ब्रह्मपुरी(कोल्हापूर) : महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंचगंगा नदीच्या उजव्या काठावर ते वसले आहे. या स्थळाची पाहुणी आर. एस्. पंचमुखी व के. जी. कुंडणगार यांनी प्रथम केली. कुंडणगार यांनी कोल्हापूर संस्थानकडून परवानगी घेऊन येथील उत्खननाचे नियोजन केले आणि नोव्हेंबर १९४४ मध्ये उत्खननास प्रारंभ केला. या चाचणी उत्खननात त्यांना धातूचे दोन मोठे हंडे, कढई, चूथा वगैरे वस्तू सापडल्या. यांशिवाय काही सातवाहन नाणी मिळाली. पुढे या स्थळाचे उत्खनन १९४५-४६ साली डेक्कन कॉलेज, पुणे या संस्थेने केले. उत्खननात सातवाहन काळापासून मोगल काळापर्यंतचे विविध कालखंडांतील अनेक अवशेष मिळाले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात येथे विटांची घरे असलेली नगरी होती. या नगरीची सुरुवात याही पूर्वीच्या काळात झाली असावी, असे पुरातत्त्वीय अवशेषांवरून दिसते. शिवाय सातवाहन राजांची नाणी, काळ्या-तांबड्या रंगांची मृद्भांडी या वस्तीच्या स्तरात सापडली. येथील स्तरात रोमन देवतांचे पुतळे, ब्राँझची भांडी, रोमन पुतळ्या व काचसामान यांचे विविध नमुने सापडले. त्यांवरून इ.स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत ब्रह्मपुरीचे रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होते, असे दिसून येते. यानंतर बराच काळ ब्रह्मपुरीला वस्ती झाली नाही. इसवी सनाच्या अकराव्या बाराव्या शतकांतील शिलाहार राजांच्या वेळी ब्रह्मपुरीला पुन्हा वस्ती झाली. या काळातील वास्तू मातीच्या विटांच्या बांधलेल्या आढळतात. यानंतरच्या बहमनी काळात येथील वास्तू शिलाहारांप्रमाणेच होत्या परंतु बहुरंगी काचेच्या बांगड्या बनविण्याचा कुटिरोद्योग येथे भरभराटीत होता, असे दिसते. या वस्तीचा नाश पंचगंगा नदीच्या पुरामुळे झाल्याचा पुरावा मिळाला. सर्वांत शेवटची वस्ती औरंगजेबाच्या (कार. १६५८ – १७०७) वेळी झाली. पन्हाळ्याच्या स्वारीच्या वेळी औरंगजेबाच्या सैन्याने येथे तळ ठोकून ब्रह्मपुरीच्या टेकाडावर कोट उभा केला होता. येथील बहुतेक अवशेष कोल्हापूरच्या टाउन हॉल संग्रहालयात आहेत.

 

 

 

संदर्भ : 1. Khandalavala, Karl Moti Chandra, Ed. Lalit Kala, April, 1960, Bombay,

           2. Sankalia, H. D. Dikshit, M. G. Excavations at Brahmapuri (Kolhapur) 1945 – 46, Poona, 1952.

देव, शां. भा.