महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ : (मेल्ट्रॉन) – राज्यात इलेक्ट्रॉनिकी उद्योगाचा विकास होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जानेवारी १९७८ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ’ प्रस्थापिले. मार्च १९८२ अखेर महामंडळाला शासनाने ३·८९ कोटी रु. भाग भांडवल पुरविले असून महामंडळाकडे ०·९९ कोटी रु. कर्जे व ०·०३ कोटी रु. राखीव निधी, असे एकूण ४·९१ कोटी रु. भांडवल होते. महामंडळाचे अध्यक्ष एक विख्यात उद्योगपती असून त्यांच्यासह व्यवस्थापन–संचालक व सहा सदस्य असे शासननियुक्त संचालक मंडळ त्याचे व्यवस्थापन करते. या महामंडळाची पुढील कार्ये आहेत : 

(१) ज्या इलेक्ट्रॉनिकी उद्योगांसाठी साहाय्यभूत उद्योग सुरू करता येण्याजोगे आहेत, असे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात किंवा संयुक्त क्षेत्रात स्थापावेत, याबद्दल शासनाला सल्ला देणे (२) इलेक्ट्रॉनिकी औद्योगिक घटकांना संशोधन व प्रगती आणि इतर तांत्रिक सोयी तसेच त्यांच्या मालाला मजबूत विक्री संघटना उपलब्ध करून देणे (३) अर्ध-संवाहक शक्तिसाधनांचे उत्पादन करण्यासाठी ‘अर्ध-संवाहक मर्यादित’ ही एका विख्यात फ्रेंच कंपनीशी सहयोग करून वेगळी कंपनी नासिक येथे चालविणे (४) व्यावसायिक फीतमुद्रकांचे आपल्या श्राव्य-द्दश्य विभागातर्फे उत्पादन करणे (५) बिनतारी संदेश यंत्रसामग्रीचे एका विख्यात स्विस कंपनीच्या तांत्रिक सहयोगाने उत्पादन करणे (६) दूरध्वनीसाठी कार्यालयात लागणाऱ्या स्विच-फलकांचे उत्पादन करणे व (७) आपल्या मध्यवर्ती विक्री विभागातर्फे राज्याच्या विकसनशील भागांतील कंपन्यांना सहयोगी करून घेऊन त्यांचा माल खपविणे, त्यांच्या मालाचे अचूक गुणवत्ता-नियंत्रण होत आहे, याची खात्री करणे व गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाययोजना करणे. हे महामंडळाचे सर्वाधिक सर्जनशील कार्य असून त्याकरिता त्याच्या १९ कंपन्या सहयोगी आहेत.

पेंढारकर, वि. गो.