बेंझॉइक अम्ल :(बेंझीन कार्‌बॉक्सिलिक अम्ल, फिनिल फॉर्मिक अम्ल). ॲरोमॅटिक वर्गातील एक कार्‌बॉक्सिलिक अम्ल [⟶कार्‌बॉक्सिलिक अम्ले]. रेणवीय सूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) C7H6O2. संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दर्शविणारे सूत्र) C6H5COOH. ही संरचना पुढीलप्रमाणे दाखविली जाते.

बेंझॉइक अम्ल

 

उपस्थिती : मुक्त किंवा संयुगांच्या रुपात हे अम्ल अनेक वनस्पतिज आणि प्राणिज पदार्थांत आढळते. उदा., क्रेनबेरी इ. फळे, ऊद (गम बेंझोइन स्टाबरॅक्स बेंझोइन या वृक्षापासून मिळणारा), पेरु बाल्सम [⟶ बाल्सम], काही बाष्पनशील (बाष्परुपाने उडून जाणारी) तेले व शाकाहारी प्राण्यांचे मूत्र.

इतिहास : सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून हे अम्ल माहीत आहे. प्रारंभी ते उदापासून मिळवीत. त्यानंतर एकोणिसाव्या शतकात बैल व घोडे यांच्या मूत्रातील हिप्पुरिक अम्लाच्या जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रीयेने संयुगातील घटकद्रव्ये अलग करण्याच्या क्रियेने) आणि १८६० पासून दगडी कोळशाच्या डांबरातील संयुगांपासून ते बनविण्यात येऊ लागले. १८३२ मध्ये याचे संघटन निर्धारित करण्यात आले. याच्या अनेक विक्रियांमध्ये C6H5CO हा अणुसमूह कायम राहतो असे दिसून आले व त्यावरूनच अकार्बनी रसायनशास्त्रातील मूलकांप्रमाणे कार्बनी रसायनशास्त्रातही ‘मूलके’ असतात ही कल्पना पुढे आले [⟶ मूलके].

उत्पादन : आधुनिक काळात हे अम्ल थॅलिक ॲनहायड्राइडापासून २२० से. तापमानास क्रोमियम आणि सोडियम थॅलेट हे उत्प्रेरक (विक्रियेचा वेग बदलणारे पदार्थ) व पाण्याची वाफ वापरून मिळवितात. यामध्ये थॅलिक ॲनहायड्राइडाचे थॅलिक अम्ल बनते व नंतर त्यातील एक कार्‌बॉक्सिल गट नाहीसा होतो.

C6 H4 (CO)2O      +

H2O   ⟶

C6H4 (COOH)2

थॅलिक ॲनहायड्राइड 

पाणी 

थॅलिक अम्ल 

C6H4(COOH)2

C6H5COOH

+            CO2

थॅलिक अम्ल  

बेंझॉइक अम्ल 

कार्बन डाय-ऑक्साइड

मँगॅनीज डाय-ऑक्साइड आणि सल्प्यूरिक अम्ल यांनी किंवा कोबाल्ट उत्प्रेरक वापरून हवेच्या योगाने टोल्यूइनाचे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] करूनही बेंझॉइक अम्ल बनविले जाते. त्याचप्रमाणे बेंझोट्रायक्लोराइडाचे कॅल्शियम हायड्रॉक्साइड व लोहचूर्ण यांनी जलीय विच्छेदन केल्यानेही बेंझॉइक अम्ल मिळते.

भौतिक गुणधर्म : वर्णहीन व चकचकीत स्फटिक. सु.१०० से. ला संप्लवन पावते (धन स्थितीतून एकदम वायुरूप स्थितीत जाते). वितळविंदू १२२.४ से., उकळबिंदू २५० से., पाण्यात अल्प विद्राव्य (विरघळते). वाफेबरोबर ऊर्ध्वपातित होते (बाष्परूपाने अलग होते). अल्कोहॉल व ईथर यांमध्ये विद्राव्य.

रासायनिक गुणधर्म : फेरिक क्लोराइडाच्या उपस्थितीत क्लोरिनाच्या विक्रीयेने मेटा-क्लोरोबेंझॉइक अम्ल बनते. नायट्रीकरणाने [⟶ नायट्रीकरण] मेटा-नायट्रोबेंझॉइक अम्ल व सल्फॉनीकरणाने [⟶ सल्फॉनीकरण] मेटा-सल्फोबेंझॉइक अम्ल ही संयुगे तयार होतात. एस्टरीकरणाने [⟶ एस्टरीकरण] याची एस्टरे बनविता येतात.

