बुरूंडी : पूर्व आफ्रिकेतील प्रजासत्ताक राष्ट्र. विस्तार २°’३०‘ द. ते ४°३०‘ दक्षिण व २९°पू.३१° रेखांश. क्षेत्रफळ २ ७,८३४  चौ. किमी. लोकसंख्या ४ १ ,१ ०,००० (१ ९ ७९ ) असून बुरूंडीच्या उत्तरेस रूआंडा, पश्चिमेस झाईरे, आग्नेयीस टांझानिया आणि नैर्ऋत्येस टांगानिका सरोवर येते. टांगानिका सरोवर व रूझीझी नदी यांमुळे बुरूंडी व झाईरे यांच्यामध्ये नैसर्गिक सरहद्द निर्माण झालेली आहे. बुरूंडी हे आफ्रिकेमधील लोकसंख्येची कमाल घनता (प्रति चौ. किमी. स १४०) असलेले राष्ट्र असून ते जगातील गरीब राष्ट्रांपैकी एक आहे. कागेरा हा नाईल नदीचा अगदी दक्षिणेकडील शीर्षप्रवाह बुरूंडीच्या हद्दीतच येतो. बुजुंबुरा ही देशाची देशाची राजधानी (१ ,५ १ ,०००-१९ ७९ ) आहे.

भूवर्णन : देशाचा बहुतेक भूप्रदेश पठारी, डोंगराळ असून कॅंब्रियनपूर्व काळातील खडकांचा बनलेला आहे. आफ्रिकेच्या पर्व भागातील दक्षिणोत्तर पसरलेल्या प्रसिद्ध खचदरीची प्रश्चिम शाखा देशाच्या पश्चिम सरहद्दीवरून जाते. नाईल नदी व काँगो नदी यांचा जलविभाजक असलेली डोंगररांग दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेमुळे उंचवट्याचा डोंगराळ प्रदेश व त्याच्या पूर्व-पश्चिमेचे पठारी प्रदेश असे देशाचे प्रमुख दोन भाग पडतात. उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश जास्त उंचीचा (उंच शिखर २,७६० मी.) असून तो पुढे रूआंडामधील ज्वालामुखीजन्य पर्वतांशी जोडलेला आहे. देशातील पठारी प्रदेशाची उंची सरासरी १,५२४  मी. असून ईशान्य व आग्नेय सरहद्दींवरील अनुक्रमे कागेरा व मालागारासी नद्यांच्या खोऱ्यात ती १,३७० मी. पर्यंत खाली येते. नैर्ऋत्य व पश्चिम सरहद्दींवर टांगानिका सरोवर व रूझीझी नदीखोऱ्याचे प्रदेश कमी उंचीचे (९ ०० मी. पेक्षा कमी)आहेत. पश्चिमेकडील पठार तीव्र उताराचे, तर पूर्वेकडील मंद उताराचे आहे.

रूझीझी, अकार्यारू, कागेरा, रूव्हिरोंझा, रूव्हूव्हू, लुम्पुंगू, मालागारासी इ. नद्या महत्त्वाच्या आहेत. रूझीझी नदी किवू सरोवरात उगम पावून बुरूंडी देशाच्या पश्चिम सरहद्दीवरून प्रथम वायव्य-आग्नेय व नंतर दक्षिण दिशेने वाहत जाऊन टांगानिका सरोवरास मिळते. या नदीचा मुखाकडील भाग शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. अकार्यारू नदी देशाच्या उत्तर सीमेवरून प्रथम पश्चिम-पूर्व दिशेने व पुढे दक्षिणउत्तर दिशेने वाहत जाऊन कागेरा नदीस मिळते. कागेरा नदी देशाच्या उत्तर सीमेवरून पश्चिम-पूर्व दिशेने वाहत जाते. ही नदी म्हणजे व्हिक्टोरिया नाईल नदीचा प्रमुख शीर्षप्रवाह आहे. रूव्हिरोंझा नदी देशात बुजुंबुराच्या पूर्वेस उगम पावून ईशान्य दिशेने १७६ किमी. वाहत जाऊन रूव्हूव्हू नदीस मिळते. रूव्हूव्हू नदी पुढे ईशान्य दिशेने देशाच्या ईशान्य सरहद्दीवरून वाहत जाऊन कागेरा नदीस मिळते. त्यामुळे रूव्हिरोंझा नदी हा नाईल नदीचा एक शीर्षप्रवाह मानला जातो. लुम्पुंगू नदी देशाच्या पूर्व सरहद्दीवरून दक्षिण दिशेने वाहत येऊन मालागारासी नदीस मिळते. मालागारासी ही देशाच्या आग्नेय सरहद्दीवरील महत्त्वाची नदी असून ती टांगानिका सरोवराजवळ उगम पावून देशाच्या सरहद्दीवरून ईशान्य दिशेने ४०० किमी. वाहत जाऊन पुढे टांझानियामध्ये प्रवेश करते. या महत्त्वाच्या नद्यांशिवाय देशाच्या नैर्ऋत्य सरहद्दीवर प्रसिद्ध⇨टांगानिका सरोवर असून र्वेरू व कोहोहा ही देशाच्या उत्तर सीमेवरील महत्त्वाची अन्य सरोवरे आहेत. देशांत टांगानिका सरोवराकाठी काही दलदलीचे प्रदेश आढळतात.

