आत्मरति : सिग्मंड फ्रॉइडने आपल्या मनोविश्लेषणशास्त्रात ‘नार्सिसिझम्’ आत्मरती ही संकल्पना मांडली. ग्रीक पुराणात नार्सिससची कथा आहे. नार्सिससप्रमाणे आपल्याच देहसौंदर्यावर अथवा गुणांवर लुब्ध होणे, या प्रवृत्तीला सिग्मंड फ्रॉइडने (१८५६–१९३९) ‘नार्सिसिझम्’ हे नाव दिले. आत्मरत व्यक्तीची कामप्रेरणा (लिबायडो) अन्य व्यक्तीवर केंद्रित होण्याऐवजी स्वतःवर केंद्रित होते.

फ्रॉइ़डच्या मते, बालपणी प्रत्येक व्यक्ती आत्मरत असते. नवजात बालकाच्या मनात इतर कुठल्याही वस्तूविषयी प्रेम उत्पन्न झालेले नसते कारण त्यास बाह्य जगाचा परिचयच झालेला नसतो. त्याची जन्मजात कामप्रेरणा त्याच्या शरीरातच चौफेर खेळत असते व ती त्याच्या शरीरावरच खिळून राहते. ही प्राथमिक आत्मरती अथवा कामप्रेरणा मौखिक, गुदद्वारीय आणि लैंगिक अशा तीन अवस्थांमधून जात असते. फ्रॉइडने ‘कामप्रेरणा’ हा शब्द शरीरसुख या व्यापक अर्थांने वापरला आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. 

मूल वाढू लागले, की त्याला बाह्य जगाची ओळख होते आणि मग त्याची कामप्रेरणा, त्याला सर्वप्रथम परिचित होणाऱ्या व्यक्तीवर, सामान्यतः त्याच्या मातेवर, केंद्रित होते. त्याच्या मातृकेंद्रित कामप्रेरणेला अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही, तर ती उलटते व त्याच्या स्वतःवरच खिळून राहते. वैफल्यामुळे बालकाची आत्मरती वृद्धिंगत होते. हेच बालक पुढे मोठेपणी जर खडतर परिस्थितीत सापडले, तर आत्मरतीच्या आधीन होण्याची अधिक शक्यता असते. 

फ्रॉइ़डच्या मते, आत्मरतीची प्रवृत्ती सर्वसामान्य व्यक्तीतही कमीअधिक प्रमाणात अबोध स्वरूपात असते. सुस्थित व्यक्तीदेखील थोड्याफार प्रमाणात आपल्या स्वतःच्या सौंदर्यावर अथवा गुणांवर लुब्ध झालेल्या असतात. परंतु अशा सुस्थित व्यक्तींना सामान्यतः स्वतःतील गुणावगुणांचे ज्ञान असते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या गुणांसोबत उणिवांचीही यथायोग्य जाणीव असते व केवळ स्वतःवरच नव्हे तर दुसऱ्यांवरदेखील त्यांचे प्रेम जडते. अतिशय आत्मरत असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. तिचे आत्मप्रेम अतिरेकास जाते आणि त्यामुळे तिचे वर्तन विकृत होते. आरशातील आपल्याच प्रतिबिंबाकडे तासन् तास पाहत बसणे किंवा स्वतःच्याच शरीरास कुरवाळणे अशा प्रकारचे विचित्र वर्तन त्या व्यक्तीच्या हातून घडते कारण तिला त्यातून लैंगिक समाधान लाभते.

बाल्यावस्थेनंतर सुप्तावस्थेत असलेली व्यक्तीची कामप्रेरणा तारुण्यात पुन्हा जागृत होते. बालपणी अनुभवलेल्या कामुक इच्छा आणि आंतरिक संघर्षदेखील पुन्हा जाणवू लागतात. या नवतारुण्याच्या काळात जर व्यक्तीच्या वाट्याला आघातकारी कटू अनुभव आले, तर तिची अवस्था विलक्षण संभ्रमित होते. आपल्या अनावर कामप्रेरणेचे  निरोधन  करून ती व्यक्ती वर्तमानकाळातून काढता पाय घेते आणि भूतकाळच्या म्हणजेच बालपणीच्या आत्मकेंद्रित सुखासीनतेत रममाण होते. तिला बाह्य जगातील माणसांविषयी अथवा वस्तूंविषयी आकर्षण वाटेनासे होते.  छिन्नमानसाची बाधा होऊन ती व्यक्ती विकृत बनते.

छिन्नमानसासारख्या काही मनोविकृतींना फ्रॉइडने आत्मरतिपर मनोविकृती असे नाव दिले आहे. कारण या विकृतीची बाधा झालेली माणसे अतिशय आत्मरत असतात. ती बाह्य जगाशी असलेला आपला संपर्क सर्वस्वी तोडून टाकतात. त्यांची कामप्रेरणा पुन्हा एकदा त्यांच्या स्वत्वावर, त्यांच्या स्वतःच्या देहावर केंद्रित होते. बालपणीची आत्मरती ही नैसर्गिक आणि प्राथमिक स्वरूपाची असते पण प्रौढपणीची आत्मरती ही विकृत आणि दुय्यम स्वरूपाची असते. 

फ्रॉइ़डच्या आत्मरती संकल्पनेवर विल्यम मॅक्डूगल, एरिक फ्रॉम, कारेन होर्नी, थीओडोर राइक आदी मानसशास्त्रज्ञांनी बरीच टीका केलेली आहे. मॅक्डूगलच्या मते, छिन्नमानसादी विकृतींची आत्मरतीच्या आधारे केलेली चिकित्सा चुकीची आहे. फ्रॉम आणि राइक यांच्या मते, आत्मरती ही बाल्यावस्थेतील नैसर्गिक अवस्था आहे, असे मानण्याचे कारण नाही. होर्नीच्या मते आत्मरतीची विकृती ही सामाजिक परिस्थितीतील संघर्षापोटी उत्पन्न होणारी विकृती आहे. तसेच इतर अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मतेही आत्मरतीच्या मुळाशी बाल्यावस्थेतदेखील सळसळणारी कामप्रेरणा असते, हा फ्रॉइडचा मूलभूत सिद्धांत अतिशयोक्तिपूर्ण आणि असमर्थनीय आहे.

पहा: मनोविश्लेषण

संदर्भ : 1. Freud, S. Collected papers – vol. 4. London, 1914.

         2. Horney, K. New ways in Psychoanalysis, New York, 1939.

सुर्वे, भा. ग.