बौद्ध दर्शन : बौद्ध धर्माची मुख्य तत्त्वे सर्वांत जुना संप्रदाय म्हणून मान्यता पावलेला स्थविरवाद किंवा थेरवाद यामध्ये मांडली आहेत. बौद्ध धर्माच्या पुढील इतिहासात अनेक स्थित्यंतरे झाली व त्यामुळे त्यांच्या जगासंबंधीच्या कल्पनेत, दुःखमुक्त होण्याच्या साधनासंबंधीच्या कल्पनेत व समग्र तत्त्वज्ञानातही फेरफार घडून आले, हे पुढील मजकुरावरून ध्यानात येईल.
त्यात बुद्धाचे मानवी अस्तित्व मान्य केलेले आहे. त्यात सांगितलेले बुद्धाचे स्वरूप, त्याची शिकवण, त्याची तत्त्वे ही खुद्द बुद्धाच्या स्वरूपाला, शिकवणीला किंवा तत्त्वांना सर्वांत नजीक व अधिक विश्वसनीय मानली जातात. ह्याचे कारण त्यात बुद्धाचे लोकोत्तरत्व, त्याची अद्भूत चमत्कार करण्याची शक्ती ह्यांना कमी महत्त्व दिलेले आहे. त्याच्या ठिकाणी असामान्य गुण व काही दिव्य शक्ती असल्या, तरी तो मनुष्यप्राणी होता ही भूमिका स्पष्ट आहे. म्हणून पाली त्रिपिटक मान्य करणारे थेरवादी किंवा स्थविरवादी ह्यांच्या बौद्ध तत्त्वज्ञानासंबंधीच्या कल्पना येथे प्रथम दिल्या आहेत.
पाली त्रिपिटक ग्रंथातच वर सांगितलेल्या ‘नामरूपा’संबंधीच्या कल्पनांचा विकास आढळतो. नामरूप म्हणजेच पाच स्कंधरूप व नामाखाली अंतर्भूत झालेले चार स्कंध म्हणजे वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान. ह्यात विज्ञानालाच महत्त्व आहे. विज्ञान आले की त्याच्या अनुषंगाने वेदना, संज्ञा, संस्कार ही येतातच. जग नामरूपात्मक आहे म्हणजेच पंचस्कंधात्मक आहे. ह्या नामरूपाची पुढे आणखी फोड झाली-द्वादश आयतनांत व अठरा धातूंत.
आयतन (१२) अध्यात्म (६) बाहिर (६) |
धातू (१८) |
||||||
रूप |
{ |
चक्षू श्रोत्र घ्राण जिव्हा काय |
रूप शब्द गंध रस स्पर्श |
चक्षु – धातू श्रोत्र ” घ्राण ” जिव्हा ” काय ” |
चक्षू विज्ञान धातू श्रोत्र”” घ्राण”” जिव्हा ”” काय”” |
रूप शब्द गंध रस स्पर्श |
धातू ” ” ” ” |
नाम |
{ |
मन |
‘धर्म’ |
मनो ” |
मनो विज्ञान धातू |
‘धर्म धातु’ |
नामरूपाचेच क्रमाक्रमाने पाच स्कंधांत, बारा आयतनांत व अठरा धातूंत विकसन झाले. बौद्धांच्या पाली ग्रंथांत ह्या स्कंधांचा, आयतनांचा व धातूंचा उल्लेख वरचेवर येतो. ह्यांचे यथार्थ ज्ञान हवे. अशा रीतीने बुद्धाच्या मते ह्या जगाच्या बुडाशी एक तत्त्व नसून अनेक तत्त्वे आहेत. ही क्रमाक्रमाने दोन, पाच, बारा, अठरा अशी झाली. ह्याच्याशी पुढची अवस्था म्हणजे ही तत्त्वे ५५ झाली. अभिधम्मट्ठसंगह नावाचा अनुरुद्धाचार्याने लिहिलेला (आठवे ते बारावे शतक) छोटासा ग्रंथ आहे. ह्यात अत्यंत पद्धतशीर रीतीने ह्या ५५ तत्त्वांचे स्पष्टीकरण आहे. ही ५५ तत्त्वे म्हणजे चित्त १, चैतसिक ५२, रूप १ व असंस्कृत धातू किंवा निर्वाण १. एकूण ५५ ह्या ५५ तत्त्वांच्या बाहेर काही नाही.