चौंडे, मा. ल.

हवामान : येथील हवामान सर्वसाधारणपणे उष्ण कटिबंधीय असले, तरी उंच भागात ते समशीतोष्ण स्वरूपाचे आढळते. हा देश विषुववृत्तासमीप वसलेला असल्याने, येथे प्रतिवर्षी दोन कोरडे व दोन आर्द्र ऋतू असतात. जास्त उंचीच्या भागांत वार्षिक पर्जन्यमान सु. १३७.५  सेंमी. असून नैर्ऋत्य भागात तसेच टांगानिका सरोवराच्या किनारी भागात ते १०० सेंमी. पेक्षाही कमी असते. मे ते ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत कोरडा ऋतू असतो.अनियमित पावसामुळे अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. पठारी प्रदेशातील सरासरी तपमान २१°से. असून १,९८१  मी.पेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात कमाल व किमान तपमान अनुक्रमे ३३° से. व ६° से. आढळते.

वनस्पती व प्राणी : पर्वतीय उतारावर जंगले असून पठारी प्रदेशात सॅव्हाना गवताची मैदाने  मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. देशातील जंगलसंपत्तीचा ऱ्हास होत गेल्याने पुनर्वनीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या वृक्षप्रकारांमध्ये यूकॅलिप्टस, बाभूळ, तेल माड यांचा अंतर्भाव होतो. एके काळी बुरूंडीमधील प्राणिजीवन विपुल व विविध होते. आता ते बरेच कमी झाले असले, तरीही हत्ती, सिंह, चित्ता, पाणघोडा, सुसर, रानरेडा, बॅबन, हरिण, रानडुक्कर इ. प्राणिविशेष अजूनही आढळतात.

इतिहास : मध्य-पूर्व आफ्रिकेच्या महासरोवरीय प्रदेशामध्ये सु. चौदाव्या शतकात बूगांडा बुन्योरो अंकोली( विद्यमान युगांडा देशातील राज्य), टांझानियामधील बूहा आणि रूआंडा ही जी अनेक जमातींची राज्ये उदयास आली, त्यांपैकीच बुरूंडी हे एक होय. या सत्ताधारी जमाती बाहेरून आलेल्या होत्या व या प्रदेशातील मूळच्या रहिवाशांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले होते. ‘ट्वा’हे पिग्मी लोक बुरूंडीमधील मूळचे रहिवासी होत. त्यांनी बुरूंडीमध्ये काँगोमधून प्रवेश केल्याचे मानले जाते. ‘हूतू’हे बांतू लोक असून ते मुळात चॅडनायजर भागांतून आल्याचे व इ. स. दुसऱ्या शातकात मध्य व पूर्व आफ्रिकेत स्थायिक झाल्याचे मानतात. हे मूलतः शेती करणारे लोक होते. `तूत्सी‘ हे उंच, योद्धयांप्रमाणे दिसणारे लोक नाईल खोऱ्यातून अथवा इथिओपियामधून आलेले असून पूर्व आफ्रिकतील `गॅल‘ लोकांशी त्यांचे साधर्म्य मानले जाते. तूत्सी हे बुरूंडीमध्ये पंधराव्या ते अठराव्या शतकांदरम्यान आले असावेत. तूत्सींनी लवकरच हूतू व इतर जमातींच्या लोकांवर प्रभुत्व मिळविले. बुरूंडीमध्ये राजकीय व आर्थिक सत्ता `गन्वा‘ वर्गाच्या हाती होती. हा वर्ग म्हणजे तूत्सी जमातीतील सत्ताधारी वर्ग होय. अर्थातच याच वर्गातून प्रांताधिकारी व राज्यकर्ते निर्माण झाले.


