अऱ्हेनियस, स्वांटे ऑगस्ट : (१९ फेब्रुवारी १८५९ – २ ऑक्टोबर १९२७). स्वीडिश भौतिकीविज्ञ व रसायनशास्त्रज्ञ. आधुनिक भौतिकीय रसायनशास्त्राचे एक आद्य संस्थापक व १९०३ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म स्वीडनमधील अप्सालानजीकच्या विक या गावी झाला. वयाच्या सतराव्या वर्षी अप्साला विद्यापीठात भौतिकी शिकण्यासाठी त्यांनी प्रवेश मिळविला. नंतर त्यांनी एरीक एम्‍डेन यांच्या मार्गदर्शनाखाली १८८१ मध्ये स्टॉकहोम येथे शिक्षण घेतले. विद्युत् विश्लेष्यातील (जो पदार्थ योग्य अशा द्रवात विरघळविल्यास त्यातून विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या प्रत्यक्ष गमनाद्वारे विजेचा प्रवाह वाहू शकतो अशा पदार्थातील) विद्युत् संवाहकतेसंबंधी प्रबंध लिहून १८८४ साली त्यांनी अप्साला विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविली. विद्युत् विश्लेष्यी विगमनावरील सैद्धांतिक विवेचनाकरिता त्यांना नोबेल परितोषिक देण्यात आले.

 

विद्युत् विश्लेष्यी विगमनाविषयी सुधारून व वाढवून लिहिलेला प्रबंध त्यांनी १८८७ मध्ये प्रसिद्ध केला. सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ व्हिल्हेल्म ओस्टव्हाल्ट यांच्या प्रयोगशाळेत काम करण्याची त्यांना १८८६-८७ मध्ये संधी मिळाली. १८९५ साली स्टॉकहोम विद्यापीठात ते भौतिकीचे प्राध्यापक झाले. १८८७-१९०२ या काळात ते विद्यापीठाचे कुलमंत्री (रेक्टर) असताना विद्युत् विश्लेष्याच्या संवाहकतेविषयी त्यांनी पुष्कळ प्रयोग केले.

 

कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये १९०४ साली भौतिक-रासायनिक पद्धतीने विष व प्रतिविष (विषाचा उतारा) यांच्या विक्रिया कशा होतात यावर त्यांनी व्याख्याने दिली. नंतर तीच व्याख्याने इम्यूनोकेमिस्ट्री या नावाने १९०७ साली प्रसिद्ध झाली. त्यांमध्ये सुधारणा करून व भर घालून क्वाँटिटेटिव्ह लॉज इन बायॉलॉजिकल केमिस्ट्री हे पुस्तक त्यांनी १९१५ मध्ये प्रसिद्ध केले.

नोबेल इन्स्टिट्यूटफॉर फिजिकल केमिस्ट्री या संस्थेचे संचालक म्हणून १९०५ मध्ये त्यांची नेमणूक झाली. तेथे असतानाच त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीने डेव्ही पदकाचा व केमिकल सोसायटीने फॅराडे पदकाचा बहुमान दिला. त्यांच्या काही ग्रंथांची जर्मन व इंग्रजी भाषांत भाषांतरे झालेली आहेत. ते स्टॉकहोम येथे मृत्यू पावले.

 

मिठारी, भू. चिं.