बुगनविलिया : आपल्या सुंदर फुलोऱ्याने सदैव आकर्षित करणाऱ्या या वंशातील वनस्पती मूळच्या दक्षिण अमेरिकेतील असून हल्ली जगभर पसरलेल्या आहेत.⇨ गुलयुश व पुनर्नवा यांच्याप्रमाणे हा वंश ⇨ निक्टॅजिनेसी कुलात समाविष्ट असल्याने ह्याची सर्वसामान्य लक्षणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत. अठराव्या शतकाच्या शेवटी ल्वो आंत्वान दे बूगॅंव्हील (१७२९-१८११) या फ्रेंच नाविकांनी प्रथम यातील एक जाती ब्राझीलहून आणल्याने त्यांचे नाव या वंशास दिले आहे. सध्या याच्या चार जाती (बुगनविलिया बटियाना, बु.ग्लॅब्रा, बु.स्पेक्टॅबिलिस व बु.पेरूवियाना) व संकराने काढलेले काही प्रकार बागेत विशेषकरून लावतात. सर्व जाती काटेरी व बळकट खोडाच्या वेली असून त्यांना साधी व एकाआड एक, लहान पाने व फांद्यांच्या टोकांस येणारे सुंदर विविधरंगी आणि नाजूक छदांचे फुलोरे असतात. फुले फार लहान, नळीसारखी, हिरवट किंवा पिवळट असून त्यांत ७-८ केसरदले, किंजपुटात एकच बीजक असते फुले बहुदा तीन असून प्रत्येकाच्या तळाशी एक मोठा व रंगीत छद असतो [⟶फूल] त्यामुळे ती आकर्षक होतात. फळ शुष्क, न तडकणारे, एकबीजी व परिदलाने तळाशी वेढलेले असते. बु.बटियाना या जातीत छदे टोकदार नसून ती किरमिजी असतात व पाने काहीशी केसाळ असतात बु.ग्लॅब्रा व बु.पेरूवियाना या जातींच्या संकराने ही बनली आहे. १९२० साली ही भारतात आणली गेली. बु.ग्लॅब्रा जातीत फुले झुबक्यांनी येतात छदे टोकदार व लाल असतात ही वर्षभर फुलते पांढरा, फिकट गुलाबी अशा छदांचे प्रकार या जातीत आढळतात काटे आखूड असतात.

बु. पेरूवियाना  या जातीत छदे लहान, फिकट लालसर किंवा गुलाबी असून ती टोकदार नसतात काटे वाकडे. ’लेडी हडसन’ व ’प्रिन्सेस मार्गारेट रोज’ हे तिचे प्रकार परिचित आहेत.

बु. स्पेक्टॅबिलिस  या जातीत छदे टोकदार नसून मोठी जांभळट किंवा जांभळट गुलाबी असतात खोड काटेरी. विटकरी रंगाचा लॅटरिटिया व गुलाबी रंगाचा रोझ कॅटलीना असे प्रकार हिच्यात आढळतात. यांशिवाय निरनिराळ्या रंगांच्या (नारिंगी, शेंदरी इ.) छंदांचे प्रकार असलेले संकरित प्रकारही आढळतात.

बु. आबोंरेसेन्स  ही वृक्षसम जाती ५-८ मी. उंच व मूळची ब्राझीलमधील आहे. तिची वाढ जोमदार असते आणि तिची छदे व पाने मोठी असतात. फांद्यांच्या टोकांची छदे अगदी फिकट निळसर जांभळी असून जून झाल्यावर त्यांच्या रंगात थोडासा बदल होऊन तो गुलाबी फिकट निळसर जांभळा होतो. जुनी छदे सतत राहणारी असतात. दाट हिरवा उत्तम आकाराचा पर्णसंभार असलेला हा वृक्ष फुलांनी बहरलेला असताना फारच सुंदर दिसतो. ह्याला वर्षभर फुले येतात. बागा व उद्यानांच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यास हा फारच चांगला आहे.

बुगनविलियाविषयी आवड निर्माण करण्यासाठी १९७३ साली दिल्लीला ’बुगनविलिया सोसायटी ऑफ इंडिया’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. दिल्ली येथे दरवर्षी मार्चमध्ये या संस्थेतर्फे ’बुगनविलिया उत्सव’ साजरा करण्यात येतो. तेव्हा भरणाऱ्या प्रदर्शनात भारतातील नवीन प्रकार ठेवण्यात येतात. हौशी लोकांच्या व संस्थांच्या उत्कृष्ट नमुन्यांना बक्षिसेही देण्यात येतात.

जमदाडे, ज. वि.

बुगनविलियाचे साधारणतः अर्धवट पक्व वा जून झालेल्या फांद्यांचे १५-३० सेंमी. लांब छाट (तुकडे) एप्रिल-जूनमध्ये कुंड्यांमध्ये अगर वाफ्यांत लावतात. त्यांना मुळे आल्यानंतर ते तेथून काढून कायम जागी पावसाळ्यात लावतात. त्यांना फेब्रुवारी-मार्चमध्ये फुले येतात. गुटी अगर दाब कलमे करूनही लागवड करतात [⟶कलमे]. ही वेल सामान्यतः सुपीक प्रकारच्या जमिनीत चांगली वाढते. तिला भरपूर सूर्यप्रकाश लागतो. ती मांडवावर व कमानीवर चढवितात. उष्ण कटिबंधात तिचा कुंपणासाठी उपयोग करतात. ती काटक असते आणि कमाल शुष्कता सहन करू शकते.

चौधरी, रा. मो.