बूशीर : इराणमधील एक औद्योगिक शहर व महत्वाचे बंदर. लोकसंख्या ४५,००० (१९७२) हे देशाच्या नैर्ऋत्य भागात शीराझच्या नैर्ऋत्येस १८४ किमी. अंतरावर इराणच्या आखातावर वसले आहे. शीराझ, इस्फाहान व तेहरान या शहरांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावरील हे अंतिम स्थानक म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.

 पर्शियन आरमारचे ठाणे या उद्देशाने नादिरशाहने हे शहराची स्थापना १७३६ मध्ये केली. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने इराणमधील आपले केंद्र बंदर आब्बासहून येथे १७५६ मध्ये हलविल्यावर आखाती व्यापारी मार्गावरील महत्वाचे केंद्र म्हणून याची भरभराट होत गेली. त्यामुळे बंदर आब्बासचे महत्व कमी झाले. ट्रान्स-इराणियन रेल्वे सुरू झालयावर बंदर इ-शहापूर व खुर्रमशहर यांचे महत्व वाढल्याने बुशीरचे महत्व थोडे कमी झाले.

 येथे कापड गिरण्याही आहेत. या बंदरातून गालिचे, सुकी फळे, अन्न धान्ये,कापड, तंबाखू व लोकर याची निर्यात आणि साखर, सिमेंट व पोलाद यांची आयात केली जाते.

अनपट, रा. ल.