बॉर्कग्रेव्हिंक, कार्स्टेन एकेबर : (१ डिसेंबर १८६४ – २१ एप्रिल १९३४). दक्षिण धृव प्रदेशाचे समन्वेषण करणारा नॉर्वेजियन संशोधक. जन्म ऑस्लो येथे. यँर्ट्सन महाविद्यालयात शिक्षण, सॅक्सनीमधील टारांट येथील रॉयल महाविद्यालयामधून पदवी संपादिली. वनविषयक ज्ञान संपादून तो वयाच्या चोविसाव्या वर्षी ऑस्ट्रेलियास गेला. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स व क्वीन्सलँड राज्यांत त्याने सर्वेक्षक म्हणून, तर न्यू साउथ वेल्सच्या कूअरवेल महाविद्यालयात निसर्गविज्ञान व भाषा यांचा प्राध्यापक म्हणून काम केले. ऑस्ट्रेलियाचा त्याने विस्तीर्ण प्रमाणावर प्रवास केला. अंटार्क्टिका मोहिमेसाठी १८९४ साली कॅप्टन क्रिस्तेन्सनच्या नेतृत्वाखाली मेलबोर्नहून निघालेल्या ‘अंटार्क्टिक’ जहाजातून एक सामान्य खलाशी म्हणून बॉर्कग्रेव्हिंक सामील झाला आणि अंटार्क्टिका खंडावरील केप अडेअर येथे पहिले पाऊल ठेवणारा या मोहिमेतील पहिला मानव म्हणून प्रसिद्धी पावला. १८९५ मध्ये तो इंग्लंडला गेला व तेथे त्याने आपले अंटार्क्टिका मोहिमेविषयीचे अनुभव सांगणारा निबंध ‘आंतरराष्ट्रीय भौगोलिक परिषदे’पुढे सादर केला. इंग्लंडमधील आपल्या वास्तव्यात त्याने अंटार्क्टिकाच्या समन्वेषणासंबंधी लोकांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने व्याख्याने दिली. १८९८ मध्ये ब्रिटिशपुरस्कृत अंटार्क्टिका मोहिमेवर निघालेल्या ‘सदर्न क्रॉस’ या जहाजाचे नेतृत्व बॉर्कग्रेव्हिंककडेच देण्यात आले. या मोहिमेत त्याने द. ध्रुव प्रदेशात ७८० ५०’ द. अक्षवृत्ताच्याही पुढे प्रवास केला अंटार्क्टिका खंडाचे समन्वेषण केले रॉस बॅरिअरचे नकाशे तयार केले आणि तेथील वनस्पती व प्राणी यांची माहिती गोळा केली. अंटार्क्टिकावरील अत्यंत कडक थंडीमध्येही माणूस राहू शकतो, हे सिद्ध करण्यासाठी बॉर्कग्रेव्हिंकने आपल्या सहकाऱ्यांसह संबंध हिवाळा तेथे वास्तव्य केले. बॉर्कग्रेव्हिंकच्या या कामगिरीमुळे त्याला ‘इंग्लिश रॉयल जिऑग्रॅफीकल सोसायटी’ने १९३० मध्ये ‘पेट्रन पदक’ देऊन सन्मानित केले. त्याची फर्स्ट ऑन द अंटार्क्टिक काँटिनंट (१९०१) व द फेम ऑफ नॉर्वे (१९२०-२५) ही दोन्ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. बॉर्कग्रेव्हिंकची अंटार्क्टिका मोहीम ही, अर्नेस्ट हेन्री शॅकल्टन (१८७४-१९२२) व रॉबर्ट एफ्. स्कॉट (१८६८ – १९२२) हे ब्रिटिश आणि रोआल आमुनसेन (१८७२-१९२८) हा नॉर्वेजियन या तीन अंटार्क्टिकाच्या समन्वेषकांना प्रेरक व स्फूर्तिदायी ठरली. बॉर्कग्रेव्हिंकचे वयाच्या सत्तराव्या वर्षी ऑस्लो येथे निधन झाले.