बुकारेस्ट : यूरोपातील रूमानिया प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १९,६०,०९७ (१९७९). हे

राष्ट्रीय विधानसभेची इमारत, बूकारेस्ट.

वालेकीयन मैदानाच्या मध्यभागी, डम्बॉव्हीत्सा नदीच्या दोन्ही तीरावर, काळ्या समुद्रापासूनसु. २०० किमी. अंतरावर वसले आहे. समुद्रसपाटीपासून उंची सु. ८२ मी. देशातील हे सर्वात मोठे शहर होय.बूकारेस्टच्या अस्तित्वाचा लिखित पुरावा इ.स. १४५९ पासून मिळत असला, तरी पुरातत्वीय दृष्ट्या प्रागैतिहासिक काळापासून येथे वस्ती असावी. चौदाव्या शतकाच्या अखेरीस हे ‘डम्बॉव्हीत्सा सिटाडेल’ या नावाने ओळखले जाई. लष्करी तळ आणि व्यापार केंद्र म्हणून त्या काळातही याची ख्याती होती. पूर्वीच्या रोमन गढीजवळ वसलेल्या या शहराची १५९५ मध्ये तुर्कांनी बरीच नासधूस केली. पुढे त्याभोवती उंच तटबंदी बांधण्यात आली. १६९८ मध्ये ही वालेकीया ह्या मांडलिक राज्याची राजधानी करण्यात आली. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत तुर्क, रशियन, ऑस्ट्रियन अशी अनेक सत्तांतरे होत गेली. १८६१ मध्ये वालेकिया आणि मॉल्डेव्हिया यांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या रूमानियन साम्राज्याची ही राजधानी झाली. १९१० पासून जुन्या तटबंदीच्या बाहेर शहराचा विस्तार होऊन अनेक उपनगरे उदयास आली. पहिल्या महायुद्धकाळात (१९१६-१८) बूकारेस्ट जर्मन व बल्गेरियन सैन्यांच्या ताब्यात गेल्यामुळे देशाची राजधानी यासी येथे हलविण्यात आली. १९१८ पासून पुन्हा हीच राजधानी मुक्रर झाल्याने शहराची वाढ झपाट्याने होऊ लागली. आधुनिक शहरात तटबंदी पाडून टाकण्यात आली असून लोहमार्गांचे शहरात जाळेच पसरले आहे. खुद्द बूकारेस्टमध्ये चार रेल्वे स्थानके आहेत. रूमानियन हवाई वाहतुकीचेही हे प्रमुख केंद्र असून जवळच विमानतळ आहे. सुंदर बगीचे, दुतर्फा वृक्षराजींनी युक्त असे रूंद व प्रशस्त रस्ते आधुनिक शहरात असून त्याच्या मध्यभागी मात्र जुन्याच इमारती आढळतात. दुसऱ्या महायुद्धापूर्वी बूकारेस्ट शहरातील आनंदी आणि प्रसन्न वातावरणामुळे हे ‘छोटे पॅरिस’ म्हणून ओळखले जाई. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांच्या बॉंबवर्षावाने आणि मार्च १९७७ मधील भूकंपाच्या तीव्र धक्याने शहराचे बरेच नुकसान झाले होते.

शहरात नाननविध उद्योगधंदे विकसित झालेले असून त्यांत धातूकाम, अभियांत्रिकी, तेलशुद्धीकरण, मांस डबाबंद करणे, कापडगिरण्या, अन्नप्रक्रिया, पादत्राणे, मोटारींचे सुटे भाग बनविणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. खनिज तेलाचा भरपूर पुरवठा आणि मीठ व पाणी यांची मुबलकता यांमुळे रसायने व कापड उद्योग प्रगत झालेले आहेत. तसेच डिझेल व विद्युत जनित्रे, यंत्रसामग्री, मद्यार्क, विटा, रेल्वे, कर्मशाळा इ. व्यवसायातही अनेक लोक गुंतलेले आहेत. तेल, लाकूड आणि शेतमालाची तर ही प्रमुख बाजारपेठ मानली जाते.

बूकारेस्ट हे प्रमुख शिक्षणकेंद्र असून१९७० मध्ये येथे सु. ५८ उच्च प्रतीच्या विविध शैक्षणिक संस्था होत्या व त्यांत ६६,०००विद्यार्थी शिक्षण घेत होते. यांशिवाय १६ विशेष उच्च शिक्षणसंस्था आहेत. अकॅडमी ऑफ सायन्स (स्था. १८६५) आणि रूमानियन अकॅडमी (१८६६) येथे असून बूकारेस्ट विद्यापीठही (१८६४) येथेच आहे. शहरात अनेक ग्रंथालये असून त्यांपैकी ‘लायब्ररी ऑफ द अकॅडेमी ऑफ द सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ रूमानिया’ व ‘सेंट्रल स्टेट लायब्ररी ’ ही दोन विशेष विख्यात आहेत. तेथे जतन केलेली रूमानियन आणि स्लाव्हानिक कागदपत्रे मौलिक आहेत. रूमानियन ऑर्थोडॉक्स आर्चबिशपचे येथे प्रमुख धर्मपीठ असून नॅशनल म्युझियम ऑफ रिलीजस आर्ट (१९३१) येथेच आहे. त्यात अनेक भित्तिलेपचित्रे, अवशेषमंजूषा आणि मूर्ती पहावयास मिळतात. शहरात१६ रंगमंदिरे असून ‘नॅशनल थिएटर’, ‘थिएटर ऑफ ऑपेरा अँण्ड बॅले ऑफ रूमानिया’ यांसारख्या रंगमंदिरांना उज्वल परंपरा आहे. बूकारेस्ट हे राष्ट्रीय फिलार्मानिक वाद्यवृंदाचे तसेच अनेक हौशी व धंदेवाईक गायनसंस्थांचे केंद्र आहे. व्हायोलिन, पियानो व कंठसंगीत यांचा प्रामुख्याने अविष्कार करणारा त्रैवार्षिक झॉर्झ एनेस्को आंतरराष्ट्रीय संगीतोत्सव येथेच भरविण्यात येतो. शहरात ३३ संग्रहालये आहेत, त्यांपैकी ‘आर्ट म्युझियम’ हे देशातील सर्वांत मोठे असून ‘व्हिलेज म्युझियम’ (१९३६) हे मानवजातीवर्णनविषयक संग्रहालय जगप्रसिद्ध आहे.

बूकारेस्टमधील प्रेक्षणीय स्थळांत ऑर्थोडॉक्स कॅथीड्रल (१६५६), रोमन कॅथलिक कॅथीड्रल (१८७५-८४) व चॅपेल ऑफ स्ट्रॅव्होपोल्स ही प्रमुख आहेत. सार्वजनिक उद्यानात ‘पार्क ऑफ कल्चर अँण्ड रेस्ट’, ‘लिबर्टी पार्क’ यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ओल्ड रॉयल पॅलेस, पॅलेस ऑफ कौन्सिल ऑफ मिनिस्ट्रीज हे राजप्रसाद प्रेक्षणीय आहे.

कापडी सुलभा