बेझॉइक अम्लाचे खालील अनुजात (त्यापासून बनविलेली अन्य संयुगे) महत्त्वाचे आहेत :


सोडियम बेंझोएट : (C6H5COONa). बेंझॉइक अम्लाचे सोडियम कार्बोनेटाने उदासिनीकरण केल्याने (अम्लता नाहीशी करण्याच्या क्रियेने) बनते. खाद्यपदार्थांसाठी परिरक्षक म्हणून उपयुक्त.

बेंझॉइल क्लोराइड : (C6H5COCI). बेंझॉइक ॲनहायड्राइड आणि बेंझॉइल पेरॉक्साइड यांच्या संश्लेषणासाठी (घटकद्रव्ये एकत्र आणून कृत्रिम रीत्या संयुग बनविण्यासाठी) व इतरत्रही बेंझॉइलीकरणासाठी (C6H5CO – हा मूलक संयुगाच्या रेणूत समाविष्ट करण्यासाठी) हे उपयोगी पडते.

बेंझोनायट्राइल : (C6H5CN). सोडियम बेंझीन सल्फोनेट व सोडियम सायनाइड यांच्या विक्रियेने हे बनते. अनेक रेझिने व प्लॅस्टिके यांसाठी हे एक विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) आहे.

बेंझिल बेंझोएट : (C6H5COOCH2C6H5). पेरु आणि टोल्यू बाल्समांमध्ये नैसर्गिक रीत्या आढळते. ॲल्युमिनियम एथॉक्साइडाच्या उत्प्रेरण क्रियेचा उपयोग करुन बेंझाल्डिहाइडापासून हे बनवितात. माइट या किडीचा नाश करण्यासाठी आणि खरजेच्या निवारणासाठी हे उपयुक्त आहे.

बेंझॉइल पेरॉक्साइड :[(C6H5CO)2O2]. खाद्य तेलांच्या व पिठांच्या विरंजनासाठी (रंग नाहीसा करण्यासाठी) आणि प्लॅस्टिकांच्या निर्मितीत बहुवारिकीकरण (अनेक साध्या रेणूंच्या संयोगाने जटिल रेणूचे संयुग बनविण्याच्या) क्रियेस प्रारंभ करण्यासाठी उपयोगी पडते.

जॉर्थो-ॲमिनो बेंझॉइक अम्ल : (o-NH2-C6H4-COOH). रंजक धंद्यात एक माध्यमिक द्रव्य म्हणून हे उपयुक्त आहे. पूर्वी निळीच्या उत्पादनात हे महत्त्वाचे मानले जात असे. याचे मिथिल एस्टर सुगंधी आणि स्वाददायक द्रव्य म्हणून वापरले जाते.

पॅरा-ॲमिनो बेंझॉइक अम्ल : (p-NH2-C6H4-COOH). याची कित्येक एस्टरे स्थानिक संवेदनाहारी म्हणून उपयोगी पडतात.

पॅरा-हायड्रॉक्सिबेंझॉइक अम्ल : (p-HO-C6H4-COOH). पूतिरोधक म्हणून बेंझॉइक अम्लापेक्षाही हे प्रभावी आहे. सौंदर्यप्रसाधनांत व कवकजन्य (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या वनस्पतीपासून होणाऱ्या) त्वचारोगांवर गुणकारी म्हणून उपयुक्त आहे.

ऑर्थो-हायड्रॉक्सि-पॅरा-ॲमिनो बेंझॉइक अम्ल : (पॅरा – ॲमिनो सॅलिसिलिक अम्ल o-HO-p-NH2-C6H3-COOH). क्षयरोगावरील उपचारात हे उपयुक्त ठरले आहे.

पॅरा-नायट्रोबेंझॉइक अम्ल : (इंग्रजी). वर दिलेले पॅरा-एमिनो बेंझॉइक अम्ल व त्याचे अनुजात यांच्या संश्र्लेषणासाठी हे उपयुक्त आहे.

उपयोग : तंबाखूची पाने वाळविण्याच्या संस्करणात, खाद्यपदार्थांत परिरक्षक म्हणून, तसेच औषधांत, सौंदर्यप्रसाधनांत, प्लॅस्टिके, रंग इत्यादींच्या उत्पादनात प्रारंभिक द्रव्य म्हणून बेंझॉइक अम्ल किंवा त्याची संयुगे उपयोगी पडतात.

गडम, द. द