ब्रॉका, प्योअरपॉल : (२८ जून १८२४-९ जिलै १८८०). फ्रेंच शस्त्रक्रियाविशारद व भौतिकीय मानवशास्त्रज्ञ (मानवजातीचे जीववैज्ञानिक स्वरूप आणि त्याचे ऐतिहासिक अथवा सांस्कृतिक स्वरूपांशी असणारे संबंध यांविषयीच्या शास्त्रातील तज्ञ). डोक्याची कवटी आणि मेंदू यांवरील संशोधनाबद्दल ते विशेष प्रसिद्ध असून मेंदूवरील आधुनिक शस्त्रक्रिया तंत्राचा पाया रचणारे शास्त्रज्ञ म्हणून ते नावाजले जातात.
ब्रॉका यांचा जन्म सेंट फॉय-इन-ग्रांद (फ्रान्स) येथे झाला. १८४१ मध्ये पॅरिस विद्यापीठाच्या वैद्यकीय शाळेत त्यांनी प्रवेश केला. पदवी परीक्षेकरिता त्यांनी शरीररचनाशास्त्र, विकृतिविज्ञान व शस्त्रक्रियाविज्ञान या विषयांचा विशेष अभ्यास केला होता. १८४९ मध्ये त्यांनी एम्. डी. पदवी मिळविली. १८५३ मध्ये त्यांची पॅरीस विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेत साहाय्यक प्राध्यापक व सेंट्रल ब्यूरोमध्ये शस्त्रक्रियाविशारद म्हणून नेमणूक झाली. पॅरिसमधील ॲनॅटॉमिंकल सोसायटी आणि सोसायटी ऑफ सर्जरी या संस्थाचे ते क्रियाशील सभासद होते. पॅरिसमधील निरनिराळ्या रुग्णालयांतून काम केल्यानंतर शेवटी त्यांची शस्त्रक्रियाविशारद म्हणून नेकेर रुग्णालयात नेमणूक झाली. १८६७ मध्ये विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेच्या विकृतिविज्ञानाच्या अध्यासनावर त्यांची निवड झाली व पुढील वर्षी ते उपरूग्ण शस्त्रक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले.
ब्रॉका यांनी १८६१ मध्ये मेंदूच्या डाव्या भागातील प्रमस्तिष्क बाह्यकाच्या तिसऱ्या संवेलकात [⟶ तंत्रिका तंत्र]वाक्शक्ती केंद्र असते, असा शोध लावला. या संवेलकाला ‘ब्रॉका संवेलक’आणि वाक्शक्ती केंद्राला ‘ब्रॉका वाक्शक्ती केंद्र’अशी नावे देण्यात आली आहेत. मेंदूतील या विशिष्ट प्रेरक क्षेत्राच्या विकृतीमुळे वाचणे, लिहिणे व बोलणे आणि बोललेले शब्द समजणे या क्रियांत बिघाड उत्पन्न होतो. या विकृतीला ‘ब्रॉका वाचाघात’किंवा ‘प्रेरक क्षेत्र वाचाघात’म्हणतात. मेंदूतील विद्रधीवर (पोकळीत झालेल्या पू-संचयावर) वृत्त-क्रकचशस्त्रक्रिया (कवटीचे हाड विशिष्ट प्रकारच्या करवतीने कापून त्याचा वाटोळा तुकडा काढण्याची शस्त्रक्रिया) करून पू काढणारे ते पहिलेच शस्त्रक्रियाविशारद होते. मेंदूवरील त्यांच्या कार्यामुळे मेंदूतील विविध केंद्रांच्या स्थानीकरणविषयक संशोधनास चालना मिळाली. शरीररचनाशास्त्रात शरीराच्या इतर काही भागांनाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.
मानवशास्त्रातही त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे. या शास्त्राचा पाया घालण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या काळात हे शास्त्र अभद्र व विध्वंसक गणले जाई परंतु सर्व विरोधाला तोंड देऊन त्यांनी त्याला शास्त्रीय जगतात मान्यता मिळवून दिली.
ब्रॉका यांनी १८४७ पासून मस्तकविज्ञान (कवटीचा आकार, लांबी, रुंदी वगैरेच्या मानवजातीतील फरकांचा अभ्यास करणारे शास्त्र) आणि मानवजातिविज्ञान (मानवी वंशांची उत्पत्ती, वर्गीकरण, वैशिष्ट्ये व परस्परसंबंध यांचा अभ्यास करणारे शास्त्र) यांच्या अभ्यासास सुरुवात केली होती. १८५९ मध्ये त्यांनी सोसायटी फॉर अँथ्रॉपॉलॉजी ही संस्था व १८७२ मध्ये Revue d’anthropologieहे नियतकालिक स्थापन करण्यात महत्त्वाचा भाग घेतला. मस्तकविज्ञानाच्या अभ्यासास उपयुक्त अशी २७ उपकरणे त्यांनी शोधली होती.
वैद्यकातील शरीररचनाशास्त्रावर त्यांनी अनेक छोटे निबंध लिहिले होते. विकृतिविज्ञानातील अर्बुदे (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) या विषयावर त्यांनी दोन खंडांचा ग्रंथ लिहिला. याशिवाय पाशबद्ध अंतर्गळ [⟶ अंतर्गळ]आणि ⇨रोहिणीविस्फार या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले. १८५० नंतर मृत्यूपावेतो त्यांनी मानवशास्त्राच्या विविध शाखांविषयक २२३ निबंध व व्याप्तिलेख लिहिले.
वैद्यकीय व शास्त्रीय जगतात ते एक मान्यवर व्यक्ती म्हणून नावाजले होते. मृत्यूसमयी फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ मेडिसिन या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. फ्रेंच सिनेटवर आजीव सभासद म्हणून त्यांची निवड झाली होती. ते पॅरिस येथे मरण पावले.
भालेराव, य. त्र्यं.