रिचर्ड बर्टन आणि जॉन स्पीक या दोन इंग्रज समन्वेषकांनी १८५८ मध्ये प्रथम बुरूंडीचा शोध लावला १८७१  मध्ये हेन्री स्टॅन्ली आणि डेव्हिड लिव्हिंग्स्टन हे दोन इंग्रज समन्वेषक बुजुंबुरा येथे उतरले. १८९४  मध्ये जर्मन संशोधकांनी या भागात प्रवेश केला. बुरूंडी हा प्रदेश शेजारील रूआंडाबरोबरच जर्मन पूर्व आफ्रिकेत समाविष्ट करण्यात आला. त्या काळी बुरूंडीमध्ये बेझी आणि बाटारे या दोन सत्ताधारी गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. अखेरीस १९१५  मध्ये बेझी गटातील म्वामी (राजा)चौथा म्वाम्बूत्सा याला राजपद देण्यात आले. पहिल्या महायुद्धानंतर बुरूंडी व रूआंडा हे प्रदेश राष्ट्रसंघाचे महादिष्ट प्रदेश म्हणून जाहीर करण्यात येऊन त्यांचे प्रशासन `रूआंडाऊरूंडी‘ या नावाने बेल्जियमकडे सोपविण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस रूआंडा-ऊरूंडी हा भाग संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश ठरविण्यात येऊन पुन्हा त्याचे प्रशासन बेल्जियमकडेच सोपविण्यात आले. बेल्जियमने अप्रत्यक्ष प्रशासनाचे धोरण ठेवल्याने म्वाम्बूत्साचे स्थान अधिक बळकट होत गेले. १९५९  मध्ये प्रथमच बुरूंडीमध्ये `अपरोना‘ (नॅशनल युनिटी अँड प्रोग्रेस पार्टी )व `पीडीसी‘ (क्रिश्चन डेमॉक्रॅटिकपार्टी ) हे दोन प्रमुख राजकीय पक्ष उदयास आले. १८ सप्टेंबर १९६१  रोजी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये `अपरोना‘ पक्षाने राष्ट्रीय संसदेच्या एकूण ६४  जागांपैकी ५८ जागा जिंकल्या व या पक्षाचा राजपुत्र लूइस र्‌वागासोरे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आला. परंतु एक महिन्याच्या आत त्याचा खून करण्यात आला. १  जुलै १९६२  रोजी बुरूंडीला स्वातंत्र्यमिळाल्यानंतर विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांना खुनात सहभागी झाल्याबद्दल फाशी देण्यात आले. र्‌वागासोरेच्या नेतृत्वाखाली अपरोना पक्षाने हूतू-तूत्सी यांच्यामधील मतभेद दूर करण्यात बरेच यश मिळविले होते, तथापि त्याच्या खुनानंतर अपरोना पक्षातच मोठी दुफळी पडली. १५  जानेवारी १९६५  रोजी प्येअर एन्‌गेंदान्दुन्वे या हूतू पंतप्रधानाचा खून झाल्यामुळे म्वामी राजाने हस्तक्षेप करणे आवश्यक ठरले यातचत्याच वर्षीच्या मे महिन्यात घेण्यात आलेल्या निवडणुकांत हूतू-तूत्सी संघर्षाला बांध घालण्यास म्वामी राजा असमर्थ ठरला. राष्ट्रीय संसदेत हूतूंना ३३ पैकी २३ जागा मिळाल्या. तथापि १३ सप्टेंबर १९३५  रोजी बेझी गटातील (तूत्सी)लीओपोल्ड विहा याला पंतप्रधान नेमण्यात आले. १८ ऑक्टोबर रोजी हूतू लष्करी सैनिकांनी अवचित सत्तांतर केले आणि हूतू शेतकऱ्यांनी देशभर धुमाकूळ घालून हजारो तूत्सींची कत्तल केली परंतु लवकरच कॅप्टन मायकेल मिकोम्बेरो याने राजनिष्ठ सैनिकांच्या साहाय्याने हा उठाव मोडण्यात यश मिळविले व चौथा म्वाम्बूत्सा याने लष्कराच्या हाती सत्ता सोविण्याचे व बुरूंडी सोडून यूरोपमध्ये स्थायिक होण्याचे ठरविले. मार्च १९६६ मध्ये त्याला युवराज चार्ल्स एन्‌डिझेये या आपल्या १९  वर्षे वयाच्या मुलाच्या हाती राज्यकारभाराची बहुतेक सर्व सूत्रे सोपवावी लागली. जुलैमध्ये राजपुत्र चार्ल्सने आपल्या वडिलांना पदच्युत केले व कॅप्टन मिकोम्बेरोला पंतप्रधान नेमले. तथापि चार्ल्स व मिकोम्बेरो यांच्यातील मतभेद वाढत गेले. २८ नोव्हेंबर १९६६ रोजी मायकेल मिकोम्बेरोने त्याला पदभ्रष्ट केले आणि बुरूंडी हे प्रजासत्ताक व स्वतःस अध्यक्ष म्हणून घोषित केले.

 स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेल्या जमातींच्या या सत्तासंघर्षांची परिणती एप्रिल-मे १ ९ ७२  मध्ये घडून आलेल्या भीषण मानवी हत्याकांडात झाली. या भयंकर मानवसंहाराला आफ्रिकेच्या इतिहासात तोड नाही. २९  एप्रिल १९७२  रोजी हूतूप्रणीत अवचित सत्तांतराच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर, सु. १  लक्ष हूतूंची हत्या करण्यात आली. सर्व सुशिक्षित हूतूंचा पद्धतशीरपणे संहार केल्यामुळे अल्पसंख्य तूत्सींचे नागरी व लष्करी संस्थांवर अनियंत्रित वर्चस्व प्रस्थापित झाले.

