ब्रह्मपुर : विद्यमान ब्रह्मौर. हिमाचल प्रदेश राज्याच्या चंबा जिल्ह्यातील एक प्राचीन व इतिहासप्रसिद्ध ठिकाण. हे भरमौर या नावानेही ओळखले जाते. हे गाव चंबा शहराच्या आग्नेयीस सु. ६३ किमी. वर बुधिल या रावी नदीच्या उपनदीवर वसलेले आहे. चंबा संस्थानाची (पूर्वीचे ब्रह्मपुर राज्य) सुरुवातीची राजधानी ब्रह्मपुर येथे वसविण्यात आली होती.
बुधिल खोऱ्याची स्थानिक देवता म्हणून मानल्या जाणाऱ्या ब्राह्मणी देवीच्या नावावरून यास ‘ब्रह्मपुर’ हे नाव पडले असावे. कनिंगहॅमच्या मते ब्रह्मपुर हे वैराटपट्टणचेच दुसरे नाव असावे. प्राचीन ब्रह्मपुर राज्याविषयी चिनी प्रवासी ह्यूएनत्संगच्या प्रवासवर्णनातही उल्लेख आढळतो. चंबा संस्थानाच्या प्रदेशात केलेल्या उत्खननात सापडलेल्या शिलालेख व ताम्रपटावरून हे शहर सहाव्या शतकात मारुत नावच्या सूर्यवंशी राजपूत राजाने वसविले आहे. सातव्या शतकात मेरूवर्मा राजाने या राज्याचा विस्तार केला. चंबा शहराची स्थापना होईपर्यंत (इ. स. ९२०) ब्रह्मपुर गाव या राज्याची राजधानी होती. येथील दगडी बांधकाम असलेली मणिमहेश (शिवाचा अवतार) व नरसिंह यांची प्राचीन मंदिरे प्रसिद्ध असून मणिमहेश मंदिरात १४१७ सालच्या शिलालेख आहे. यांशिवाय कोरीवकाम असलेले लक्षणा देवीचे लाकडी मंदिरही प्रसिद्ध आहे.
“