ह्या ५५ तत्त्वांचे यथार्थ ज्ञान होण्याला शीलसंपन्न होऊन समाधीचा मदत घ्यावी लागते. समाधी अगदी आवश्यकच आहे असे नाही पण समाधीने चित्त स्थिर होण्याला फार मदत होते. म्हणून अभिधर्माच्या मताप्रमाणे ५ प्रकारची रूपावचर व ४ प्रकारची अरूपावचर समाधी संपादन करावी लागते. बुद्धाने चित्तशुद्धीला फार महत्त्व दिले आहे. म्हणून ह्या ५५ तत्त्वांपैकी चित्त व चैतसिकांची छाननी ह्या थेरवादी संप्रदायात फार केलेली आहे. लौकिक भव म्हणजे कामभव, रूपभव, अरूपभव ह्यात निरनिराळ्या अवस्थांत आढळून येणारे चित्त व त्या बरोबरचे चैतसिक धर्म ह्याचे विश्लेषण फार खोलपर्यंत केलेले आहे तसेच लोकोत्तर चित्ताचे व चैतसिक धर्माचेही. लौकिक कामावचर चित्त हे कुशल (चांगले) किंवा अकुशल (वाईट) असते. पण कामावचरभूमीतील लोकोत्तर चित्त ह्याला कुशल किंवा अकुशल असे म्हणता येत नाही. ते बऱ्यावाईट कर्माचे विपाकात्मक किंवा फलधारण न करणारे क्रियात्मक आहे. याला अ-व्याकृत असे नाव दिले आहे. कारण लोकोत्तर चित्त असलेल्या माणसांच्या कृती ह्या क्रियामात्र आहेत. त्यांना फलप्राप्ती नाही. अकुशल कृत्ये लोभ किंवा द्वेष व मोहांनी प्रेरित झालेली असतात आणि कुशल कृत्ये ह्याच्या उलट अलोभ किंवा अद्वेष व अमोहांनी प्रेरित झालेली असतात. ह्या जगातील निरनिराळ्या प्रकारच्या चित्तांची गणना ८९ आहे. त्याची वाटणी खाली दिलेल्या कोष्टकावरून कळून येईल :
(ह्याच्या पुढील विभाजन विस्तारभयास्तव येथे दिले नाही.)
ह्यापैकीच्या प्रत्येक चित्ताबरोबरच ५२ चैतसिकांपैकी कोणकोणते चैतसिक धर्म असतात हे सविस्तरपणे सांगितलेले आहे. नंतर ‘रूप’. रूप हे व्यक्तीचे शरीर व बाहेर दिसणारी सर्व सृष्टी ह्याचे विश्लेषण केल्यास ते २८ प्रकारचे आहे. शेवटी निर्वाण. हे असंस्कृतधर्मी आहे, कारण ते कोणी केलेले नाही. बाकीची सर्व ५४ तत्त्वे ही संस्कृत आहेत म्हणजे निरनिराळ्या कारणांपासून अस्तित्वात आलेली आहेत तसचे अनित्य व विपरिणामधर्मी आहेत. निर्वाण हे अस्तिपक्षी असले, तरी ते अनिर्वचनीय आहे. म्हणून त्याचे वर्णन नाही.
प्रतीत्य-समुत्पाद : बौद्ध धर्म हा ब्राह्मण धर्मीयांनी श्वेताश्वतर उपनिषदात (३-१३) म्हटल्याप्रमाणे माणसाच्या शरीरात हृदयाशेजारी अंगुष्ठमात्र स्वरूपात सदोदित राहणारा, नित्य व शाश्वत असा मानला गेलेला ‘आत्मा’ मान्य करीत नाही. आत्मा नाही, तेथे परमात्मा नाही हेही ओघानेच आले. तेव्हा हे संसारचक्र कसे चालते, ह्याचे स्पष्टीकरण प्रतीत्य-समुत्पादात आहे. हे संसारचक्र असे आहे, की त्याचा आदी व अंत कोठे आहे हे सांगता येत नाही. ‘अनमतग्गो अयं भिक्खवे, संसारोभिक्षूंनो हा संसार असा आहे त्याची टोके कोठे आहेत हे मुळीच माहीत नाही (अनु+अ+मत)’. तेव्हा हे संसारचक्र कसे फिरत राहते एवढ्याच प्रश्नाचे उत्तर प्रतीत्य-समुत्पादात आहे. समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होणे. हे उत्पन्न होणे दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीवर अवलंबून (प्रतीत्य) आहे. कारणांवाचून एखादी गोष्ट उत्पन्न होत नाही. कारणे आली, की कार्यही ठरलेलेच. प्रतीत्य-समुत्पादात ह्या संसारचक्राची कार्यकारणपरंपरा सांगितलेली आहे. हा चालू जन्म मागील जन्मातील कारणपरंपरेचे कार्य आहे व पुढील जन्माची कारणपरंपरा ह्यात साठवलेली आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कसा संबंध राहतो, हे ह्यात दाखविले आहे.
