अँड्रूज, टॉमस : (१९ डिसेंबर १८१३–२६ नोव्हेंबर १८८५). आयरिश रसायनशस्त्राज्ञ व भौतिकीविज्ञ. आयर्लंडमधील बेलफास्ट येथे त्यांचा जन्म झाला. ग्‍लासगो, पॅरिस, डब्‍लिन, बेलफास्ट व एडिंबरो येथे त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची वैद्यक विषयातील पदवी १८३५ मध्ये मिळविली. १८४५ मध्ये ते बेलफास्टच्या क्वीन्स कॉलेजचे उपाध्यक्ष झाले. त्याच ठिकाणी ते १८४९ ते ७९ पर्यंत रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. बेलफास्ट येथेच ते मृत्यू पावले.

तापमान, दाब व आकारमान यांत बदल होत असताना कोणकोणत्या नियमांस अनुसरून वायूंच्या स्थितीत कसे बदल होतात, हे त्यांनी कार्बन डाय-ऑक्साइड वायूवर प्रयोग करून शोधून काढले. क्रांतिक (कमाल दाब असताना वायूचे द्रवात रूपांतर होण्याचे) तापमान व क्रांतिक दाब (क्रांतिक तापमानाचे वेळी असणारा दाब) या अवस्थांची मूळ कल्पना त्यांनी प्रस्थापित केली. वायूंच्या द्रवीकरणासंबंधीचे त्यांचे प्रयोग प्रसिद्ध आहेत.

मिठारी भू. चिं.