बिलबाओ : स्पेनमधील प्रमुख बंदर व बीतकाइया (बिस्के) प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४,५७,६५५ (१९७४ अंदाज). हेबिस्के उपसागरापासून ११ किमी. आत नेर्‌व्‌ह्योन नदीतीरावर वसलेले आहे.द्येगो लोपेस द हारो याने इ. स. १३०० च्या सुमारास हे वसविले. लोकरीच्या व्यापाराचे केंद्र म्हणून यास महत्त्व होते. एकोणिसाव्या शतकापासून येथील उद्योगधंद्यांची भरभराट होऊन, लोखंड-पोलाद उत्पादनाची मागणी विशेषेकरून वाढली. तथापि फ्रेंचांशी झालेल्या युद्धांत (१७९५ व १८०८) आणि कार्लिस्त बंडांच्या वेळी (१८३३-३४ व १८७२-७६) या शहराची बरीच हानी झाली. स्पॅनिश यादवी युद्धकाळात बिस्केच्या स्वायत्त सरकारचे मुख्यालय १९३७ पर्यंत येथेच होते. त्यामुळे स्पेनच्या इतिहासात या शहरास महत्त्व प्राप्त झाले.परिसरातील लोखंडखाणी व शहरातील लोखंड-पोलादाचे मोठे कारखाने यांमुळे यास ‘स्पेनचे पिट्‌सबर्ग’ म्हटले जाते. येथे सिमेंट, यंत्रसामग्री, तेलशुद्धीकरण, रसायने, कागद, रंग, मासेमारी तसेच जहाजबांधणी इ. व्यवसायही विकसित झालेले असून दळणवळणाच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. या बंदरातून लोखंड-पोलाद, मद्ये, कागद इत्यादींची निर्यात होते.खाणकाम, शाळा, व्हॅलादोलिद विद्यापीठाशी संलग्न असलेला अर्थशास्त्र विभाग तसेच देउस्तो, बिलबाओ ही दोन विद्यापीठे शहरात आहेत. सांत्यागो (चौदावे शतक) हे गॉथिक शैलीतील कॅथीड्रल, बरोक शैलीतील नगरभवन, तसेच संग्रहालये, उद्याने इत्यादींमुळे देशीपरदेशी पर्यटकांची येथे सतत वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी या शहरी बास्क भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. पण ती भाषा काहीशी बोजड असल्याने, हल्ली कॅस्टिलियन-स्पॅनिश बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

 ओक, द. ह.