बूलेझ, प्येअर : (२६ मार्च१९२५-). आधुनिक फ्रेंच संगीतकार. पियानोवादक व संगीत निर्देशक म्हणूनही
तो प्रसिद्ध आहे. मॉंव्रीझॉं येथे जन्म. त्याने सुरूवातीला गणिताचे अध्ययन केले. पण पुढे त्याने संगीताला सर्वस्वी वाहून घेतले. १९४२ मध्ये त्याने ‘पॅरीस कॉंझर्व्हेंटरी’ मध्ये प्रवेश घेतला व ऑलीव्ह्ये मेस्यां आणि रने लेबोविट्झ यांच्या समवेत त्याने संगीताचे धडे घेतले. त्याच्यावर दब्यूसी, व्हेबर्न, स्ट्राव्हिन्स्की आदी संगीतकारांचाही प्रभाव जाणवतो. त्याच्या सुरुवातीच्या संगीतरचना साधारण १९४६ पासून आढळतात. १९४६ ते १९५६ या काळात तो ‘झां-ल्वी बारो’ या नाटक मंडळीचा संगीत दिग्दर्शक होता. याच काळात त्याने पॉलिफोनी या नियतकालिकात संगीतक्षेत्रात खळबळ माजवणारे लेख लिहिले. त्याने प्रथमतः पियानो व मग लहान वाद्यवृंदरचना केल्या. स्ट्रक्चर्स ही दोन पियानोंवरील त्याची रचना (१९५२) त्याच्या कामगिरीला वेगळे वळण देणारी ठरली. रने शार या अतिवास्वववादी कवीच्या तीन कविता त्याने ल मार्तो सॉं मॅत्र (१९५२-५४) नामक रचनेमध्ये संगीतबद्ध केल्या. त्यात ⇨ ॲल्टो आवाजपल्ल्याचा व सहा वाद्यांचा उपयोग केला होता. १९६९ पासून संगीत निर्देशक म्हणूनही त्याची कारकीर्द गाजली. बॉर्टोक, स्ट्राव्हिन्स्की, ब्राम्झ, बेथोव्हन यांच्या संगीतकृतींचे बूलेझने केलेले निर्देशन कल्पकतेने परिपूर्ण होते. १९७१ पासून ‘न्यूयॉर्क फिल्हार्मोनिक-सिफनी’ वाद्यवृंदाचा संगीत संचालक म्हणून त्याची नियुक्ती झाली. बूलेझ ऑन म्यूझिक टुडे हा त्याचा संगीत विषयक ग्रंथ (१९७२) प्रसिद्ध झाला असून त्याचे इंग्रजी भाषांतर स्थूझन ब्रॅडशॉ व रिचर्ड रॉड् नी यांनी केले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील यूरोपीय संगीत विश्व त्याच्या गतिमान व क्रांतिकारक व्यक्तिमत्वाने प्रभावित झाल्याचे दिसून येते. संगीत क्षेत्रातील अत्याधुनिक (आंबा गार्द) चळवळीचा तो प्रवर्तक मानला जातो.
रानडे, अशोक
“