बिशकोप्रा : (इं. प्रिमरोझ लॅ. प्रिम्युला रेटिक्युलॅटा कुल-प्रिम्युलेसी). कुमाऊँ प्रदेशातील एक वनस्पती. हिचे दुसरे नाव जलकुत्रा आहे. ‘प्रिमरोझ’ हे सामान्य इंग्रजी नाव प्रिम्युला वंशातील सर्वच जातींना लावतात. प्रिम्युलाच्या एकूण सु. ५०० जातींपैकी भारतात सु. १५० आढळतात व त्या बहुतेक डोंगराळ भागात व हिमालयाच्या परिसरात सु. ३,३००-४,५०० मी. उंचीवर आणि नेपाळ ते सिक्कीम या भागात आढळतात. भारताबाहेर प्रिम्युल्याच्या जाती उत्तर गोलार्धात ध्रुवीय व आल्प्स प्रदेशात आढळतात. अनेक जाती बागेत शोभेकरिता लावतात. बिशकोप्रा निसर्गतः मध्य व पूर्व हिमालय, नेपाळ आणि सिक्कीम येथे आढळते. ती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी असून भूमिगत खोडापासून तिला लांब देठाची मूलज (जमिनीतून वर आलेली), साधी, व्यस्त अंडाकृती-आयत, दातेरी पाने येतात. त्यांमधून पुष्पधारक दांडा व त्यावर पिवळ्या द्विरूपी (दोन स्वरूपांच्या) फुलांचा झुबका येतो त्यांना किंचित वास असतो. फुलांची संरचना व इतर शारिरिक लक्षणे प्रिम्युलेलीझ गणात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ शुष्क (बोंड) असते. औषधी दृष्ट्या ही वनस्पती वेदनाहारक असून तिचा वापर बाहेरून लावण्यास करतात. मात्र ती गुरांना विषारी असते. चांगली रेतीयुक्त ओलसर दुमट जमीन तिला मानवते. कुंड्यातूनही ती लावतात.

 पहा : प्रिमरोझ प्रिम्युलेलीझ

 परांडेकर, शं. आ.