मागील जन्मात (१) ‘अविद्ये’ने प्रभावित होऊन माणूस भले-बुरे कर्म करतो ह्या कर्मालाच (२) ‘संस्कार’ असे पारिभाषिक नाव आहे. ह्या मागील जन्मीच्या संस्काराचे म्हणजे कर्माचे फळ म्हणून तो या जन्मी येतो म्हणजे (३) ‘विज्ञान’ अस्तित्वात येते. विज्ञानाला काही तरी अधिष्ठान पाहिजेच असते. ते रूपाच्या स्वरूपात उपलब्ध होते. म्हणजे पुढील पायरी (४) ‘नामरूप’ अशी तयार झाली. नामरूप आले म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे (आध्यात्मिक) आयतने (५) ‘षडायतने’ आली. ही आध्यात्मिक आयतने म्हणजे पंच इंद्रिय व मन. ही अस्तित्वात असली म्हणजे त्यांच्या त्यांच्या विषयांशी संबंध येऊन (६) ‘स्पर्श’ हा मागोमाग येतोच. स्पर्श आला म्हणजे त्यापासून सुख, दुःख किंवा उपेक्षा अशा तऱ्हेची (७) ‘वेदना’ ही आलीच. येथे एक महत्त्वाचा टप्पा आहे. मागील जन्मीच्या संस्कारांचे फल म्हणून विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श आणि वेदना ही पाच अंगे अटळ आहेत. मागील जन्मीच्या कर्मभवाचे फल म्हणून ही पाच अंगे ह्या जन्मीचे उपपत्ति-भव बनवतात. ह्या ठिकाणी माणसाच्या कर्तृत्वाला वाव नाही. पण आता वेदनेपासून (८) ‘तृष्णा’ उत्पन्न होऊ द्यावयाची की नाही, हे प्रत्येक मनुष्याच्या हातात आहे. जर त्याने तृष्णेचा समूळ नाश केला, तरी पुढील अंगांना वावच न राहल्याने पुनर्जन्म नाही पण वेदनेपासून तृष्णा उत्पन्न होऊ दिल्यास, पुढे (९) ‘उपादान’ येते. म्हणजे एखाद्या गोष्टीला चिकटून राहण्याची वृत्ती, आसक्ती उत्पन्न होते. ही आसक्ती उत्पन्न झाली म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आसक्ती उत्पन्न झाली, ती गोष्ट मिळविण्याकरिता खटपट, धडपड व आवश्यक ती क्रिया होऊ लागते. ह्यालाच (१०) ‘भव’ किंवा ‘कर्म-भव’ असे नाव आहे. तृष्णा, उपादान व भव ही तीन अंगे क्रियाशील असल्याने ह्या जन्मीचे कर्म-भव बनतात. ह्याच्यानंतर, ह्या जन्मीच्या कर्माचा विपाक म्हणून (११) पुढील जन्म (‘जाति’) येतो व पुढील जन्म प्राप्त झाला म्हणजे त्याच्या मागोमाग (१२ ) ‘शोक-परिदेव-दुःख-दौर्मनस्य-उपायास (क्लेश)’ ही येतातच. ही दोन अंगे मागील जन्माचा विपाक असल्याने तीही अटळ आहेत. ह्या बाबतीत मनुष्य अगतिक होतो व ती टाळण्याचा कोणताही प्रयत्न तो करू शकत नाही. असा हा द्वादशांगी प्रतीत्य-समुत्पाद आहे. त्यात तीन संधी आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या अंगांमध्ये एक, सातव्या व आठव्या अंगांमध्ये एक व दहाव्या व अकराव्या अंगांमध्ये एक. ह्या जन्माचा मागील व पुढील जन्मांशी संबंध कसा पोहोचतो, हे ह्यावरून स्पष्ट होते. अशा रीतीने हे संसारचक्र सदोदित कसे चालू राहते ह्याची कल्पना येते. (पृ. ९४६ वरील संसारचक्राची आकृती पहा). ह्या द्वादश अंगांत दुसऱ्या व तिसऱ्या अंगांतील दुवा जरा कच्चा भासतो. आत्म्यासारखा शाश्वत कोणी नसल्याने, मागल्या जन्मातील कर्माचा वारसा नवीन जन्मातील ‘विज्ञाना’ला कसा प्राप्त होतो, ह्याचे स्पष्टीकरण बौद्ध धर्माचे आचार्य खालीलप्रमाणे करतात :