 मिकोम्बेरोने चार्ल्सला पदभ्रष्ट केल्यामुळे राजेशाही नष्ट होऊन राजकारणामधील स्थिरताही संपुष्टात आली. हुतू अधिकाऱ्यांची व राजकारणपटूंचीवारंवार हकालपट्टी करीत गेल्यामुळे सबंध सत्ता तूत्सींच्याच हाती गेली. १९७१  च्या सुमारास मिकोम्बेरोने उभारलेल्या `कौन्सिल सुप्रीम दे ला रिपब्लिक‘ (सीएस्‌आर) या मंडळात (जन्टा) तूत्सींचे प्रमाण सर्वाधिक (तूत्सी २३, हूतू २ व गन्वा २  होते. तूत्सींचा भरणा सर्व अधिकारपदांबाबत मोठ्या प्रमाणात वाढत गेला.

 अल्पसंख्य तूत्सींमध्येही खरी सत्ता दक्षिणेकडील बुरूरी प्रांतामधून आलेल्या तूत्सींकडेच एकवटलेली होती. त्यांपैकी तूत्सी-हिमा लोकांनी शासनाची महत्त्वाची सत्ताकेंद्रे तसेच लष्करामधील सत्तस्थाने बऴकाविली उत्तरेकडील तूत्सी-बान्यारूगूरू लोकांना त्या मानाने किरकोळ अधिकारपदे मिळाली. यामुळेच हूतू जमातीच्या लोकांमध्ये वंशद्वेषाची तीव्र भावना निर्माण होत गेली. १९७२  पासून बुरूंडीमधील कित्येक हूतूंनी टांझानिया, झाईरे व रूआंडा या देशांमध्ये आश्रय घेतला असून रूआंडामधील सु. ५ ०,००० तूत्सींनी बुरूंडीमध्ये वसती केली.

 नोव्हेंबर १९७४  च्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये मायकेल मिकोम्बेरो याची पुनश्च बुरूंडी प्रजासत्ताकाचा अध्यक्ष तसेच अपरोना पक्षाचा महासचिव म्हणून नियुक्ती झाली. मात्र दोन वर्षांनी (१  नोव्हेंबर १९७६) झां-बातीस्त वागाझा हया लष्कराच्या उपप्रमुखाने सैन्याच्या साहाय्याने रक्तशून्य क्रांती घडवून आणून मिकोम्बेरोचे सरकार उलथून पाडले. त्याने स्वतःला बुरूंडी प्रजासत्ताकाचा तसेच सर्वोच्य क्रांतिकारी परिषदेचा अध्यक्ष म्हणून घोषित केले. १९७६ मध्ये उदयास आलेल्या दुसऱ्या प्रजासत्ताकामध्ये राष्ट्रीय ऐक्य साधणे व १९७२  च्या भीषण मानवसंहारामुळे उद्भवलेल्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टींवर भर देण्यात आला. गेल्या दोन वर्षांत शेकडो निर्वासित बुरूंडीस परतले आहेत, शेतकऱ्यांवरील कर कमी करण्यात आले आहे, स्वामित्वषियक अधिकारांचे रूपांतर `कसेल त्याची जमीन‘ यांमध्ये झाले आहे शासकीय कार्यामध्ये ग्रामीण विकासाला अग्रक्रम देण्यात आला असून, जागतिक बॅंकेच्या साहाय्याने बागाझा शासनाने देशातील दळणवळणाच्या साधनांमध्ये (अधःसंरचनेमध्ये) सुधारणा, विस्तारसेवा तसेच ग्रामीण सहकारी संस्थांची उभारणी यांद्वारा देशाचे कृषिउत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

 राजकीय स्थिती : नवीन लष्करी प्रशासनाखालील बुरूंडी हे प्रजासत्तक म्हणून घोषित करण्यात आले असले, तरी अपरोना पक्षाच्या हालचालींवर आणि कार्यावर बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्य लष्करी परिषद ३० सदस्यांची व परिषदेची कार्यकारी समिती ११ सदस्यांची असून या दोहोंचा प्रमुख हा राष्ट्राध्यक्ष असतो. या परिषदेला राष्ट्राध्यक्ष जबाबदार असतो. ऑक्टोबर १९७८ पासून पंतप्रधानपद रद्द करण्यात आले असून अध्यक्ष हाच शासनयंत्रणेचा प्रमुख म्हणून काम पाहतो. देशाचे ८ प्रांत, १८ जिल्हे व ७८ कम्यून असून प्रत्येक प्रांत लष्करी राज्यपालाच्या अखत्याराखाली आहे.


संरक्षण : राष्ट्रीय संरक्षण दलात ६,००० सैनिक, १५ ,००० निमलष्करी सैनिक असून नौदलाचा लहानसा काफिला व छोटेसे वायुदल (४  सेस्ना ४  ॲल्यूट हेलिकॉप्टर) आहे. १ ९ ७८ च्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणावरील खर्च २३ टक्के होता. १९ ७१  मध्ये हे प्रमाण १३.२  टक्के होते.

