रॅली, जॉन विल्यम स्ट्रट : (१२ नोव्हेंबर १८४२–३० जून १९१९). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. अनेक महत्त्वाच्या वायूंच्या घनतेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल व ⇨सर विल्यम रॅम्झी यांच्याबरोबर आरगॉन या अक्रिय (सहजासहजी रासायनिक विक्रिया न होणाऱ्या) वायूचा शोध लावल्याबद्दल रॅली यांना १९०४ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

रॅली यांचा जन्म लँगफर्ड ग्रोव्ह (एक्सेसमधील मॉल्डनजवळ) येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजात झाले. १८६५ मध्ये स्मिथ पारितोषिक मिळवून सिनियर रँग्लर झाल्यावर १८६६–७१ या काळात ते ट्रिनिटी कॉलेजचे फेलो होते. १८७३ मध्ये वडिलांनंतर वारसाहक्काने ते रॅली घराण्याचे तिसरे बॅरन झाले (वैज्ञानिक क्षेत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख ‘लॉर्ड रॅली’ असाच करण्यात येतो). जे. सी. मॅक्सवेल यांच्या मृत्यूनंतर रॅली हे केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेचे प्रमुख झाले (१८७९–८४). पुढे ते रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये निसर्गविज्ञानाचे प्राध्यापक होते (१८८७–१९०५). रॅली यांनी स्फोटक द्रव्यांसंबंधीच्या सरकारी समितीचे अध्यक्ष (सहा वर्षे) व ट्रिनिटी हाऊसचे वैज्ञानिक सल्लागार (१८९६–१९१९) म्हणूनही काम केले.

लॉर्ड रॅली यांनी ध्वनिशास्त्र, तरंग सिद्धांत , वर्णदृष्टी, विद्युत् गतिकी, विद्युत् चुंबकत्व, प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे), द्रवगतिकी, वायूंची घनता, श्यानता (दाटपणा), ⇨कैशिकता, स्थितिस्थापकता (ताण काढून घेतल्यावर पदार्थ मूळ स्थितीत येण्याचा गुणधर्म) व छायाचित्रण अशा भौतिकीतील विविध शाखांत संशोधन केले. त्यांच्या प्रारंभीच्या कार्यापैकी आकाशाच्या निळ्या रंगाचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण [⟶ आकाशवर्ण] आणि जॉन टिंड्ल यांच्या सिद्धांताला आधार देणारे व वातावरणातील सूक्ष्म कणांनी केलेले प्रकाशाचे प्रकीर्णन व सूर्यप्रकाशाची तरंगलांबी यांचा संबंध दाखविणारे त्यांनी मांडलेले समीकरण सुप्रसिद्ध आहे. त्यांनी योजलेल्या सूक्ष्मग्राही प्रयोगांमुळे विद्युत् रोध, विद्युत् प्रवाह व विद्युत् चालक प्रेरणा (विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा) यांची मानके (प्रमाणे) प्रस्थापित होण्यास मोठी मदत झाली. कृष्ण पदार्थ प्रारणाच्या ऊर्जा वितरणासंबंधीचा रॅली यांचा सिद्धांत [⟶ उष्णता प्रारण] चुकीचा ठरला, तरी त्यामुळेच⇨पुंज सिद्धांताच्या विकासाला विशेष चालना मिळाली.

 ब्रिटिश सरकारने त्यांच्या शास्त्रीय कार्याच्या गौरवार्थ त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट (१९०२) हा किताब दिला व प्रिव्ही कौन्सिलर या पदावर त्यांची निवड झाली. रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वाचा (१८७३) आणि कॉप्ली, रॉयल व रम्फर्ड या पदकांचा त्यांना सन्मान मिळाला. ते रॉयल सोसायटीचे सचिव (१८८५–९६) व अध्यक्षही (१९०५–०८) होते. द थिअरी ऑफ साउंड (२ खंड, १८७७–७८) हा त्यांचा ध्वनिविषयक ग्रंथ त्यातील कंपनांची मीमांसा व कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या) ठरविण्याची पद्धती यांकरिता विशेष प्रसिद्ध आहे. त्यांचे इतर शास्त्रीय कार्य सायंटिफिक पेपर्स (६ खंड, १८९९–१९२०) या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. त्यातील स्थितीस्थापकीय तरंगांविषयीचा [⟶ तरंग गति] सिद्धांत विशेष उल्लेखनीय आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्येही त्यांनी लेखन केलेले होते. ते एक्सेसमधील विटाम येथे मृत्यू पावले.

                                       भदे, व. ग.