मृत्युशय्येवर पडलेला एखादा माणूस अंगातील शक्ती क्षीण झालेला व विकलेंद्रिय असला आणि त्याचे विज्ञान क्षीण झालेले असले, तरी एखाद्या आलंबनावर अधिष्ठित झालेले असते. मग ते आलंबन, पूर्वी केलेले कर्म किंवा कर्म करण्याचे साधन (कर्मनिमित्त, शेतकऱ्याला नांगर, बैल विद्वानाला पुस्तक, लेखनसाहित्य चोराला लाठी, तलवार वगैरे) किंवा पुढे येणाऱ्या जन्माची आगाऊ सूचना देणारे चिन्ह, गतिनिमित्त (नरकात जाणारा असेल, तर तेथील अग्निज्वाला किंवा सुगती प्राप्त होणार असल्यास तेथील देव-देवतांची उपभोग साधने) असते. अशाच स्थितीत ते विज्ञान च्युत होऊन त्याच कर्माचे, कर्मनिमित्ताचे किंवा गतिनिमित्ताचे अधिष्ठान घेऊन पुढील जन्मातील ‘विज्ञान’ तयार होते. हे मागील तृष्णामूलक कर्माच्या प्रभावानेच तयार होते. हे विज्ञान मागील जन्मीच्या विज्ञानाचे प्रतिरूप असते. ज्याप्रमाणे जुन्या ज्योतीपासून शिलगवलेली नवी ज्योत किंवा शब्दापासून उद्भवलेला पडसाद किंवा बिंबापासून प्राप्त झालेले प्रतिबिंब, त्याप्रमाणे हे नवीन विज्ञान जुन्या विज्ञानाचे प्रतिरूप आहे. ह्यामध्ये जुन्या विज्ञानाचे नव्या जन्मात संक्रमण नाही. तरी पण नवीन विज्ञान हे जुन्या विज्ञानाच्या मदतीखेरीज अस्तित्वात येत नाही. हे नवीन विज्ञान जुन्या विज्ञानाचे वारसदार बनते. ज्याप्रमाणे एखादा राजा मरणापूर्वी एखादा हुकूम सोडून मरण पावतो, त्या हुकूमाप्रमाणे सर्व गोष्टी चालू होतात. त्या तशाच चालू रहाव्यात म्हणून नवीन येणारा राजाही त्या हुकूमाची कदर करतो आणि तो हुकूम आपलाच आहे असू समजून त्याची सर्व जबाबदारी पतकरतो त्याप्रमाणे नवीन विज्ञान मागील जन्मीच्या विज्ञानाची जबाबदारी पतकरते.
थेरवादाचे ग्रंथ पाली भाषेत आहेत. थेरवाद श्रीलंका, ब्रह्मदेश वगैरे देशांत स्थिरावल्यानंतर भारतातून लवकरच लुप्त झाला व सनातनी बौद्धांचे प्रातिनिधिकत्व सर्वास्तिवादालाच करावे लागले. महायान पंथीयांचे विरुद्ध किंवा बौद्धेतर धर्माचार्यांच्या विरुद्ध त्यांनाच सनातनी बौद्ध धर्माची धुरा वाहावी लागली. महायानी बौद्धांनी त्यांना व स्थविरवाद्यांना ‘हिनयान’ असे तुच्छतादर्शक नाव दिले. पण हे नाव स्थविरवाद्यांना किंवा सर्वास्तिवाद्यांना चीड आणणारे असल्यामुळे त्यांच्या ऐवजी श्रावकयान हेच नाव आम्ही स्वीकारत आहोत. हा शब्द महायान ग्रंथांतून वापरलेला आढळतो.
ह्या सर्वास्तिवादातून दोन उपपंथ निघाले : वैभाषिक व सौत्रांतिक. वैभाषिक संप्रदाय काश्मीरात विशेष प्रचलित होता. इ. स. १०० च्या सुमारास वायव्येकडील प्रदेशात राज्य करणाऱ्या कनिष्क राजाचा ह्या वैभाषिक संप्रदायाला फार मोठा आश्रय मिळाला. त्यावेळी ह्या सांप्रदायिकांनी मोठी संगीती (धर्मपरिषद) भरवून त्यांनी बौद्धांच्या मूळ ग्रंथांवर ‘विभाषा’ (टीका) लिहविल्या. ह्या विभाषांचा आधार घेऊन जे आपली मते प्रतिपादित त्यांना वैभाषिक असे म्हणत. ह्याच्या उलट जे केवळ सूत्रांचाच आधार मान्य करीत, त्यांना ‘सौत्रांतिक’ असे नाव पडले.
