बेन, अलेक्झांडर : (११ जून १८१८-२० सप्टेंबर १९०३). प्रसिद्ध स्कॉटिश तर्कशास्त्रज्ञ, शिक्षणसुधारक, मानसशास्त्रज्ञ व लेखक. जन्म ॲबर्डीन (स्कॉटलंड)येथे. मारिस्कल कॉलेजमधून १८४० मध्ये त्यांनी पदवी घेतली. १८४१ -४२ या अवधीत नीतिशास्त्राचे प्राध्यापक ग्लेनी यांचे साहाय्यक असताना जॉन स्टयूअर्ट मिल, टॉमस कार्लाइल, जॉर्ज ग्रोट, रॉबर्टसन इ. प्रसिद्ध विचारवंताच्या सहवासात आल्याने त्यांच्या विचारांना व कार्यास वळण लागून गती मिळाली. प्राध्यापक म्हणून त्यांची पहिली नेमणूक ग्लासगो येथील अँडरसीनियन विद्यापीठात गणित व नैतिक तत्त्वज्ञान या विषयांकरिता १८४५ मध्ये झाली.१८४८-५० पर्यंत त्यांनी लंडनच्या मेट्रोपॉलिटन सॅनिटरी कमिशनचे सहायक सचिव म्हणूनही काम पाहिले. १८४० मध्ये पदवी घेतल्यापासून वेस्टमिन्स्टर रिव्हयूमध्ये त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली. हे त्यांचे लिखाण मिल, कार्लाइल इत्यादींच्या नजरेस आल्यामुळेच बेन यांना या विचारवंतांचे मार्गदर्शन लाभले.१८४५-८० या उच्या शिक्षणक्षेत्रातील कालावधीत त्यांनी स्वीकारलेल्या प्रमुख जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या म्हणजे बेडफोर्ड कॉलेज फॉर वीमेनमध्ये मानसेवी व्याख्याते आणि ॲबर्डीन विद्यापीठात इंग्लिश व तर्कशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८८० मध्ये ॲबर्डीन विद्यापीठातील प्राध्यापकपदाचा त्यांनी राजीनामा दिला असला, तरी त्याच विद्यापीठाने त्यांची १८८१ व १८८३ या दोन्ही वर्षी कुलमंत्री (रेक्टर) म्हणून निवड केली. जॉन स्ट्यूअर्ट मिल, ग्रोट, रॉबर्टसन इ. विचारवंतांच्या लेखनकार्यात त्यांनी साहाय्य केले. ॲबर्डीन विद्यापीठात इंग्लिश व तर्कशास्त्र या दोन विषयांचे अध्यापन कसे सुधारता येईल, या दृष्टीने त्यांनी बरेच प्रयत्न केले. या प्रयत्नांचे दृश्य फळ त्यांनी इंग्लिश ग्रामर (१८६२), इंग्लिश कॉंपोझिशन अँड ऱ्हेटॉरिक (१८६६) व इंग्लिश एक्स्ट्रॅक्ट्स ही पुस्तके लिहिण्यात झाले. पण अशा सेवाभावी कार्यप्रवृत्तीतून झालेल्या ग्रंथनिष्पत्तीशिवाय त्यांनी या प्रारंभिक काळी मेंटल अँड मॉरल सायन्स (१८६८) व लॉजिक (१८७०) हे दोन दर्जेदार ग्रंथही लिहून प्रसिद्ध केले.
बेन यांच्या अशा अनेकलक्षी कार्यविस्तारात त्यांची खरी कीर्ती झाली ती त्यांनी समर्थपणे पार पाडलेल्या मानसशास्त्रज्ञ व शिक्षणसुधारक या दोन भूमिकांमुळेच. द सेन्सेस अँड द इंटलेक्ट (१८५५), द इमोशन्स अँड द विल (१८५९), माइंड अँड बॉडी (१८७२) हे त्यांचे मानसशास्त्रविषयक प्रसिद्ध ग्रंथ होत. शिक्षणशास्त्रविषयक त्यांचे इतर ग्रंथ म्हणजे एज्युकेशन ॲज अ सायन्स (१८७९) आणि ऑन टीचिंग इंग्लिश. यांशिवाय जेम्स मिल : अ बायॉग्रफी (१८८२), जॉन स्ट्यूअर्ट मिल : अ क्रिटिसिझम विथ पर्सनल रिफलेक्शन्स (१८८२) हे जॉन स्ट्यूअर्ट मिल यांचे चरित्र तसेच मरणोत्तर प्रसिद्ध झालेले ऑटोबायॉग्रफी (१९०४) हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत. १८७२ मध्ये त्यांनी जगातील पहिले मानसशास्त्रीय नियकालिक माइंड प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. ॲबर्डीन येथे त्यांचे निधन झाले.
बेन यांचे सर्वात प्रमुख कार्यक्षेत्र म्हणजे मानसशास्त्र. त्यांनी इंग्लंडमध्ये मानसशास्त्रास लोकमानसता विशेष दर्जा व लोकप्रियता प्राप्त करून दिली. मानसशास्त्राने ज्ञान आणि तत्त्वज्ञानातील विचारपद्धती टाकून द्याव्यात मानसशास्त्रीय प्रश्नांतकडे निखळ मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून-आणि शक्यतो मन हे देहव्यापारावर अवलंबून आहे हे न विसरता-पाहिले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. ध् साहचर्यषाद या थॉर्नडाइक, पाव्हलॉव्ह इ. मनोवैज्ञानिकांनी पुरस्कारिलेल्या उपपत्तीचा पाया तयार करण्यात बेन यांचा मोठा हातभार आहे. प्राणी नवीन कौशल्ययुक्त कृती प्रयत्न-प्रमाद पद्धतीने शिकत असतात, हे मतही प्रसृत करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांनी नैतिक, धार्मिक, सौंदर्यविषयक तत्त्वांचे अधिष्ठान शारीरिक व्यापारात आहे, हे दाखविण्याचा सतत प्रयत्न केला. हे साहचर्यवादाचे दुसरे आत्यंतिक टोक, बेन विसाव्या शतकातील मानसशास्त्रज्ञ म्हणून पुढे आले असतेस, तर गाठू शकले असते याचे गमक आहे. गार्डनर मर्फी यांच्या मताप्रमाणे त्यांचा मानसशास्त्रीय दृष्टीकोन सर्वसंग्राहक असला, तरी त्यांच्या विचारसरणीतील मुख्य दोष म्हणजे मनोविकृती व मज्जाविकृती यांचा परस्पर संबंधही घनिष्ठ आहे, हे त्यांनी ओळखले नाही.
“