बेकेट, सॅम्युएल : (१३ एप्रिल १९०६- ). आयरिश कादंबरीकार आणि नाटककार. इंग्रजी आणि फ्रेंच ह्या भाषांतून लेखन.डल्बिन शहरी एका प्रॉटेस्टंट कुटुंबात जन्मला. डल्बिनच्या ‘ट्रिनिटी कॉलेजा’त फ्रेंच आणि इटालियन ह्या भाषांचा अभ्यास त्याने केला. १९२७ मध्ये तो बी. ए. झाल्यानंतर पॅरिसमधील एकॉल नॉर्माल स्युपेरिअर ह्या शिक्षणसंस्थेत इंग्रजीचा प्रपाठक म्हणून त्याची नेमणूक झाली (१९२८). पॅरिसमध्ये असताना विश्वविख्यात कादंबरीकार जेम्स जॉइस ह्याच्याशी बेकेटचा परिचय झाला आणि लवकरच जॉइसच्या निकटवर्तीयांच्या वर्तुळात त्याला स्थान मिळाले. १९३० मध्ये बेकेट आयर्लंडला परतला आणि ट्रिनिटी कॉलेजात फ्रेंचचा अधिव्याख्याता म्हणून काम करू लागला. तथापि डिसेंबर १९३१ मध्ये ह्या नोकरीचा राजीनामा देऊन त्याने इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इटली ह्या देशांचा प्रवास केला. १९३७ मध्ये तो पुन्हा पॅरिसला आला आणि तेथेच स्थायिक झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, जर्मनांनी पॅरिस व्यापल्यानंतर फ्रेंचांच्या भूमिगत प्रतिकार चळवळीत तो सामील झाला होता.
आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात बेकेटने केलल्या लेखनात होरोस्कोप (१९३०, फ्रेंच तत्त्वज्ञ रने देकार्त ह्याच्यावरील दीर्घकाव्य), एकोज बोन्स ॲन्ड अदर प्रिसिपिटेट्स (१९३५, काव्यसंग्रह), प्रूस्त (१९३१, श्रेष्ठ फ्रेंच कादंबरीकार मार्सेल प्रूस्त ह्याच्या साहित्यावर लिहिलेला सखोल समीक्षात्मक निबंध), मोअर मिक्स दॅन किक्स (१९३४, कथासंग्रह – ह्यातील कथा डब्लिन शहराच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या आहेत) ह्यांचा समावेश होतो. नंतर तो कादंबरी व नाटक ह्या वाङमयप्रकारांकडे वळला. मर्फी (१९३८), वॉट (लेखनकाळ १९४२-४४, प्रकाशित १९५३) आणि मॉलॉय (१९५१) ह्या त्याच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. ह्यांपैकी मॉलॉय ही कादंबरी मुळात फ्रेंचमध्ये लिहिलेली असून तिचा इंग्रजी अनुवाद स्वतः बेकेटनेच पॅट्रिक बोल्स ह्याच्या सहकार्याने केला आहे (१९५५). तसेच मर्फी आणि वॉट ह्या मूळ इंग्रजी कादंबऱ्यांपैकी मर्फीचा फ्रेंच अनुवाद त्याने आल्फ्रेद पेरॉन ह्याच्या सहकार्याने केला (१९४७). तथापि बेकेटला जागतिक कीर्ती लाभली,
ती त्याच्या आंनातांदां गोदो (१९५२, मूळ फ्रेंच स्वतः बेकेटकृत इ. भा. वेटिंग फॉर गोदो १९५४) ह्या त्याच्यानाट्यकृतीमुळे. ५ जानेवारी १९५३ रोजी हे नाटक पॅरिसच्या रंगभूमीवर आले आणि गाजले. स्वतः बेकेट मात्र प्रसिद्धीपासून फार अलिप्त राहिलेला आहे. १९६९ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक त्याला देण्यात आले.
बेकेटच्या वेटिंग फॉर गोदो ह्या नाटकास कथानक असे नाहीच. त्याच नाटकातील एक वाक्य उद्धृत करून सांगावयाचे झाल्यास त्यात काहीही घडत नाही कोणीही येत नाही… कोणीही जात नाही (‘नथिंग हॅपन्स, नोबडी कम्स, नोबडी गोज, इट्स ऑफुल’). एका झाडापाशी दोन भटके हे कोणा मिस्टर गोदोची वाट पाहत आहेत. ह्या ठिकाणी आपण त्याची भेट घेण्याचे ठरविले आहे, अशी त्यांची समजूत आहे. पहिल्या अंकाच्या अखेरीस त्यांना असे सांगण्यात येते, की गोदो आता येऊ शकणार नाही पण तो उद्या नक्की येईल. असाच निरोप त्यांना दुसऱ्या अंकाच्या अखेरीसही मिळतो. गोदो आला, तर आपली स्थिती सुधारेल, अशी ह्या भटक्यांची भावना. हा गोदो म्हणजे ‘गॉड’- परमेश्वर, असा अर्थ लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. तथापि गोदोपेक्षाही ह्या नाट्यकृतीत महत्त्व आहे, ते त्या दोन माणसांच्या प्रतीक्षेला. उभे आयुष्य कसली ना कसली तरी वाट पाहण्यात घालविणाऱ्या मानवांचेच प्रतीक ह्या दोन माणसांत पाहता येते शिवाय प्रतीक्षा करीत असतानाच काळाचा ओघ त्याच्या अत्यंत विशुद्ध अशा रूपात अनुभवता येतो ह्या कालौघातूनच आला ‘स्व’ (सेल्फ) वाहत असतो त्यात सतत परिवर्तने होत असतात तीही खरी नसून भ्रामकच असतात म्हणून हा कालौघ सतत आपल्या आकलनापलीकडे राहतो.