वैभाषिक ‘सर्वमस्ति’ हे तत्त्व मान्य करीत व ह्या सर्वांत केवळ वर्तमान कालातच असणाऱ्या सृष्टीतील सर्व वस्तूंचा अंतर्भाव होतो असे नसून, भूत व भविष्य कालांतील वस्तूंचाही समावेश होतो, असे ते प्रतिपादित. ह्या सर्व वस्तूंना खरे अस्तित्व आहे व त्यांच्या अस्तित्वाचे ज्ञान प्रत्यक्ष इंद्रियामार्फत होते. ह्या वैभाषिक संप्रदायाच्या मते जगाच्या बुडाशी ७५ तत्त्वे आहेत. ती पुढीलप्रमाणे : चित्त १, चैतसिकाचे दोन प्रकार मानलेले आहेत. चित्त-संप्रयुक्त ४६ व चित्त- विप्रयुक्त असे १४, रूप हे ११ प्रकारांचे आहे असे मिळून संस्कृत धर्म ७२. असंस्कृत धर्म तीन आहेत : प्रतिसंख्यानिरोध १, अप्रतिसंख्यानिरोध १ व आकाश. एकूण ७५ धर्म झाले. ह्या संप्रदायाने, स्थविरवादाने मान्य न केलेला ‘चित्तविप्रयुक्त’ असा एक नवीन वर्ग मानला आहे. पण ह्यापैकी ‘जीवितेंद्रिय’ थेरवाद्यांनी मानलेल्या चैतसिकांत आहेच. थेरवाद्यांच्या मते ‘निर्वाण’ हा एकच असंस्कृत धर्म आहे, तर ह्या संप्रदायाने तीन असंस्कृत धर्म मानलेले आहेत. थेरवाद्यांच्या प्रमाणे ह्या संप्रदायाने सहा हेतू मान्य केलेले आहेत पण थेरवाद्यांच्या २४ प्रत्ययांऐवजी मात्र चारच प्रत्यय मानलेले आहेत. पुनर्जन्म होण्यापूर्वी, मागील जन्माच्या आणि पुढील जन्माच्या मध्ये ‘अंतरा-भव’ नावाची एक स्थिती ह्यांनी कल्पिलेली आहे. वैशेषिक व नैयायिकांप्रमाणे वैभाषिकही अणुवाद मान्य करतात. परमाणू हा सर्वांत सूक्ष्म, पुनर्विभाजन न होऊ शकणारा, अदृश्य, अश्राव्य व स्पृश्य न होऊ होऊ शकणारा आहे. सात परमाणूंचा एक अणू व सात अणूंचा एक रज होतो. मध्ये एक परमाणू व त्याच्या चोहों बाजूस तसेच वरील आणि खालील दिशांस एक एक परमाणू ठेवला म्हणजे सर्व मिळून एक अणू होतो. हा मात्र दिसू शकतो. परमाणू हेच रूपाचे अंतिम स्वरूप असून ते अत्यंत सूक्ष्म आहे. त्याचे लांबरुंद, गोल-चौकोनी, सरळ-वाकडे असे कोणत्याही स्वरूपात वर्णन करता येत नाही.
विश्वोत्पत्तीसंबंधी बौद्ध धर्म मौन बागळत असला, तरी श्रावकयानी बौद्धांच्या विश्वरचनेसंबंधीच्या कल्पना येणेप्रमाणे आहेत : तीन प्रकारचे लोक त्यांनी मान्य केलेले आहेत. कामलोक, रूपलोक व अरूपलोक. अपरूलोकातील देव इतके सूक्ष्म असतात, की ते दिसू शकत नाहीत. रूपलोकातील देव सोळा प्रकारचे आहेत. कामलोकात देव, मनुष्य, नरकवासी पशुपक्ष्यादी प्राणी, भूत-पिशाच व असुर राहतात. कामलोकात अनेक धातू व अनेक चक्रवाळे आहेत. ही पृथ्वी पाण्यात प्रतिष्ठित असून तिला वायूने खाली व वर आधार दिलेला आहे. ह्या पृथ्वीवर सुमेरू नावाचा हजारो योजने खोल रुतलेला महान पर्वत आहे. तो मध्यभागी असून त्याच्याभोवती सात पर्वतराजींची वलये आहेत. त्या सुमेरू पर्वतावर महाराजादी देव, यक्ष वगैरे राहतात. सुमेरू पर्वताच्या दक्षिण दिशेकडे जंबुद्वीप आहे, पूर्वेकडे पूर्व विदेह, उत्तरेस उत्तर-कुरू व पश्चिमेस अपरगोदा (या) न अशी चार भूखंडे आहेत. ह्या प्रत्येक भूखंडाला परिवारद्वीपेही आहेत. ह्या भूखंडातून जंबू, चित्रपाटली, शाल्मली, कदब, कल्प, शिरीष, पारिजातक ह्या नावाचे प्रचंड वृक्षही आहेत. सर्व वलयांच्या बाहेर चक्रवाळाच्या सीमेवर हजारो योजन उंचीची पर्वतराजी आहे. मेरू पर्वतावरच त्रयस्त्रिंशत् देवांपासून उत्तरोत्तर अकनिष्ठ नावाच्या देवांपर्यंतचे देव उत्तरोत्तर थरांवर राहतात.
ह्या मताचा मूलप्रणेता कुमारलब्ध मानला जातो. वसुबंधूने आपला अभिधर्मकोश व त्यावरील भाष्य हे काश्मीरी वैभाषिकांच्या पठडीला अनुसरून लिहिले आहे असे जरी त्याने म्हटले असले, तरी तो मधूनमधून आली सौत्रांतिक मताबद्दलची पसंती प्रदर्शित करतो. त्यामुळे त्याला त्याच्या विरोधकांनी ‘छुपा सौत्रांतिक’ म्हणून हेटाळणी केली आहे. बाह्य सृष्टीला खरे अस्तित्व आहे. एवढ्यावरूनच ह्या संप्रदायाचा सर्वास्तिवादाशी संबंध जोडला जातो असे दिसते.