 न्यायव्यवस्था : बुजुंबरा येथे न्यायाधिकरण, अपील न्यायालय व सर्वोच्य न्यायालय आहे. गिटेगा व अंगोझी येथे दोन नवीन अपील न्यायालये स्थापण्यात येणार आहे. यांशिवाय १४  प्रांतीय न्यायाधिकरणे असून ६४ लहान निवासी न्यायाधिकरणेही कार्यवाहीत आहे.

 आर्थिक स्थिती : बुरूंडी हा जगातील एक गरीब देश असून १९७६ मध्ये त्याचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन १२० डॉ. एवढे होते. जानेवारी १९७५  च्या लॉमे करारानुसार बुरूंडी हा जगातील २२  अल्पविकसित देशांपैकी एक असून विशेष अर्थसाहाय्यास पात्र आहे. सरकारच्या १९७८-८२ या पंचवार्षिक योजनेचे मूळ उद्दिष्टच अन्नधान्याची तूट भरून काढणे आणि कृषी, वाहतूक व संदेशवहन या क्षेत्रांत अधिकाधिक गुंतवणूक करणे हे आहे.

कृषी : सु. ८५ टक्के लोक निर्वाह शेतीमध्ये गुंतलेले आहेत. घेवडा, कसावा, मका, रताळी, भुईमूग, वाटाणा, ज्वारी ही पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे केळी, आंबे, पपया, संत्री यांसारख्या उष्ण कटिबंधीय फळांचेही उत्पादन होते. देशाचे प्रमुख नगदी पीक कॉफी हे असून त्यांपैकी ९३ टक्के अरेबिका कॉफी असते. कॉफीची प्रतवारी व निर्यात यांकरिता एक स्वतंत्र मंडळ स्थापण्यात आले आहे. १९७७ मध्ये १७,००० मे. टन कॉफी उत्पादन झाले. कापूस उत्पादन वाढविण्याचे विशेष प्रयत्न चालू आहेत. चहा हे दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक असून १९६३ पासून त्याच्या उत्पादनास प्रारंभ झाला. त्येझ, ऱ्वेगूरा आणि मूराम्व्ह्या येथील चहामळे विकसित करण्यात येत आहेत. १९७९ मधील चहा उत्पादन २,०००मे. टन होते. कापूस व तांदूळ यांचे उत्पादन वाढविण्यासाठी इंबो पठारावरील ओसाड जमीन लागवडीखाली आणण्याचे विशेष प्रयत्न ‘संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम’व ‘फाओ’ यांच्या आर्थिक मदतीने चालू आहेत. पशुपालन हा परंपरेने चालत आलेला महत्त्वाचा व्यवसाय असून १९७९ मध्ये गाईगुरे ८.३६ लक्ष, मेंढ्या व बकऱ्या ९.२१ लक्ष व डुकरे ५१,००० होती. पशूंची गुणवत्ता सुधारण्याचे विशेष प्रयत्न जारी आहेत. मोठ्या प्रमाणावर गाईगुरांचे कळप बाळगावयाचे, परंतु त्यांपैकी फार थोडे मांस व कातडी उत्पादन यांकरिता उपयोगात आणावयाचे, या परंपरागत पद्धतीचा पशुधनाच्या विकासामध्ये अडथळा येत असल्याचे दिसते. तथापि चामड्याचे उत्पादन व निर्यात ही १९७७ पासून वाढू लागली आहे. टांगानिका सरोवरात थोड्याफार प्रमाणात मासेमारी चालते. १९७७ मध्ये एकूण १९,४९५ मे. टन मत्स्योत्पादन झाले. मच्छीमारी उद्योगाचा विकास करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

 खनिजसंपत्ती : बॅस्टनासाइट आणि कॅसीटॅराइट या खनिजांचे अल्प प्रमाणावर उत्पादन ‘कारोंगो मायनिंग कंपनी’(सोमिका) करीत असून सोने आणि कोलंबाइट-टॅंटॅलाइट इत्यादींचे उत्पादन थोड्या प्रमाणावर करण्यात येते. युरेनियमच्या साठ्यांचे शोध घेण्याचे काम चालू आहे. रूझीझी खोऱ्यात खनिज तेल सापडले असून त्याबाबत संशोधन सुरू आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका सर्वेक्षण मंडळाला १९७३ मध्ये मुसोंगाटीच्या आसमंतात मोठ्या प्रमाणावर (१.४० कोटी डॉ. किंमतीचे) निकेलचे साठे सापडले असून १९७७ मध्ये व्यापारी प्रमाणावर निकेलचे उत्पादन करण्यासाठी एक अभ्यास गट नेमण्यात आला. तांबे, कोबाल्ट, प्लॅटिनम यांसाख्या धातूंच्या उत्पादनाबाबत अधिक संशोधन चालू आहे. बेथलीएम स्टील, केनेकॉट व अमेरिकन मेटलक्लायमॅक्स या अमेरिकन कंपन्या वरील धातूंचे व्यापारी प्रमाणावर उत्पादन करण्यामध्ये विशेष रस घेत आहेत.

