महायुद्धात नाविक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्याच वेळी मार्से विद्यापीठात शिक्षण घेऊन १९०० मध्ये त्यांनी विज्ञानाची पदवी मिळविली. १९०४ च्या सुमारास भौतिक विज्ञानाबद्दलच्या आवडीमुळे त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली. या प्रयोगशाळेत त्यांनी इतर अनेक भौतिकीविज्ञांबरोबर संशोधन केले आणि पुढे प्रसिद्धीस आलेले त्यांचे धाकटे बंधू ल्वी व्हीक्तॉर यांनीही तेथे काम केले. मॉरिस यांनी काही काळ मदाँ येथील वेधशाळेत वर्णपटविज्ञानाचा अभ्यास केला आणि नंतर कॉलेज द फ्रान्समध्ये पॉल लांझव्हँ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून डॉक्टरेटसाठी जड आयनांच्या (विद्युत् भारित अणू वा रेणूंच्या) विद्युत् क्षेत्रातील वर्तनासंबंधी प्रबंध सादर केला. १९४२-४६ या काळात ते कॉलेज द फ्रान्समध्ये प्राध्यापक होते.

ब्रॉग्ली यांचे प्रमुख कार्य वायूंतील आयनीकरण, किरणोत्सर्ग (विशिष्ट पदार्थातून भेदक कण वा किरण बाहेर पडणे) व क्ष किरण वर्णपटविज्ञान [⟶ क्ष किरण] यांविषयी होते. १९१३ मध्ये फिरत्या स्फटिकाच्या पद्धतीने त्यांनी पहिला पूर्ण क्ष किरण वर्णपट मिळविला. महायुद्धानंतर त्यांनी पहिला पूर्ण क्ष किरण शोषण वर्णपटही मिळविला. अशा प्रकारे क्ष किरण वर्णपटलेखनाला त्यांनी महत्त्वपूर्ण चालना दिली.

फ्रान्सची ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९२४), फ्रेंच ॲकॅडेमी (१९३४), लंडनची रॉयल सोसायटी इ. संस्थांचे ते सदस्य होते. त्यांना रॉयल सोसायटीच्या ह्यूझ पदकाचा बहुमान मिळाला होता. फ्रान्सच्या अणुऊर्जा मंडळाचे ते सदस्य होते. ते नयी येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.