(१) त्यांच्या मते बुद्धाला वस्तुतः मानुषी अस्तित्व नसून तो सर्वस्वी लोकोत्तर आहे. हे लोकोत्तरत्व एकदा मान्य केल्यानंतर त्याचे ऐतिहासिक अस्तित्व, त्याचे धर्मोपदेश, निरनिराळ्या प्रसंगी त्याने केलेल्या प्रवचनातील विसंगती ह्या सर्व बाबतींत समन्वय करण्याची आवश्यकता भासली व त्यामुळे त्यांनी आपल्या विचारसरणीतच क्रांतिकारक फेरफार घडवून आणले. एका बुद्ध-कायाऐवजी त्यांनी आता बुद्धाचे तीन काय (धर्मकाय, संभोगकाय, निर्माणकाय) कल्पिले.
(५) महायान पंथाने ‘करुणे’ला फार मोठे महत्त्व दिले आणि त्यामुळे ⇨बोधिसत्त्व हा स्वतः निर्वाण प्राप्त करून घेण्याच्या खटपटीऐवजी इतर लोकांना ते कसे प्राप्त होईल, ह्याची चिंता वाहू लागला. इतर लोकांना निर्वाण प्राप्त होईपर्यंत स्वतःचे निर्वाण थांबविण्यास तो तयार झाला. ह्या ‘करुणे’चा अतिरेक होऊन कालांतराने काही सामाजिक अनिष्ट प्रथेला वाव मिळाला. बुद्धाच्या ऐवजी बोधिसत्त्वाचेच उदाहरण डोळ्यापुढे ठेवण्यात येऊ लागले. बोधिसत्त्व दान, शील, क्षांती, वीर्य, ध्यान व प्रज्ञा ह्या पारमितांचे आचरण करून जनतेचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करीत. ह्याचाच परिणाम आतापर्यंत निवृत्तिपर असलेला बौद्ध धर्म प्रवृत्तिपर बनला.
(६) महायान पंथ प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त करून घेण्याची बीजशक्ती असते, असे प्रतिपादू लागला व त्यामुळे एकाच वेळी अनेक बुद्ध असण्याची शक्यता उत्पन्न झाली.
माध्यमिक : महायान पंथाचे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. एक माध्यमिक व दुसरा योगाचार किंवा विज्ञानवाद. माध्यमिक म्हणण्याचे कारण त्यांनी तात्त्विक विचारसरणीत शाश्वतवाद व उच्छेदवाद ही दोन्ही टोके टाळून विपरिणामवादाचा मध्यममार्ग स्वीकारला आहे. ह्या संप्रदायाच्या मते जगातील सर्व गोष्टी सारख्या बदलत आहेत. त्यात फरक पडत असतो म्हणजेच त्या विपरिणामधर्मी आहेत. त्या सारख्या बदलत आहेत. त्यांना स्वतःचे असे स्वतंत्र, निरपेक्ष अस्तित्व नाही. त्या इतर गोष्टींवर अवलंबून आहेत. कोणतीही गोष्ट आपोआप अस्तित्वात येत नाही. तिला कारणपरंपरा आहे. ‘अ’ असला, तर ‘आ’ अस्तित्वात येतो. ‘आ’ दुसऱ्या कारणावर अवलंबून आहे म्हणजे ‘प्रतीत्य-समुत्पन्न’ आहे. ह्याचा अर्थ ‘आ’ ला स्वतःचे अस्तित्व नाही, म्हणजे ‘स्व-भाव’ नाही. ह्यालाच ‘स्व-भाव-शून्य’ असे म्हटले आहे. नागार्जुनानेही म्हटले आहे की ‘य: प्रतीत्य-समुत्पाद: शून्यतां तां प्रचक्ष्महे!’ (मूलमध्यमककारिका २४-१८-‘कारणामुळे जो उत्पाद होतो त्यालाच शून्यता असे आम्ही म्हणतो.’) तेव्हा शून्यता ह्याचा अर्थ स्व-भाव-शून्यता, स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची शून्यता. स्वतःचे निरपेक्ष, स्वयंसिद्ध, स्वतंत्र अस्तित्व नसून ते सापेक्ष, परावलंबी व इतर कारणांवर अवलंबून आहे. माध्यमिकांच्या मते परमार्थतः सर्व धर्म प्रतीत्य-समुत्पन्न असल्यामुळे धर्मशून्यता आहे. ह्यालाच ‘धर्म-नैरात्म्य’ असेही नाव आहे.
