बिंदुसर : भारतातील प्राचीन तीर्थस्थान. बिंदुसर म्हणजे बिंदू सरोवर. भारतातील विविध स्थळांचा निर्देश या नावाने केलेला आढळतो. हे सरोवर नेमके कोणत्या ठिकाणी आहे, याबाबत अनेक मते आहेत. योगिनीतंत्रानूसार हे सरोवर हिमालयात गंगोत्रीच्या दक्षिणेला सु. ३ किमी.वर आहे. ब्रह्मांडपुराणातही त्याचा उल्लेख आलेला असून हे कैलास पर्वतश्रेणीच्या उत्तरेस गौड पर्वताच्या पायथ्याशी असावे, असे म्हटले आहे. भगीरथ, इंद्र व नारायण यांनी या सरोवराकाठी तपश्चर्या केली असे मानतात.

प्राचीन एकाम्रकानन प्रदेशातील सरोवर सध्याच्या कटकच्या दक्षिणेस ३२ किमी.वर असल्याचे मानतात. लोकांच्या कल्याणासाठी शिवाने सर्व तीर्थांमधील पाण्याचे बिंदू या सरोवरात आणून टाकले, म्हणून यास बिंदुसर हे नाव पडले, असा उल्लेख ब्रह्मपुराणात आहे तर पद्मपुराणात भुवनेश्वर येथील बिंदू सरोवराचा तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख असून ते बिंदुसागर, गोसागर या नावांनीही ओळखले जाते. येथे शंकराने आपल्या त्रिशूळाने पाताळातून पाणी काढून, भुवनेश्वराच्या कृत्ती व वास नावाच्या असुरांशी युद्ध करून थकलेल्या भगवतीची (पार्वती) तहान शमविली, अशी आख्यायिका आहे. हिंदूंना हे स्थान अत्यंत पवित्र वाटते. नारदपुराणाप्रमाणे सध्याच्या वाराणसीतील कपालमोचन तीर्थ म्हणजे प्राचीन बिंदुसर, शिवाच्या हाताला चिकटलेले ब्रह्मकपाल (उंच शिलाखंड) याच सरोवरात स्नान केल्याने गळून पडले, अशी ही आख्यायिका आहे.

भागवतपुराणातील उल्लेखानुसार कर्दम ऋषीला भगवान विष्णू उपदेश करीत असताना दयार्द्र झालेल्या विष्णूच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले व त्याचेच पुढे बिंदू सरोवर बनले. गुजरातमधील अहमदाबादच्या वायव्येस सीतापूर किंवा सिद्धपूरजवळ हे आहे.

नीलमतपुराणानुसार आधुनिक काश्मीरमधील पूर्वेकडील भागात बिंदुसर असून दिग्पाल असा याचा उल्लेख केला आहे. पुराणांत उल्लेखिलेले गंगेचे सात प्रवाह (नलिनी, ह्‌लादिनी, पावनी, शीला, चक्षू, सिंधू व अमिता) बिंदुसागरातून उगम पावतात, अशी समजूत आहे.

संकपाळ, ज. बा. पंडित, अविनाश