बिस्मार्क, ऑटो फोन : (१ एप्रिल १८१५ – ३० जुलै १८९८). जर्मन साम्राज्याचा जनक आणि जर्मनीचा पहिला चॅन्सेलर. याचा जन्म सॅक्सनीतील शनहाऊझेन येथे सरंजामदार घराण्यात झाला. वडील फर्डिनांट फोन बिस्मार्क—शनहाऊझेन आणी आई व्हिल्हेल्मीन मेन्केम. फर्डिनांटना राजकारणात रस नव्हता तथापि त्याची आई प्रगत विचारांची व महत्त्वाकांक्षी होती. बिस्मार्कने गटिंगन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली (१८३५). लष्करी शिक्षणाची त्याला फारशी आवड नव्हती. आईच्या मध्यस्थीने त्याला एक्स-ला-शपेल येथे शासकीय विधीखात्यात नोकरी मिळाली परंतु आत्यंतिक आळशी व उच्छृंखल स्वभावामुळे ती त्यास सोडावी लागली. त्यानंतर पॉट्सडॅम येथे त्यास दुसरी नोकरी मिळाली. ती ही त्याने सोडली. नंतर बिस्मार्क विलासी जीवन व्यतीत करू लागला. त्याने योहान्ना फोन पुटकामर या सरदार घराण्यातील युवतीशी विवाह केला (१८४७). एका सदस्याच्या अनुपस्थितीत बिस्मार्कने प्रशियाच्या संसदेत त्याचे प्रतिनिधित्व केले (१८४७). पुढे १८४९ मध्ये तो कनिष्ठ गृहावर निवडून आला. १८५१-१८५८ दरम्यान त्याने जर्मन संस्थानांच्या फ्रॅंकफुर्ट येथील प्रातिनिधिक संस्थेत (फेडरल डायेट) प्रशियाचा प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यामुळे त्यास संसदीय कामकाजाचा अनुभव मिळाला. १८५९ साली त्याची नेमणूक प्रशियाचा अशियातील वकील म्हणून झाली. रशिया आणि प्रशिया यांच्यातील संबंध सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला. १८६२ मध्ये बिस्मार्कची प्रशियाचा राजदूत म्हणून फ्रान्समध्ये नेमणूक झाली. चौथ्या फ्रेडरिक विल्यमच्या मृत्यूनंतर (१८६१) पहिला विल्यम प्रशियाच्या गादीवर आला. त्याच्या सैनिकी कार्यक्रमाच्या अधिनियमास संसदेचा विरोध होता. या परिस्थितीत १८६२ मध्ये बिस्मार्कला पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री नेमण्यात आले. प्रशियन संसदेशी टक्कर देण्यास समर्थ असा बिस्मार्कखेरीज दुसरा मुत्सद्दी नाही, याची जाणीव विल्यमला झाली. १८६२ ते १८७० ह्या काळात बिस्मार्क प्रशियाचा पंतप्रधान आणि १८७१ ते १८९० ह्या काळात जर्मनीचा चॅन्सेलर होता.
बिस्मार्क हा राजेशाहीचा पुरस्कर्ता व हुकूमशाही प्रवृत्तीचा होता. साहजिकच नव्यानेच उदयास येत असलेल्या समाजवादाच्या तो विरोधी होता. जर्मनीच्या विकासासाठी त्याने समान कायद्याची निर्मिती केली आणि समान चलनव्यवस्था अंमलात आणली. १८७५ च्या बॅंक कायद्यानुसार देशातील बॅंकांचे नियंत्रण जर्मन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाकडे (बुनडेस्टाख) सोपविण्यात आले आणि १८७६ मध्ये राइख बॅंक किंवा इंपिरिअल बॅंकेची स्थापना करण्यात आली. रेल्वे मार्गांचे व्यवस्थापकीय एकीकरण, बॅंक व्यवसायातील सुधारणा आणि सक्तीची सैन्यभरती या सुधारणांमुळे अंतर्गत शासनात कार्यक्षमता वाढली. कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी व त्यांनी समाजवादी पक्ष व त्यांची विचारसरणी यांकडे आकर्षित होऊ नये, म्हणून बिस्मार्कने कामगारांच्या हिताचे अनेक कायदे संसदेत संमत करून घेतले. त्यात अपघात व आजारपण यांत कामगारांना आर्थिक साहाय्य, कामाचे विशिष्ट तास, स्त्री-कामगार व बाल-कामगार यांना संरक्षण यांसंबंधीचे कायदे महत्त्वाचे होते. या सुधारणांबरोबरच जर्मन उद्योगधंद्यांना उत्तेजन व संरक्षण देण्याचे धोरण त्यने अंगीकारले.
