बुशमन : आफ्रिका खंडातील एक आदिवासी जमात. हे लोक टोळ्याटोळ्यांनी झॅंबीझी नदीपासून
आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंतभटकत असतात तथापि त्यांची वस्ती मुख्यत्वे नैऋत्य आफ्रिका बोटस्वाना व अंगोला भागात आढळते. लोकसंख्या सु. ६०,००० (१९७१).
बुशमन याचा अर्थ ‘झुडुपातली माणसे’. दक्षिण आफ्रिकेतील आदिवासींच्या एका जमातीला यूरोपियनांनी दिलेले व पुढे मानसशास्त्रज्ञांनी रूढ केलेले हे नाव आहे. ‘सॅन’ वा ‘वोसजेसमन’ हे या लोकांचे मूळ नाव असावे. बुशमन ही संज्ञा तुच्छतादर्शक समजली जाते. बुशमन हे हॉर्टेटॉट सोडल्यास इतर सर्व दक्षिण अफ्रिकन आदिवासींहून शारीरिक दृष्ट्या भिन्न आहेत. वर्णाने पिवळसर, तपकिरी असलेले हे लोक ठेंगणे असले तरी खुजे नाहीत. पुरुषाची सरासरी उंची १५५.६ सेमी असते स्त्री पुरुषांची शारीरिक ठेवण बांधेसुद असते.बुशमन स्त्रियांचे नितंब सापेक्षतः मोठे असतात.विरळ लोकरी केस, पसरट नाक, लहान डोके, रुंद चेहरा व गालाची उंच हाडे ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये. ही निग्रॉइड शारीर वैशिष्ट्ये त्यात असली, तरी ते त्यांच्याहुन मूलतः भिन्न आहेत.
हे लोक सुरुवातीस डोंगर-कपारीच्या आडोशाने, गुहांत वा घुमटाकार झोपड्यांत रहात असत. यूरोपियनांच्या आमगनानंतर त्यांचे स्थलांतर झपाट्याने झाले आणि पुढे त्यांनी मोलमजुरीची कामे पतकरून स्थिर वस्ती करण्यास सुरुवात केली. त्यांची रंगचित्रे व शिल्पे प्रसिद्ध असून ही कला अनेक गुहांत अद्यापि पहावयास सापडते. या चित्रांत पशू, मानव, पारध, नृत्य, युद्ध वगैरेंची चित्रे आढळतात. ही पुरातन कला नष्ट झालेली असली, तरी या चित्रकलेमुळे दक्षिण आफ्रिकनांचा सांस्कृतिक संबंध अश्मयुगीन यूरोपीय लोकांशी असलेला सूचित होतो.
विषारी धनुष्य-बाण, भाले इत्यादींनी ते जंगलातील प्राण्यांची शिकार करतात. शहामृगाचे कातडे पांघरून व शहामृगाप्रमाणे चालून शहामृगाची शिकार करण्यात ते पटाईत आहेत. या शिकारीत त्यांना कुत्र्यांचे साहाय्य होते. जनावरांचे कच्चे, शिजविलेले वा भाजलेले मांस, हेच त्यांचे प्रमुख अन्न. रानटी कंदमुळे-फळे यांवरही त्यांचा उदरनिर्वाह चालतो. खाद्य संकलनासाठी देखील ही जमात प्रसिद्ध आहे. ही झुडपातील माणसे असल्यामुळे यांची वस्त्रे कातडी, व झाडाची पाने यांची केलेली असतात. बरेचजण कंबरेला कातडे गुंडाळतात आणि अंगावरही तसेच कातडे वापरतात, त्यास ‘कारोस’म्हणतात. याचा त्यांना झोपण्यासाठीही उपयोग होतो. नात्यामध्ये व नात्याबाहेरही लग्न होते. वराला अवघड शिकार-विशेषतः गेंड्याची शिकार करून दाखवावी लागते. अपहरण, विवाह ही त्यांच्यात नित्याची प्रथा झालेली आहे. मुलाने मुलीला भेट वस्तु देणे व नाचगाणे या समारंभाने लग्नाचा औपचारिक सोहळा साजरा करतात.
बुशमनांच्या सामाजिक आचारांबद्दल थोडी माहिती आढळते. तारूण्यागमाची दिक्षा देण्याची प्रथा सर्व बुशमनात आढळते. रजस्वला स्त्रीसाठी वेगळी झोपडी असते आणि त्या स्त्रीला खाण्यापिण्याच्या बाबतीत निर्बंध पाळावे लागतात. ताती बुशमन गटात यौवन दिक्षेच्या वेळी मुलाची सुंता करतात. इतर बुशमनात ही प्रथा नाही.
बुशमन स्वतंत्र बोलीभाषा असून ती कोइन(क्वाइसॅन) भाषा कुटुंबातील आहे. त्यांच्या भाषेत चकचक किंवा उद्गारवाचक चिन्हांतून एक विशिष्ठ आवाज निघतो. हे वैशिष्ट्य इतर भाषात क्वचितच आढळते. त्यांच्या प्रत्येक टोळीत एक वयोवृद्ध प्रमुख असतो. झोपडीतील अग्नी प्रथम पेटविण्याचा मान त्याला देतात. हा अग्नी झोपडी सोडेपर्यंत तेवत ठेवतात. करंगळीचे वरचे पेर तुटलेले असणे हे सौंदर्याचे लक्षण मानतात. शहामृगाच्या कातडीचे मणी करून त्याच्या माळा स्त्री-पुरुष घालतात. माळा, पिसे यांच्या मोबदल्यात तंबाखू, लोखंडी हत्यारे ते घेतात. शिकारीच्या वेळी वाळवंटातून शहामृगाच्या अंड्यातून ते पाणी नेतात.
पुनर्जन्म, भूतपिशाच्च यांवर त्यांचा विश्वास आहे. चंद्रास त्यांच्यात महत्व असून चंद्रोदय, पौर्णिमा, अमावस्या यांवरून ते कालमापन करतात.
मृताचे पाय पोटाशी दुमडुन त्याला एका कुशीवर ठेवून पुरतात. त्यांच्या दफनविधीवरून मरणोत्तर जीवनावर त्यांचा विश्वास असल्याचे दिसून येते कारण जीवनोपयोगी साहित्य ते मृताबरोबर थडग्यात पुरतात व येणाराजाणारा त्या थडग्यावर दगड ठेवुन पुढे जातो. बुशमन हे एकेकाळी दक्षिण आफ्रिकेतले एकमेव रहिवासी होते.
संदर्भ : 1. Hellman, E.S. The Bushmen and Their Stories, New York, 1971.
2.Thomas, E.M. The Harmiess People, Harmondsworth,1969.
भागवत, दुर्गा
“