 उद्योग : कापूस, कॉफी, चहा इ. कृषिपदार्थाच्या प्रक्रिया-उद्योगांखेरीज देशात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले नाही. तथापि १९७८-८२च्या पंचवार्षिक योजनेच्या अनेक उद्दिष्टांपैकी निर्यातीत विविधता आणून तिची वाढ करणे व प्रतिकूल भागांत उद्योजकांना उद्योगधंदे सुरू करण्यास प्रोत्साहन देणे, ही उद्दिष्टे महत्त्वाची असून त्यांयोगे कुंठित अर्थव्यवस्थेला गतिमान करणे हे योजनेचे मुख्य ध्येय आहे. १९७८ च्या सुमारास कापड व वस्त्रे, सिमेंट, पादत्राणे, कीटकनाशके इत्यादींचे कारखाने देशात उभारण्यात आले. बुरूंडीचे समुद्रापासूनचे दीर्घ अंतर [बुजुंबुरा ते दारेसलाम (टांझानिया) १,४०० किमी. आणि बुजुंबुरा ते माताडी (झाईरे) २,००० किमी.]हे बुरूंडीच्या औद्योगिक विकासाच्या मार्गावरील मोठा अडथळा आहे. म्हणजेच ज्या मालाला प्रचंड वाहतूक खर्च परवडेल, अशा मालाचेच उत्पादन देशात करणे शक्य आहे. सांप्रत देशात बीर, साबण यांच्या उत्पादनाचे कारखाने आहेत. १९७५ मध्ये विविध व्यवसायांत गुंतलेले मनुष्यबळ खालीलप्रमाणे होते : पारंपरिक शेती १८.४५ लक्ष मासेमारी १०,५०० पारंपरिक व्यापार-उदीम १७,७०० खाजगी क्षेत्र, ६९,३०० सरकारी क्षेत्र २२,००० व्यावसायिक क्षेत्र १,४००. युनियन देस ट्रॅव्हेल्यूर्स टू बुरूंडी (युटीबी) ही जुन्या कामगार संघटनांनी एकत्रित येऊन १९६७ मध्ये स्थापन केलेली एकमेव कामगार संघटना आहे.

 व्यापार व अर्थकारण : बुरूंडीच्या निर्यात व्यापारामध्ये कॉफी, कापूस, चामडी व कातडी, चहा, खनिजे आणि इतर पदार्थ यांचा अंतर्भाव असून आयात व्यापारात अर्धोत्पादित, भांडवली आणि उपभोग्य वस्तू यांचा प्रामुख्याने भरणा असतो. १९७७ मधील एकूण निर्यात व आयात अनुक्रमे ८०७.३३ कोटी बुरूंडी फ्रॅंक व ६६७.७५ कोटी बु. फॅंरक एवढी होती. आयात व्यापारामधील भागीदार देशांमध्ये बेल्जियम, लक्सेंबर्ग, फ्रान्स, प. जर्मनी, इटली, जपान, केन्या, नेदर्लंड्‌स, टांझानिया, ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, झाईरे इत्यादींचा समावेश होतो तर बेल्जियम, लर्क्सेबर्ग, फ्रान्स, प. जर्मनी, इटली, नेदर्लंड्‌स, ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांना निर्यात केली जाते.

 बुरूंडी हा ‘असोसिएशन ऑफ आफ्रिकन सेंट्रल बॅंक्स’ या संघटनेचा संस्थापक सदस्य देश आहे. ‘बॅंक ऑफ द रिपब्लिकन ऑफ बुरूंडी’(स्था. १९६४) ही मध्यवर्ती बॅंक असून इतर पाच व्यापारी बॅंका आहेत. बुरूंडी फ्रँक हे अधिकृत चलन असून १ बुरूंडी फ्रॅंकचे १०० सेंटिममध्ये विभाजन करण्यात आले आहे. १,५ व १० बु. फ्रँकची नाणी, तर १०,२०,५०,१००,५००,१००० व ५,००० बु. फ्रँकच्या कागदी नोटा प्रचलित आहेत २१६.२ बुरूंडी फ्रँक = १ स्टर्लिंग पौंड आणि ९० बु. फ्रँक = १ अमेरिकी डॉलर असा विदेश विनिमय दर होता (२२ सप्टें. १९८०). विमाव्यवहार हा शासन-नियंत्रित कंपनीद्वारा केला जातो. सरकारी क्षेत्रातील विकास प्रकल्प व उद्योग यांच्या अर्थप्रबंधासाठी एक वित्तसंस्था असून खाजगी क्षेत्रातील अर्थप्रबंधासाठी एक उद्योग व प्रकल्प यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी (खाणी, मळे उद्योग तसेच शेतमाल) निरनिराळ्या वित्तप्रबंधक संस्था स्थापण्यात आल्या आहेत.