गोदो येईल त्याच क्षणी आपल्यापुरता हा कालौघ संपेल आपण कालातीत होऊ न मागितलेल्या जन्माबरोबरच जीवाला चिकटलेली ही भ्रमंती संपेल आणि आपण मुक्त होऊ अशी भावना ह्या दोघा भटक्यांची दिसते. गोदो आला नाही, तर जवळच असलेल्या त्या झाडावर हे दोघे स्वतःला गळफास लावून घेणार असतात. हे झाड म्हणजे ज्ञानवृक्षाचे, जीवनवृक्षाचे किंवा ज्या निर्मूळ वृक्षावर मानवाच्या मोक्षासाठी प्रभूने मृत्यू स्वीकारला त्या वृक्षाचे प्रतीक होय, असे वेगवेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. तसेच हे दोघे भटके म्हणजे येशू ख्रिस्ताबरोबरच जे दोन तस्कर वधस्तंभावर चढले, त्यांची प्रतीके होत, असे म्हटले गेले आहे. तथापि ह्या ख्रिस्ती धर्मरूपकाच्या पलीकडे जाऊनही मानवी अस्तित्वाच्या मूलभूत समस्येचा आशय बेकेटच्या ह्या नाट्यकृतीत शोधता येतो.
बेकेटच्या अन्य उल्लेखनीय तत्त्वचतुषअटयीकृती अशा : मूळ फ्रेंच : मालोन मर (कादंबरी, १९५१, इं. भा. मॅलॉन डाइज, १९५६), लिन्नोमाब्ल (कादंबरी, १९५३, इं. भा. द ॲन्नेमेबल, १९५८), फॅं द पार्ती (नाटक, १९५७, इं. भा. एंडगेम, १९५८), मूळ इंग्रजी : ऑल द फॉल (नाटक, १९५७), क्रॅप्स लास्ट टेप (नाटक, १९५९), हॅपी डेज (नाटक, १९६२).
आपल्या अनेक इंग्रजी तत्त्वचतुषअटयीकृतींचे फ्रेंच आणि फ्रेंच तत्त्वचतुषअटयीकृतींचे इंग्रजी अनुवाद बेकेटने स्वतःच केलेले आहेत.
बेकेटच्या सर्व साहित्यातून ‘स्व’ चा अव्याहतपणे घेतलेला शोध दिसून येतो तसेच मानवी आशा-आकांक्षांचे वैयर्थ्य तो दाखवून देत असताना त्याच्या मार्मिक विनोदबुद्धीचेही दर्शन घडते. भाषेचा उपयोग कलात्मकतेचे अत्यंत काटेकोर भान ठेवून त्याने केलेला आहे. तसेच तत्त्वचतुषअटयीकृतीच्या घाटाची जाणीवही त्याने जागरूपणे ठेवलेली आहे. बेकेटचे व्यासंगी व्यक्तिमत्त्वही त्याच्या साहित्यात प्रकट झालेले आहे. त्याच्या साहित्यातून आढळणारे अनेक सूक्ष्म वाङ्मयीन संदर्भ ह्याची प्रचीती देतात.
संदर्भ : 1. Calder, John, Ed. Beckett at Sixty, London, 1967.
2. Coe, Richard N. Beckett, London, 1964 Rev. Ed. 1968.
3. Cohn, Ruby, Samuel Backett, The Comic Gamut, New Brunswick, N. J. 1962. 4. Esslin, Martin, The Theatre of the Absurd, N. Y. 1961.
5. Fletcher, John, The Novels of Samual Beckett, London, 1964.
6. Hoffman, Frederick, Samual Beckett : The Language of Self, Carbondale, 1962.
7. Jacobsten, y3wuoephine : Mueller, William, The Testament of Samuel Beckett, London 1966.
8. Kenner, Hugh, Samuel Backett : A Ciritical Study, London, 1962.
9. Scott, N. A. Samuel Backett, Cambridge, 1965.
10. Tindall, William Y. Samuel Beckett, London, 1964.
कुलकर्णी, अ. र.
“