‘तथागतो नि:स्व-भावः । निःस्व-भावमिदं जगत्’ (मूल. २२-१६ ‘परमार्थतः बुद्धही नव्हता व त्याने धर्मोपदेशही केला नाही.’). न क्वचित् कस्यचित् धर्मो बुद्धेन देशितः (मूल. २५.२४) व ह्याच अर्थाने गौडपादाचार्यांनीही म्हटले आहे, की ‘नैतद् बुद्धेन भाषितम् l’ (मांडूक्य, ४.९९) अशा रीतीने परमार्थ दृष्ट्या सर्व धर्मांची स्व-भाव-शून्यता निश्चित झाली. परमार्थ सत्य जर कोणते असेल तर ते ‘शून्यता’ म्हणजे क्षणोक्षणी बदलणाऱ्या कारणपरंपरेवर अवलंबून असणारे अस्तित्व. हेच माध्यमिकांचे परम तत्त्व आहे आणि ह्याच दंडकाचे नियम सर्वत्र आहे ह्याचे वर्णन असे आहे : ‘अनिरोधं अनुत्पादं । अनुच्छेदं अशाश्वतम्
अनेकार्थं अन्नानार्थं । अनागमं अनिर्गमम् ।।’
ह्या संप्रदायानेही श्रावकयानी संप्रदायाप्रमाणे बहुविध तत्त्वे मान्य केलेली आहेत पण त्यांतील एकाला –विज्ञानाला–अत्यंत श्रेष्ठत्व दिलेले नाही. विज्ञान ८ प्रकारचे आहे. चैतसिक ५१ प्रकारचे, रूप ११ प्रकारचे, चित्तविप्रयुक्त धर्म २४ प्रकारचे व असंस्कृत धर्म ६ प्रकारचे मानले आहेत. एकूण १०० धर्म आहेत. ह्या संप्रदायाने वैभाषिकांच्या प्रतिसंख्यानिरोध, अप्रतिसंख्यानिरोध व आकाश ह्या तीन असंस्कृत धर्मांत आणखी तीन धर्मांची भर घातली आहे. ते तीन धर्म असे : आनेंज्य, संज्ञावेदयित-निरोध व तथता. ह्या तीन पैकी पहिल्या दोनवरूनच स्पष्ट होते, की ह्या संप्रदायाने ध्यानाला जास्त महत्त्व दिले आहे. ध्यान-समाधीच्या मार्गानेच चित्तशुद्धी मिळवून बोधी प्राप्त करता येते. ह्या मार्गावर दहा टप्पे आहेत. त्यांना ‘भूमि’ असे नाव आहे.
‘विज्ञाना’ ला श्रेष्ठत्व दिले आहे असे म्हणण्याचे कारण ह्या संप्रदायाच्या मते ही बाह्य सृष्टी जी आपणास भासमान होते ती ह्या विज्ञानाच्या कल्पनेमुळे होय. विज्ञान नसेल तर ती सृष्टी असून नसल्यासारखीच आहे. ह्या संप्रदायाच्या मताप्रमाणे आपणास जे ज्ञान होते त्याची स्वरूपे तीन आहेत : (१) परिकल्पित – जे विज्ञानाने कल्पिलेले आहे, (२) परतंत्र – जे ज्ञान सत्य भासणाऱ्या इतर अन्य कारणांवर अवलंबून आहे व (३) परिनिष्पन्न – हे श्रेष्ठ प्रकारचे परमार्थ स्वरूपी आहे. ह्यालाच ‘तथता’ असेही नाव आहे व हे असंस्कृत धर्मात गणले गेले असल्याचे आपण वर पाहिलेच आहे. ह्यांतील पहिली दोन माध्यमिकांच्या संवृत्ती सत्यासारखी आहेत, तर शेवटचे परमार्थ सत्याप्रमाणे आहे.