शासकीय महसुली उत्पन्न मुख्यतः कर व सीमाशुल्क यांद्वारेच जमा होते. बुरूंडीला आणखी काही काळ तरी भांडवली प्रकल्प त्याचप्रमाणे अर्थसंकल्पीय तरतुदी यांकरिता परदेशी मदतीवर अवलंबून रहावे लागेलसे दिसते. १९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार-शेषामध्ये कॉफी उत्पादनात घट झाल्याने मोठी तूट आली, १९७६ मध्ये बुरूंडी फ्रँकचे १२.५ % नी अवमूल्यन करावे लागले. त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय चलन निधीने ६५ लक्ष एसडीआर कर्ज दिल्याने हे आर्थिक अरिष्ट सुसह्य झाले. आंतरराष्ट्रीय विकास संस्था, यूरोपीय विकास निधी यांसारख्या संस्था बुरूंडीला कॉफी उत्पादन वाढविण्याबाबत आर्थिक, तांत्रिक व शैक्षणिक साहाय्य करीत आहेत. आर्थिक व तांत्रिक साहाय्य अशी दुहेरी मदत करणाऱ्या देशांमध्ये बेल्जियम, फ्रान्स व प. जर्मनी हे प्रमुख होत. चीनने १९७२ मध्ये बुरूंडीला ३ कोटी डॉलरचे कर्ज दिले असून त्याची परतफेड १९८२-९१ यादरम्यान चीनला करावयाच्या निर्यातीच्या स्वरूपात होणार आहे.

 बुरूंडी, रूआंडा व टांझानिया या देशांनी १९७७ मध्ये ‘कागेरा नदीखोरे विकास व व्यवस्थापन संघटना’ स्थापन केली असून, तिच्याद्वारे जलसिंचन वीजउत्पादन, नौवहन, खाणकाम इत्यादींचा विकास करण्यात येणार आहे. कागेरा नदीखोरे प्रकल्पाबरोबरच १९७७-७८ मध्ये बुजुंबुरा व गिटेगा या शहरांजवळ उभारणीकाम सुरू झालेल्या जलविद्युतनिर्मिती केंद्रामुळे नजीकच्या काळात बुरूंडीचे विजेबाबतचे परावलंबन दूर होऊ शकेल वीज उत्पादनाबाबतच्या आत्मनिर्भरतेमुळे खाणकाम उद्योगाचाही मोठ्या प्रमाणावर विकास होईल, अशी अपेक्षा आहे. सप्टेंबर १९७६मध्ये बुरूंडी, रूआंडा व झाईरे या देशांनी ‘इकॉनॉमिक कम्यूनिटी ऑफ ग्रेट लेक्स कंट्रीज’ असा आर्थिक समुदाय स्थापन केला.

 वाहतूक व संदेशवहन : बुरूंडीमध्ये लोहमार्गाची सुविधा नाही, तथापि जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने टांझानियाला जोडणारा लोहमार्ग बांधण्याची योजना विचाराधीन आहे. रस्त्यांचे मात्र देशात मोठ्या प्रमाणावर जाळे असून १९७७ मध्ये रस्त्यांची एकूण लांबी १०,४७६ किमी. होती पैकी २,२६७ किमी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग, तर २,३११किमी. लांबीचे दुय्यम दर्जाचे मार्ग होते. त्याच वर्षी देशात ४,९७० मोटारी, १,५८६ गाडया (व्हॅन), ७२६ ट्रक आणि ५७५ इतर वाहने होती. टांगानिका सरोवरातील बुजुंबुरा हे देशातील महत्त्चाचे एकमेव बंदर असून बुजुंबुरापासून टांझानिया, झॅंबिया व झाईरे या देशांशी चालणाऱ्या जहाजवाहतुकीवरच बुरूंडीचा बहुतेक विदेश व्यापार निर्भर आहे. ‘एअर बुरूंडी’ ही १९७१ साली स्थापन झालेली सरकारी क्षेत्रातील विमानकंपनी असून ती किगाली (रूआंडा), किगोमा (टांझानिया), बूकावू व गोमा (झाईरे) या शहरांना हवाई वाहतूकसेवा उपलब्ध करते. एअर झाईरे, एअर फ्रान्स, कॅमेरून एअरलाइन्स, एअर टांझानिया व सॅबीना (बेल्जियम) या परदेशी विमानकंपन्या बुजुंबुराला हवाई वाहतूक उपलब्ध करतात. बुजुंबुरा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथे शासननियंत्रित नभोवाणी केंद्र असून त्याद्वारे किरूंडी, स्वाहिली व फ्रेंच भाषांमधून दैनिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. १९७८मध्ये देशात १.१० लक्ष रेडिओ, तसेच ४.९९५ दूरध्वनी होते.

