बेरिंग,एमिल आडोल्फ फोन : (११ मार्च१८५४-३१मार्च १९१७). जर्मन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ व रक्तरसशास्त्रज्ञ (रक्त गाठल्यावर उरणाऱ्या निवळ द्रव पदार्थचे गुणधर्म व विक्रिया यांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ रक्तरसाचा औषधी उपयोग, विशेषेकरून⇨ घटसर्प या रोगातील उपयोग, शोधून काढल्याबद्दल पहिल्या म्हणजे १९०१ सालच्या शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयाच्या पारितोषिकाचे विजेते. ते प्रतिरक्षाविज्ञानाचे [⟶ रोगप्रतिकारक्षमता] जनक मानले जातात.
बेरिंग यांचा जन्म प. प्रशियातील हॅन्सडॉर्फ येथे झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना वैद्यकाची आवड होती पंरतु परिस्थितीमुळे त्यांना ते शिक्षण घेणे अशक्य झाले. त्या काळात लष्करातील भावी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बर्लिनमधील फ्रीड्रिख व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये मोफत वैद्यकीय शिक्षण मिळे. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दहा वर्षे सैन्यात नोकरी केली पाहिजे अशी अट असे. बेरिंग यांच्या एका शिक्षकांनी त्यांना या संस्थेत प्रवेश मिळवून दिला. १८७४-७८ या काळात तेथे अध्ययन करून त्यांनी एम.डी.पदवी मिळवली. १८८० मध्ये ते लष्कराच्या वैद्यकीय सेवेत दाखल झाले. १८८८ च्या सुमारास बर्लिनमधील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याते म्हणून त्यांची नेमणूक झाली. लष्करी सेवा संपवून १८८९ मध्ये रॉबर्ट कॉख यांच्या संसर्गजन्य रोगांच्या संस्थेत ते साहाय्यक म्हणून काम करु लागले.
लष्करी सेवेत असताना त्यांना आयडोफॉर्म नावाच्या पूतिरोधक (सूक्ष्मजीवांचा नाश करणाऱ्या वा त्यांची वाढ रोखणाऱ्या औषधावर संशोधन केले होते.एकेकाळी हा पदार्थ शस्त्रक्रियाशास्त्रात फार महत्त्वाचा गणला गेला होता. या पदार्थाच्या प्रतिरोधक गुणाबरोबरच त्याच्या विषारी परिणामांचा गंभीर धोका असतो, हे संशोधनाने सिद्ध करून तो त्यांनी त्याज्य ठरविला. या संशोधनातूनच त्यांचे रक्तरसाच्या प्रतिविषासंबंधीच्या गुणधर्माकडे लक्ष ओढले गेले.
कॉख यांच्या संस्थेत काम करीत असताना तयांनी शिबासाबुरो किटाझाटो या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने ⇨धनुर्वात व घटसर्प या रोगांवरील रक्तरसाच्या औषधी उपयोगासंबंधी संशोधन केले. घटसर्पाचे सूक्ष्मजंतू शरीरावर जो दुष्परिणाम करतात तो ते उत्पन्न करीत असलेल्या जंतुविषामुळे होतो, अशी बेरिंग यांना खात्री वाटत होती. १८९० मध्ये त्यांनी या रोगाचे मृत किंवा क्षीण सूक्ष्मजंतू गिनीपिगाच्या शरीरात टोचून पाहिले व त्या प्राण्यामध्ये या रोगाविरुद्ध प्रतिरक्षा उत्पन झाल्याचे त्यांना आढळले. ही प्रतिरक्षा त्या प्राण्याच्या रक्तरसात तयार होणाऱ्या विशिष्ट पदार्थामुळे निर्माण होते, असे त्यांनी दाखविले. या पदार्थाला त्यांनी ‘प्रतिविष’ (अँटीटॉक्सीन) हे नाव दिले. आज रूढ झालेली ही संज्ञा प्रथम वापरणारे शास्त्रज्ञ तेच होते.
घटसर्प प्रतिविष असलेल्या रक्तरसाचा मानवावरील उपचाराचा पहिला प्रयोग १८९१ मध्ये बर्लिनमधील एका मुलावर केला गेला व १८९३ पासून अशा रक्तरसाचा वापर व्यापक स्वरूपात यूरोपात व अमेरिकेत सुरू झाला. त्यांनतर बेरिंग यांनी विष-प्रतिविष मिश्रण फॉर्माल्डिहाइडाने स्थिर बनवून घटसर्प प्रतिरक्षा उत्पादनाकरिता प्रथम वापरले. प्रतिविषामुळे परार्जित प्रतिरक्षा ताबडतोब निर्माण होते, तर विषामुळे शरीरातील प्रतिकार यंत्रणेला चेतना मिळून स्वनिर्मित प्रतिविष तयार होते. या त्यांच्या शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.
रक्तरसाच्या वापरांनतर रोगाच्या प्रमाणात बरीच घट झाली. घटसर्प हा रोग प्रामुख्याने बालकांचा रोग असल्यामुळे बेरिंग यांना ‘बालतारक’ हे गुणविशेषण लावले जाऊ लागले. बेरिंग यांच्या शोधामुळे इतर शास्त्रज्ञांना आणखी काही रोगांकरिता प्रतिविपे निर्माण करण्याचे सुचले. त्यांनी स्वतः गाईच्या वासरांच्या क्षयरोगाला प्रतिबंधक प्रतिविष शोधण्याचा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नाही. त्याच्या या संशोधनाकरिता फॉर्बवेर्के हक्स्ट या कपंनीने एक खास प्रयोगशाळाही उभारली होती.
हाल विद्यापीठात १८९४ मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली व १८९५ मध्ये मारबुर्ख येथील इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन या संस्थेचे ते संचालक झाले. १८९५ साली पॅरिस ॲकॅडमी ऑफ मेडिसिन या संस्थेचे २५,००० फ्रँकचे पारितोषिक आणि इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्सचे ५०,००० फ्रँकचे पारितोषिक प्येर रू या शास्त्रज्ञांसमवेत बेरिंग यांना विभागून मिळाले. त्यांनी जर्मन भाषेत Die Blutserumtherapie (१९९२), Atiologie des Tetanus (१९०४) Einfuhrung in die Lehr von der Bekampfung der infektionskrankheitn (१९१२) हे ग्रंथ लिहिले. ते मारबुर्ख येथे मृत्यू पावले.