जर्मन मालाला बाजारपेठ मिळावी, तसेच कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा, म्हणून जर्मनीसाठी वसाहती मिळवण्याचा प्रयत्नही त्याने केला. रोमन कॅथलिक चर्चचा जर्मन राष्ट्रवादाला विरोध होता. याकरिता रोमन कॅथलिक चर्चबरोबर त्याने संघर्षाचे धोरण अवलंबिले. त्याने जेझुइटांना हाकलून दिले, व्हॅटिकनबरोबरचे राजनैतिक संबंध तोडले आणि कायदे करून चर्चवरील शासकीय प्रभाव वाढविला परंतु त्याच्या या धोरणाला चर्चने व कॅथलिकांच्या मध्यवर्ती संस्थेने जोरदार विरोध केला. त्यामुळे या धोरणाला फारसे यश लाभले नाही. एवढेच नव्हे, तर चर्चच्या विरोधातील बहुसंख्य कायदे पुढे मागे घेण्यात आले. १८८८ मध्ये गादीवर आलेल्या जर्मन सम्राट दुसऱ्या विल्यम कैसरबरोबर बिस्मार्कचे मतभेद निर्माण झाले. परिणामतः १८९० मध्ये बिस्मार्कला राजीनामा देणे भाग पडले. निवृतीनंतर काही वर्षांनी तो बर्लिन येथे मरण पावला.बिस्मार्कचे परराष्ट्रीय धोरण अंतर्गत धोरणाशी काही अंशी संलग्न होते. तरीही प्रखर बुद्धिवाद व व्यापक दृष्टिकोण ह्यांमुळे ह्या काळात बिस्मार्क प्रशिया – जर्मनी यांच्या कक्षा ओलांडून मुत्सद्दी झाला. १८६२ ते १८६६ पर्यंत प्रशियन, १८६६ ते १८७० पर्यंत जर्मन व १८७० नंतर तो युरोपीय मुत्सद्दी होता. त्याच्या प्रगल्भ दृष्टिकोनानुसार त्याचे परराष्ट्रीय धोरण बदलत गेले. त्याने आपल्या परराष्ट्रीय धोरणाला लष्करी सामर्थ्याची सदैव जोड दिली.
संसदेशी टक्कर देताना बिस्मार्कने १८६२ मध्ये आदर्शवादी लोकांचा पराभव केला परंतु राष्ट्रीय चळवळीला कमी लेखले नाही. लोकशाही प्रधान राज्य आणि जर्मनीचे एकीकरण या दुहेरी मागणीतील एकीकरणाच्या प्रवृत्तीस त्याने प्रोत्साहन दिले. त्यामुळे आदर्शवादी लोकांचा विरोध झाला तरी सर्वसामान्य जनता त्याच्या विरुद्ध नव्हती. एकीकरणासाठी फ्रान्सशी युद्ध अटळ होते व ऑस्ट्रियाशी संभवनीय होते. जर्मन लोकांवर ऑस्ट्रियाचे असलेले वजन दूर करण्यासाठी कुठल्याही साधनांचा वापर करण्यास बिस्मार्क तयार होता. युद्ध हेही त्याच्या राजनीतीतील एक साधन होते आणि ते त्याने वापरले. श्लेझविग व होलस्टाइन ह्या औत्तरीय प्रांतांवर असलेले डेन्मार्कचे वर्चस्व जर्मन राष्ट्रवाद्यांना जाचत होते. ह्याचा उपयोग करून बिस्मार्कने ऑस्ट्रियास आपल्याशी मैत्री करणे भाग पाडले आणि ह्या प्रांताचा कबजा मिळवला. प्रशियाने एकट्यानेच जर्मन राष्ट्रवादी भूमिका घेऊन जर्मनीमध्ये वर्चस्व मिळवू नये, म्हणून ऑस्ट्रियास प्रशियाशी संगनमत करणे भाग पाडले. ऑगस्ट १८६५ मध्ये गास्टाइनच्या कारारान्वये ऑस्ट्रियाने होलस्टाइन आणि प्रशियाने श्लेझविग प्रांत ताब्यात घ्यावा असे ठरले परंतु ऑस्ट्रियाशी युद्ध हे अनेक कारणांनी अटळ होते. जर्मनीचे नेतृत्व प्रशियाकडे असावे की ऑस्ट्रियाकडे हा मूलभूत प्रश्न लष्करी सामर्थ्यानेच सुटणारा असल्याने बिस्मार्कने ऑस्ट्रियाशी युद्ध पुकारले. त्यासाठी त्याने इटलीशी तह करून ऑस्ट्रियाच्या ताब्यातील व्हिनीशिया मिळवून देण्याचे वचन दिले. ह्या तहामुळे ऑस्ट्रियाचे प्रचंड सैन्य इटलीत गुंतून पडले. प्रत्यक्षात प्रशियन लष्करीव्यवस्था ही ऑस्ट्रियापेक्षा अधिक कार्यक्षम ठरली. १४ जून १८६६ रोजी युद्ध पुकारले गेले. ३ जुलैला दोन्ही सैन्यांची कनिखग्रेट्स येथे गाठ पडून ऑस्ट्रियाचा संपूर्ण पराभव झाला. जर्मनीतील प्रशियाचे नेतृत्व वादातीत झाले. श्लेझविग-होलस्टाइन प्रांत प्रशियास मिळाले.
