ली, (मॉरिउस) सोफुस : (17 डिसेंबर 1842 -18 फेब्रुवारी 1899).नॉर्वेजियन गणितज्ञ. त्यांनी èगट सिद्धांत व èअवकल समीकरणे या गणिताच्या शाखांत विशेष महत्त्वाचे कार्य केले.

ली यांचा जन्म नॉर्वेतील नॉरफ्योर्डीड येथे झाला. त्यांचे शिक्षण क्रिस्तियाना (आता ऑस्लो) विद्यापीठात झाले (1859-65). त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्याच निबंधामुळे त्यांना परदेशी अभ्यास करण्याकरिता शिष्यवृत्ती मिळाली. 1869-70 मध्ये ते बर्लिनला गेले असता तेथे èफेलिक्स क्लाइन यांच्याशी त्यांची भेट झाली व त्यांच्या कल्पनांचा ली यांच्यावर पुष्कळच प्रभाव पडला. क्लाइन यांच्या समवेत नंतर त्यांचे कित्येक निबंध प्रसिद्ध झाले. 1870 मध्ये ते पॅरिसला गेले व तेथे त्यांनी  स्पर्शक रूपांतरणाचा शोध लावला. या रूपांतरणांचा उपयोग करून स्पर्शक गोल हे छेदक रेषांशी संगत असतील अशी रेषा व गोल यांच्यातील एकास-एक संगती प्रस्थापित करता येते. 1871 मध्ये क्रिस्तियाना विद्यापीठात साहाय्यक पाठ निर्देशक झाले. त्या वर्षी त्यांनी स्पर्शीय रूपांतरणांचा (एक गणितीय राशी दुसऱ्या रूपातील राशीत बदलण्याच्या प्रक्रियेचा) सिद्धांत मांडलेली संस्मरणिका डॉक्टरेट पदवीसाठी सादर केली. पदवी मिळाल्यावर 1872 मध्ये त्यांची जादा प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. 1873साली त्यांनी संतत रूपांतरण गटांसंबंधीच्या संशोधनास प्रारंभ केला. त्यांनी आपल्या आंशिक अवकल समीकरणांवरील अभ्यासातून क्लाइन यांच्या सहयोगाने गणितीय सिद्धांताच्या वर्गीकरणात संतत गटांच्या संकल्पनेच्या असलेल्या मूलभूत महत्त्वाचा शोध लावला. नऊ वर्षे फ्रीड्रिख एंगेल यांच्याबरोबर सहकार्य करून ली यांनी रूपांतरण गटांविषयीचा Theorie der Transformations gruppen (3 खंड 1888-93) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतर स्पर्शक रूपातंरणांच्या भूमितिविषयीचा Geometric der Berihrungs transfromationen (1896) हा जी. शेफर्स यांच्या सहकार्याने लिहिलेला त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. 1886 साली लाइपसिक विद्यापीठात क्लाइन यांच्यानंतर गणिताच्या अध्यासनावर ली यांची नेमणूक झाली व तेथे एंगेल हे त्यांचे साहाय्यक होते. पुढे 1898 मध्ये क्रिस्तियाना विद्यापीठात त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या खास पदावर ते रूजू झाले पण तेव्हाच त्यांची प्रकृती ढासळलेली होती. वरील कार्याखेरीज त्यांनी अवकल भूमितीतही [èभूमिति] महत्त्वाचे कार्य केले. अवकल समीकरणांवरील Differential gleichungen (1891, जी शेफर्स यांच्यासमवेत) हा त्यांचा ग्रंथ प्रमाणभूत समजला जातो. त्यांचे सर्व कार्य एकत्रितपणे एंगेल आणि पी. हीगार्ड यांनी संपादित करून Gesammelte Abhandlungen (6 खंड, 1922-37) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. त्यांचे ग्रंथ व अनेक महत्त्वपूर्ण निबंध यांचा आधुनिक गणिताच्या प्रगतीवर (विशेषतः फ्रेंच गणितज्ञ एली कार्तान यांनी नंतर केलेल्या कार्याद्वारे) फार मोठा प्रभाव पडला. त्यांच्या गौरवार्थ विशेष प्रकारच्या संस्थितिक गटांना ‘ली गट’ असे नाव देण्यात आलेले आहे [èगट सिद्धांत] ते क्रिस्तियाना येथे मृत्यू पावले.  

ओक, स. ज.