बेवूर, गोपाल गुरुनाथ, जनरल : (११ ऑगस्ट १९१६– ) भारताचे भूतपूर्व भूसेनाध्यक्ष व नामवंत युद्धपटू. शिवनी (मध्यप्रदेश) येथे जन्म. वडिलांचे नाव गुरुनाथराव व आईचे रुक्मिणीबाई असे होते. सर गुरुनाथराव ब्रिटिश सनदी सेवेत होते. स्वातंत्र्यपूर्व कालात ते व्हइसरॉयच्या कार्यकारी समितीचे सदस्य होते. गोपाळराव यांनी डेहराडून येथील भारतीय सैनिकी महाविद्यालय व पुढे भारतीय सैनिकी अकादमी शिक्षण घेतले. सर्वोत्कृष्ट सैनिक स्नातक म्हणून त्यांनी एक सुवर्णपदक व सन्मानदर्शक तलवार पटकावली. १५ जुलै १९३७ रोजी त्यांनी भूसेनेत राजादिषअट अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तत्कालीन प्रथेप्रमाणे ग्रीन हॉवर्डस या गोऱ्या पलटणीत त्यांनी पूर्वानुभव घेतला व नंतर पाचव्या बलूच पायदळ पलटणीत ते दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात मंडाले शहर परत काबीज करण्यात ते सहभागी होते. १९४५ मध्ये त्यांनी क्वेट्टा येथील स्टाफ कॉलेजचा शिक्षणक्रम पुरा केला. तदनंतर गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी समितीचे ते सैनिकी चिटणीस होते. हिंदुस्थानची फाळणी करण्याचे ठरल्यानंतर संरक्षणव्यवस्था पुनर्रचना समितीवर त्यांनी काम केले.
ठरल्यानंतर ते डोग्रा पलटणीत दाखल झाले. १९४७-४८ मध्ये काश्मीरच्या युद्धात त्यांच्या पलटणीने बारमूल, उरी व हाजीपीरपर्यंत मुसंडी मारली. १९४८ ते १९४९ या कालात राष्ट्रीय छात्रसेना संचालक म्हणून तसेच लढाऊ दलाचे ब्रिगेडियर म्हणूनही त्यांनी कार्य केले. २ फेब्रुवारी १९५९ रोजी त्यांस मेजर जनरलचा हुद्दा मिळून पश्चिमी सैनिक कमांडचे चे चीफ ऑफ स्टाफ झाले. १९६१ ते १९६३ मध्ये ते एका पायदळ डिव्हिजनचे मुख्याधिकारी आणि १९६३ मध्ये ते सैनिकी शिक्षण निदेशक होते. नोव्हेंबर १९६४ ते ३ एप्रिल १९६७ याकाळात कोअर कमांडर व तदनंतर १ जुलै १९६९ पर्यंत त्यांनी भूसेनाध्यक्षांचे प्रतिनियुक्त म्हणून काम केले. २ जुलै १९७१ ते १४ जानेवारी १९७३ या काळात दक्षिण कमांडचे प्रमुख असताना, त्यांनी १९७१ सालच्या भारत-पाक युद्धात राजस्थाच्या दुर्गम मरुप्रदेशात पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून सिंध व कच्छ भागातील भाईखआनवाला, गद्रा, नया चोर, नगर पारकर, छाड बेट इ. गावे असलेला सु. ८,९६० चौ. किमी. क्षेत्रफळाचा शत्रुप्रेदश काबीज केला. फईल्डमार्शल ⇨माणकेशा यांच्या निवृत्तीनंतर बेवूरांची १५ जानेवारी १९७३ रोजी भूसेनाध्यक्षपदी नियुक्ती झाली. ३१ मे १९७५ रोजी ते निवृत्त झाले. ते डेन्मार्कमध्ये भारतीय राजदूत होते. परमविशिष्ट सेवा व पद्मभूषण हे सन्मान त्यांना मिळाले आहेत. सेवा–निवृत्तीनंतर त्यांचे वास्तव्य पुणे येथे आहे.
दीक्षित, हे. वि.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..