जर्मनीच्या एकीकरणात फ्रान्सशी युद्ध अटळ होते. एक प्रबळ व महत्त्वाचे युरोपीय राष्ट्र म्हणून फ्रान्सला युरोपीय समस्यांमध्ये रस होताच शिवाय जर्मनीचा प्रदेश फ्रान्सच्या सीमेला भिडत असल्याने व जर्मनीचे ॲल्सेस व लॉरेन्स हे दोन प्रांत फ्रान्सकडे असल्याने फ्रान्सचे बारीक लक्ष जर्मनीच्या धोरणावर होते. युद्ध अटळ असल्यास ते कुशलतेने घडवून आणावे, हे धोरण बिस्मार्कचे होते. स्पेनच्या गादीवर कुणी बसावे, या प्रश्नावरून वातावरण तंग होऊन त्याची परिणती १८७० च्या फ्रान्स व प्रशिया यांमधील युद्धात झाली. या युद्धात फ्रान्सचा दारूण पराभव झाला. १८ जानेवारी १८७१ रोजी व्हर्सायच्या आरसेमहालात बिस्मार्कने जर्मन साम्राज्य अस्तित्वात आल्याची घोषणा केली.
मध्य यूरोपात १८७१ पासून पुढे ’जैसे थे’ परिस्थिती कायम राखणे, हे बिस्मार्कच्या धोरणाचे मुख्य सूत्र होते कारण ती स्थिती नवोदित जर्मनीच्या विकासाच्या दृष्टीने हिताची होती. पराभूत फ्रान्सला यूरोपात अलग पाडण्यावरच त्याच्या धोरणाची यशस्विता अवलंबून होती. फ्रान्सचे संभाव्य मित्र ऑस्ट्रिया व रशिया होते परंतु अशी मैत्री होण्यापूर्वीच बिस्मार्कने या दोन्ही देशांशी १८७३ मध्ये युती केली (त्रिसम्राट संघ). १८७९ मध्ये ऑस्ट्रियाबरोबर स्वतंत्र युती केली, तर १८८२ मध्ये त्याने ऑस्ट्रिया, इटली आणि जर्मनी यांच्यात युती घडवून आणली (त्रिराष्ट्र-करार). १८८७ मध्ये त्याने रशियाबरोबर समझोता करण्याचा प्रयत्न केला कारण तत्पूर्वी त्रिसम्राट संघ भंग पावला होता. याशिवाय ब्रिटनबरोबर संघर्ष येऊ न देण्याची दक्षता त्याने घेतली होती. एकूण १८७१ पासून तो सत्तेवर असेपर्यंत (१८९०) फ्रान्सला मित्र मिळू न देण्यात व अलग पाडण्यात बिस्मार्कचे धोरण यशस्वी झाले, असे म्हणता येईल.
एकोणिसाव्या शतकात विशेषतः १८१५ ते १८६२ दरम्यान वेगवेगळ्या लहानमोठ्या राज्यांत विखुरलेल्या जर्मन लोकांच्या राजकीय ऐक्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते अयशस्वी ठरले. सत्तेवर आल्यानंतर दहा वर्षांच्या आतच बिस्मार्कने त्याच्या पद्धतीनुसार जर्मनांचे एकीकरण घडवून आणले आणि फ्रॅंको-प्रशियन (जर्मन) युद्धाने जर्मनी या आधुनिक राष्ट्राचा उदय झाला. त्यामुळे आधुनिक जर्मनीचा तो शिल्पकार ठरला. जर्मनी हे यूरोपातील लष्करी दृष्ट्या एक बलवत्तर राष्ट्र झाले आणि जागतिक राजकारणात त्याची प्रतिमा उंचावली परंतु बिस्मार्कच्या युद्धखोर व अधिकारशाही विचारसरणीमुळे जर्मनीत लोकशाहीची बीजे दीर्घ काळ रूजू शकली नाहीत. एवढेच नव्हे तर विसाव्या शतकात जर्मनीने जे युद्धखोर व विस्तारवादी धोरण स्वीकारून जगाला ज्या दोन जागतिक महायुद्धांच्या खाईत लोटले, त्याची बीजेही बिस्मार्कच्या कारकीर्दीतच पेरली गेली.
पहा: जर्मनी, फ्रॅंको-प्रशियन (जर्मन) युद्ध.
संदर्भ : 1. Pflanze, Otto, Bismarck and the Development of Germany, Princeton (N. J.), 1971.
2. Taylor, A. J. P. Bismarck the Man and Statesman, London, 1968.
“