 लोक व समाजजीवन : रूआंडाप्रमाणेच बुरूंडीच्या लोकसंख्येची वांशिक गटानुसारी रचना पुढीलप्रमाणे आहे : हूतू ८४%, तूत्सी १५%, आणि १% ट्वा-पिग्मींसारखे दिसणारे शिकारी जमातीचे लोक. पूर्वीपासून रूआंडा व बुरूंडी या राज्यांमध्ये शत्रुत्व होते आणि अद्यापही ते कायम आहे. या दोन देशांच्या किरूंडी व किन्या रूआंडा या भाषांमध्ये साधर्म्य आढळते. १९७०-७५ यांदरम्यान देशातील सरासरी वार्षिक जननप्रमाण दरहजारी ४८, तर मृत्युमान दरहजारी २४.७ होते. हेच प्रमाण १९६५-७० यांदरम्यान अनुक्रमे ४८.१ व २७ (दरहजारी) होते. लोकसंख्यावाढीचे प्रमाण प्रतिवर्षी २ टक्के आहे. सु.५० टक्के लोकसंख्या २५ वर्षे वयाखालील, ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. हूतू व तूत्सी यांच्यात आंतरविवाह होतात. तूत्सींची उंची साधारणतः १७३सेंमी. असून ते गुरे पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या गुरांना वैशिष्ट्यपूर्ण अशी सारंगीच्या आकाराची शिंगे असतात. पूर्वी ते जंगलात राहत होते, आता ते शिकार व मातीकाम करतात. वरील तीन जमातींच्या लोकांशिवाय आणखी तीन अल्पसंख्यांक समूह देशात आढळतात. पहिले म्हणजे यूरोपीय-प्रामुख्याने ते व्यावसायिक, धर्मप्रसारक वा तांत्रिक कामामध्ये गुंतलेले आहेत. इतर देशांतून आलेले व तेथे स्थायिक झालेले लोक-विशेषतः रूआंडा व झाईरे या देशांतील निर्वासित-हा दुसरा समूह होय. तिसरा समूह आशियाईंचा-हा सर्वांत लहान समूह असून तो व्यापारउदिमांत गुंतलेला आहे. किरूंडी व फ्रेंच या अधिकृत भाषा असल्या, तरी स्वाहिली भाषाही बोलली जाते. काही शाळांमधून इंग्रजीही शिकविली जाते. किरूंडी ही भाषा केवळ बुरूंडीतच नव्हे, तर रूआंडा व अन्य शेजारील राष्ट्रांतही बोलली जाते. बुरूंडी व रूआंडा या देशांत सु. ७० लक्ष लोक, टांझानियात सु. २० लक्ष आणि झाईरे देशामधील बूकाव्वू भागातील सु. २० लक्ष लोक ही भाषा बोलतात.

 बुरूंडीमध्ये प्रत्येक ५८,००० लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण असून १९७४ मध्ये ७० डॉक्टर व ४,००० हून अधिक खाटा होत्या. हिवताप हा रोग आता आटोक्यात आणलेला आहे. पठारी प्रदेशात निद्रारोग नसला, तरी फुप्फुसाचे रोग, विशेषतः क्षय, मोठ्या प्रमाणावर आढळतात. सरकारी आरोग्य क्षेत्रात एक प्रमुख रुग्णालय व आठ वैद्यकीय उपचार केंद्रे आहेत ह्यांशिवाय आठ खाजगी रुग्णालये आणि ८० च्यावर दवाखाने आहेत. 

 

राष्ट्रीय संस्कृतीचा स्त्रोत लिखित स्वरूपापेक्षा मौखिक लोकसाहित्यात आढळतो. कथा, दतंकथा, बोधकथा, कविता व गाणी यांसारख्या पंरपरागत साहित्याने तो नटलेला आहे. वीणा (इनांगा), एकतारी सारंगी (‘डिंगिडी’) यांसारख्या वाद्यांद्वारे संगीतप्रसार केला जातो. बुंरुडी लोकनृत्याला विशेषतः तूस्सी नृत्यप्रकाराला आंतरराष्टीय ख्याती लाभली आहे.

महत्वाची स्थळे : बुजुंबरा ही बुंरूंडीची राजधानी व एकमेव बंदर, तर गिटेगा (१५,३३०-१९७७)ही ऐतिहासिक राजधानी , अशी दोनच उल्लेखनीय शहरे देशात आहेत.

 व्यवसाय या दृष्टीने पर्यटनाचा अद्यापि विकास झालेला नाही, तथापि शासनाने पर्यटंकाना आकृष्ट करण्याच्या योजना आखल्या असून१९७७मध्ये टांगानिका सरोवराकाठी एक अद्ययावत हॉटेल बांधण्यात आले. जानेवारी -जून १९७६ मध्ये बुरूंडीस१३,००० पर्यंटकानी भेट दिली.

संदर्भ :     1. Blakey, K. A. Economic Development of Burundi, Cairo, 1974.

             2. Lemarchand, Rene, Ruanda and Burundi, London, 1970.

             3. Weinstein, W. Historical Dictionary of Burundi, Metuchen (N. J.), 1976.

 

गद्रे, वि. रा.