वुड, रॉबर्ट विल्यम्झ : (२ मे १८६८–११ ऑगस्ट १९५५). अमेरिकन भौतिकीविज्ञ.भौतिकीय प्रकाशकीसंबंधी, विशेषतः वर्णपटविज्ञानासंबंधी, केलेल्या कार्याबद्दल सुप्रसिध्द. द्रव्याकडून प्रकीर्णित झालेल्या (विखरून टाकलेल्या) प्रकाशाच्या विश्लेषणाद्वारे द्रव्याचे अध्ययन करण्याच्या उपयुक्त तंत्राला रामन वर्णपविज्ञान म्हणतात. त्यांनी या तंत्राचा व्यापक उपयोग केला [ → वर्णपटविज्ञान]. त्यांना मिळालेल्या अत्यंत महत्त्वाच्या प्रायोगिक निष्कर्षांमुळे अणुभौतिकीच्या विकासाला मदत झाली. त्यांनी ध्वनितरंगांचे छायाचित्रण, श्राव्यातीत प्रारणाचे (ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असलेल्या तरंगरूपी ऊर्जेचे) गुणधर्म, रंगीत छायाचित्रण, ⇨रेणवीय भौतिकी, ⇨जीवभौतिकी, अतिपरिशुध्द विवर्तन जालक तयार करणे, अनुस्फुरण (प्रारणाने वा इलेक्ट्रॉनांच्या प्रभावाने द्रव्याकडून प्रकाशाचे उत्सर्जन होण्याची क्रिया) आणि वैज्ञानिक पध्दतीने गुन्हाशोध अशा वैज्ञानिक व तांत्रिक क्षेत्रांमध्ये मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.

वुड यांचा जन्म काँकर्ड (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांनी हार्व्हर्ड महाविद्यालयात शिक्षण घेतले व १८९१ साली त्यांना रसायनशास्त्र विषयातील बी.ए. पदवी मिळाली. त्यांनी जॉन्स हॉपकिन्स, शिकागो व बर्लिन विद्यापीठांत तसेच मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत अध्ययन केले. लवकरच ते रसायनशास्त्राकडून भौतिकीकडे वळले आणि १८९७ मध्ये त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठात अध्यापनास सुरूवात केली. विद्युतीय क्षेत्रात असलेल्या संवाहकांकडून विद्युत्‌ भारित कण उत्सर्जित होतात, असे त्यांना सर्वप्रथम आढळले (१८९७). या विद्युत्‌ भारित कणांना क्षेत्र-उत्सर्जन म्हणतात. १९०१ मध्ये बॉल्टिमोर (मेरिलंड) येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात हेन्री ऑगस्टस रोलंड यांच्या जागेवर प्रायोगिक भौतिकीचे प्राध्यापक म्हणून वुड यांची नेमणूक झाली. १९३८ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही वुड यांनी तेथे शेवटपर्यंत प्रायोगिक भौतिकीचे संशोधन प्राध्यापक म्हणून काम केले.

वुड हे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात प्रकाश हा विषय शिकवीत. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ वायू आणि बाष्प प्रकाशीय गुणधर्मांवर मुख्यतः मूलभूत संशोधन केले. विशेषतः सोडियम बाष्पावरील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. बोर सिध्दांत वुड आणि इतरांनी पुरविलेल्या वर्णपटविज्ञानीय प्रदत्तावर (माहितीवर) मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. १९०३–२० या काळात वुड यांनी वर्णपट रेषांवर विद्युत्‌ व चुंबकीय क्षेत्रांचा होणारा परिणाम, अनुस्फुरण आणि बाष्पांचे अनुस्पंदन प्रारण या विषयांवर मूलभूत प्रायोगिक कार्य केले. त्यांनी विवर्तन जालकात सुधारणा करून (उदा.अगदी जवळ असलेल्या रेषा आखणे) प्रकाशीय वर्णपटविज्ञानातील संशोधनाला मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले. त्यांनी वर्णपटमापन पध्दतीमध्ये केलेल्या सुधारणा खगोल भौतिकीमध्ये उपयुक्त ठरल्या आहेत. त्यांनी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या इतर वर्णपटमापक पध्दतीतही सुधारणा केल्या. रंगीत छायाचित्रणाच्या विवर्तन पध्दतीसंबंधी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ड्रेझ्डेनच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सन्माननीय पदक मिळाले.

पहिल्या महायुध्द काळात आणि १९२०–३० या दशकात त्यांनी उच्च कंप्रता (कंप्रता म्हणजे दर सेकंदास होणार्याम कंपनांची संख्या) ध्वनी तरंग आणि त्यांचे भौतिकीय व जीवविज्ञानीय गुणधर्म यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांनी ए. एल्. लूमिस यांच्या सहकार्याने टकसीडो पार्क लॅबोरेटरीमध्ये अनेक प्रयोग केले. या प्रयोगांना १९३७ मध्ये ब्राउन विद्यापीठात देण्यात आलेल्या क्लोव्हर व्याख्यानांनी आणि त्यावर आधारित सुपरसॉनिक्स, द सायन्स ऑफ इनऑडिबल साउंड्स (१९३९) या पुस्तकाने चांगली प्रसिध्दी मिळाली.

वुड यांचे फिजिकल ऑप्टिक्‌स (१९०५) हे पुस्तक त्या काळातील प्रायोगिक दृष्टिकोन असलेले अभिजात पुस्तक होते. हाऊ टू टेल द बर्ड्‌स  फ्रॉम द फ्लॉवर्स अँड अदर वुडकट्स  हा त्यांचा निरर्थिकांचा किंवा बडबड गीतांचा (नॉंन्सेन्स व्हर्स) संग्रह १९०७ मध्ये प्रसिध्द झाला. त्यांना अनेक सन्माननीय पदव्या आणि पदके मिळाली.

वुड ॲमिटीव्हिल (न्यूयॉर्क राज्य) येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.