ब्रह्मावर्त:(१) उत्तर भारतातील एक प्राचीन प्रदेश. सिंधू नदीच्या सरस्वती व दृशद्वती या ईशान्य-नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या प्राचीन नद्यांदरम्यानचा (२९० उ. अक्षांश व ७४० ते ७६० पू. रेखांशांदरम्यान) ही प्रदेश विद्यमान हरयाणा व दिल्ली यांच्या सरहद्दीवर होता असे मानतात. भागवत पुराणा तील उल्लेखावरून या प्रदेशात अनेक अश्वमेघ यज्ञ झाल्याने याला ‘ब्रह्मावर्त’असे नाव पडले. मनुस्मृतीत हा प्रदेश मनूचा व पुढे त्याच्या वंशजांचा देश होता, असा उल्लेख असून येथील लोकांच्या पारंपारिक आचाराला ‘सदाचार’असेही म्हटले आहे. आर्यांनी भारतात आल्यावर याच प्रदेशात वसाहती करून अन्य प्रदेश जिंकले. त्यानंतर हा भाग ‘कुरुक्षेत्र’या नावाने ओळखला जाऊ लागला. मेघदूता तील उल्लेखावरून कुरुक्षेत्र हा ब्रह्मावर्तातील एक भाग होय. या प्रदेशाची राजधानी कालिका पुराणा नुसार दृशद्वती नदीकाठावरील करवीरपुर ही असावी तर भागवत पुराणा तील उल्लेखानुसार बर्हिस्मती ही राजधानी असावी. सरहिंद प्रांत म्हणजे पूर्वीचा ब्रह्मावर्त प्रदेश असेही मानले जाते.
(२) उत्तर प्रदेश राज्याच्या कानपूर जिल्ह्यातील विठूर हे शहर ‘ब्रह्मावर्त’किंवा गंगा नदीच्या काठावरील ‘ब्रह्मावर्त तीर्थ’या नावांनी ओळखले जाते. घाट, मंदिरे, निवासस्थाने यांसाठी हे प्रसिद्ध आहे. येथील ‘ब्रह्मघाट’प्रमुख असून तो अयोध्येच्या नबाबाचा मंत्री राजा टिकायतराय याने बांधला. हा घाट भव्य सार्सानिक वेशींसाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावास येथेच नजरकैदेत ठेवले होते. शहरात कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते.
चौंडे, मा. ल.