चक्षू, श्रोत्र, घ्राण, जिव्हा, काय व मन ह्यांमधून कार्यप्रवहण होणारे विज्ञान, ज्याच्यामुळे अनुक्रमे रूप, शब्द, गंध, रस, स्पष्टव्य व ‘धर्म’ ज्ञात होतात, त्याला प्रवृत्तिविज्ञान असे म्हटले आहे. सातव्या प्रकारच्या विज्ञानाला मन अशी संज्ञा आहे व हे राग – द्वेष – मोहादी क्लेशांनी क्लिष्ट होणे शक्य असते. ह्या मनाचे कार्य म्हणजे सदोदित चिंतन करीत राहणे. झोपेतही हे कार्य चालू असते. त्यात खंड पडत नाही. आठवे विज्ञान हे ‘आलय-विज्ञान’ होय. हेही परतंत्र व विपरिणाम धर्मीच आहे. पण ते सृष्टीतील भल्यबुऱ्या सर्व गोष्टींचे भांडार आहे. सर्व सृष्टीचा ह्यांत अंतर्भाव झालेला आहे. बाह्य सृष्टी ही ह्याच आलय-विज्ञानाचे अज्ञानामुळे भिन्न भासणारे स्वरूप आहे. विज्ञान व बाह्य सृष्टी ह्यांतील भेद ज्ञानामुळे नाहीसा झाला, म्हणजेच ग्राह्य-ग्राहक भावाचा लोप होऊन केवळ विज्ञानाच (विज्ञानमात्रता) परमार्थतः अस्तित्वात आहे हे ज्ञान प्राप्त झाले, म्हणजे तथता प्राप्त झाली. लंकावतारसूत्रांत (३.२६) ह्याच विज्ञानमात्रतेला ‘परब्रह्म’ असेही म्हटले आहे. याच सूत्रात अन्य ठिकाणी (१०.९) असे विधान केलेले आहे, की ‘ध्याता, ध्यान, ध्येय, प्रहाण, सत्यदर्शन हे सर्व कल्पनामात्र आहे, हे जो जाणतो तो मुक्त होतो’.
असंगाच्या योगाचार संप्रदायाप्रमाणे ध्यान-समाधीच्या मार्गाने अंतःसृष्टी व बाहेरील सृष्टी ह्यांतील भेद नष्ट करून दोन्हींमधील एकात्मता साध्य होते. रूपावचर समाधी, अरूपावचर समाधी,⇨ब्रह्मविहार ह्या ध्यानाच्या साहाय्याने योगी ज्या विषयावर चिंतन करतो, त्या त्या विषयांशी एकरूप बनण्याचा प्रयत्नर करतो व अशा रीतीने द्वैत नाहीसे करण्याचा प्रयत्नन करतो. विज्ञानवादी, तत्त्वज्ञान दृष्टीने जाणतो, की बाह्य गोष्टींना खरे अस्तित्व नाही, तर बाह्य सृष्टी ही विज्ञान असेल तरच ती अस्तित्वात असल्याचे कळते. म्हणजे ती परतंत्र आहे, तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. विज्ञान व बाह्य सृष्टी भिन्न आहेत असे अज्ञानामुळे भासते. हे अज्ञान नष्ट झाले म्हणजे हा द्वैतभाव नष्ट होतो.
भारताबाहेरील देश : आशिया खंडातील दक्षिणेकडील देशांत म्हणजे श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया व लाओस ह्या देशांत थेरवादच प्रचलित असून थेरवादाचे तत्त्वज्ञान ह्या सर्व देशांना संमत आहे. भारताच्या उत्तरेकडील देशांत म्हणजे सिक्कीम, भूतान, नेपाळ व तिबेट ह्या देशांत महायान व तांत्रिकांचा धर्म प्रचलित आहे. नेपाळमध्ये अद्याप काही लोक आपणास वज्राचार्य म्हणवून घेतात. नेपाळमधील बौद्ध धर्मावर हिंदुधर्माचाही प्रभाव पडलेला असून त्यांचे स्वाभाविक, ऐश्वरिक, कार्मिक व यांत्रिक असे चार संप्रदाय झाले. मंगोलियामध्ये तिबेटी धर्माचा प्रभाव दिसतो. चीन, कोरिया व जपान ह्या देशांतही महायात व तांत्रिक धर्मच प्रामुख्याने प्रचलित झाले. ह्यांत विशेषतः काही धर्मग्रंथांना (उदा.,सद्वर्मपुंडरीक, लंकावतार, मध्यमकशास्त्र, सुखावतीव्यूह वगैरे) महत्त्व देण्यात येऊन त्यांचे उपासक बनणाऱ्यांचे व ध्यान-धर्माचे आचरण करणाऱ्याचे निरनिराळे संप्रदाय बनले.
2. Conze, Edward, Buddhist Thought in India, London. 1962.
3. Das, Gupta, S. N. A History of India Philosophy, Vol. I, Cambridge, 1940.
4. Eliot, Charles, Hinduism and Buddhism, London, 1921.
5. Jayatilleke, K. N. Early Buddhist Theory of Knowledge, London, 1963.
6. Keith A. B. Buddhist Philosophy in India and Ceylon, Oxford, 1923.
7. MacGovern, W. M. A Manual of Buddhist Philosophy, London, 1923.
8. Murti, T. R. V. The Central Philosophy of Buddhism, London, 1955.
9. Rhys Davids, T. W. Buddhism : Its History and Literature, New York, 1927.
10. Slator, R. L. Paradox and Nirvana, Chicago,1950.
11. Stcherbatsky, Th. The Central Conception of Buddhism and the Meaning of the Word Dharna, London, 1923.
12. Suzuki, D. T. Outlines of Mahayana Buddhism, London, 1907.
13. Thomas, E. J. The History of Buddhist Thought, London, 1953.
“