ब्योल, ङाइन्रिख : (२१ डिसेंबर १९१७ – ). जर्मन कथा-कादंबरीकार. जन्म कोलोन्य येथे. कोलोन्य विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सेनादलात सैनिक म्हणून तो भरती झाला युद्धाची विध्वंसकता त्याने प्रत्यक्ष अनुभवली. युद्धानंतर कोलोन्य येथे परतल्यावर त्याने स्वतःला लेखनासच वाहून घेतले आणि आपल्या कथा-कादंबऱ्यांतून युद्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे दर्शन त्याने विविधांगांनी समर्थपणे घडविले. ‘डेर त्सूग वार प्युंक्टलिझ’ (१९४९, इं. भा. ‘द ट्रेन वॉज ऑन टाइम’, १९५६) ही दीर्घकथा लिहून त्याने आपल्या वाङमयीन कारकीर्दीचा आरंभ केला. युद्धावरून परतलेल्या परंतु मृत्युभयाने पछाडलेल्या एका सैनिकाची ही कथा आहे. ह्या कथेतून ब्योलची युद्धाविरोधी भूमिका स्पष्टपणे प्रत्ययास येते. वाण्डरर, कोम्सट डू नाख श्पा (१९५०, इ. शी.) ह्या त्याच्या कथासंग्रहात युद्धविरोधी भूमिकेतून लिहिलेल्या त्याच्या उत्कृष्ट कथा संग्रहीत आहेत. वो वार्स्ट डू आडाम ? (१९५१, इं. भा. अँडम, व्हेअर आर्ट दाउ ? १९५५) ही ब्योलची पहिली कादंबरी. जर्मनीने रूमानियातून घेतलेली माघार आणि विस्कटून गेलेले जर्मन सैन्य ह्यांच्या चित्रणातून युद्धामागील अविवेक ब्योलने स्पष्टपणे दाखवून दिला आहे. उण्ट झाग्ट डकाइन आइनत्सिगेस वोर्ट (१९५३, इं. भा. अक्वेंटेड विथ द नाइट, १९५४) ह्या त्याच्या त्यानंतरच्या कादंबरीत बाँबहल्ल्याने उद्ध्वस्त झालेले एक शहर दाखविलेले असून युद्धोत्तर काळातील जीवनाचा वेध एका दांपत्याच्या वैवाहिक जीवनाच्या चित्रणातून तीत घेतलेला आहे. ढासळलेल्या मानसिक अवस्थेत युद्धावरून परत आलेला नवरा आणि मोठ्या धैर्याने व संयमाने त्याला साभाळून घेणारी पत्नी ह्या कादंबरीत दिसते. अखेरीस ह्या दांपत्याच्या वैवाहिक स्वास्थयाला निर्माण झालेला धोका टळतो. खडतर प्रसंगांतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य माणसांना धर्मश्रद्धेतून लाभते, असा सूर ह्या कादंबरीतून प्रत्ययास येतो. हाउस ओन ह्यूटर (१९५४, इं. भा. द अन्गार्डेड हाउस, १९५७) ह्या कादंबरीतही कौटुंबिक जीवनातील ताणतणाव सशब्द केलेले आहे. युद्धात ज्यांचे वजडील मारले गेले आहेत, अशा दोन शाळकरी मुलांचे आणि त्यांच्या विधवा मातांचे उधळून गेलेले दुःखी जीवन ब्योल प्रभावीपणे चित्रित करतो. ह्या दोन विधवांपैकी एक चित्रपटांच्या खोटया जगात आपले मन रमविण्याचा प्रयत्न् करते, तर दुसरी निरनिराळ्या पुरूषांच्या संगतीत आपल्या मनाचे रितेपण नाहीसे करण्याची धडपड करीत राहते. ह्या परिस्थितीमुळे त्या दोन मुलांच्या भावजीवनालाही धक्का पोहोचतो. बिलिआर्ड उम हाल्बस्सेन (१९५९, इं. भा. बिल्यर्डस अँट हाफ पास्ट नाइन, १९६२) आणि आनझिश्टेन आयनेस क्लाउन्स (१९६३, इं. भा. द क्लाउन, १९६५) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या. बिल्यर्ड्स अँट हाफ पास्ट नाइनमध्ये एका सुखवस्तू जर्मन कुटुंबातील तीन पिढ्यांचा इतिहास प्रतिकात्मक पद्धतीने मांडलेला आहे, तर द क्लाउनमध्ये रोमन कॅथलिक धर्मश्रेष्ठींचा दांभिकपणा उघड केलेला आहे. ग्रुप्येनथिल्ड मिट डाम्अ (१९७१, इं. भा. ग्रूप पोट्रेट विथ ए लेडी, १९७३) ह्या ब्योलच्या एका प्रायोगिक कादंबरीत बऱ्याच लोकांनी एकाच स्त्रीचे केलेले वर्णन आहे. तथापि ह्या वर्णनातून ब्योलने पहिल्या महायुद्धापासूनचे जर्मन जीवन प्रत्ययकारीपणे उभे केले आङे.