बॉता, पॉल एमील : (६ डिसेंबर १८०२-२९ मार्च १८७०). फ्रेंच पुरातत्त्वज्ञ. जन्म तूरिन (पीडमाँट-इटली) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात. त्याचे घराणे मूळचे इटलीतील. पॉलचे वडील कार्लो जुझेप्पे बॉता (१७६६-१८३७) हे इतिहासकार होते. त्यांनी १८१४ मध्ये फ्रेंच नागरिकत्व स्वीकारले. पॉलने वैद्यकीय शिक्षण घेऊन विविध देशांत प्रवास केला. या प्रवासात प्राचीन अवशेषांचे अवलोकन करण्याची संधी त्यास मिळाली. तो १८३० मध्ये ईजिप्तला गेला आणि ईजिप्तचा राजा मुहंमद अली याचा खासगी वैद्य म्हणून काम करू लागला. पुढे एका ईजिप्शियन आयोगाबरोबर त्याने सेन्नारला प्रयाण केले. १८३३ मध्ये फ्रेंच शासनाने त्याची अलेक्झांड्रियात वाणिज्यदूत म्हणून नियुक्ती केली. या पदावर असताना त्याने अरबस्तानचाही प्रवास केला आणि अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. परिणामतः तो पुरातत्त्वीय अध्ययनाकडे वळला. पुढे १८४२ मध्ये मोसूल (इराक) येथे त्याची वाणिज्यदूत म्हणून नेमणूक झाली. तेथे असताना त्याने प्राचीन लेखकांच्या वृत्तांतांच्या आधारे बायबलमध्ये उल्लेखिलेल्या प्राचीन ॲसिरियन नगरांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. सुरुवातीस टायग्रिस नदीच्या पूर्व किनाऱ्यावरील कुयुंजिक या भागात त्याने उत्खनन सुरू केले पण त्याच सुमारास त्याचे लक्ष खोर्साबाद येथील टेकाडांनी वेधून घेतले. तेथील उत्खननात त्यास दुसरा सारगॉन या राजाच्या भव्य राजवाड्याचे अवशेष आढळले. त्यात प्रसिद्ध पंखधारी वृषभ, विविध शिल्पे, मूर्ती, क्यूनिफॉर्म लिपीतील कोरीव लेख इत्यादींचा अंतर्भाव होता. प्राचीन निनेव्ह नगरीचाच शोध लागला अशी वार्ता फ्रान्समध्ये प्रसृत झाली. त्यामुळे फ्रान्स शासनाने त्याच्या उत्खनन-संशोधनास आर्थिक साह्य दिले. परिणामतः त्याचे उत्खननकार्य अधिक जोमाने सुरू झाले. उत्खननस्थळी मूल्यवान अवशेषांची रेखाचित्रे काढण्यासाठी तसेच त्याच्या मदतीसाठी यूजीन नेपोलियन फ्लांदँ या प्रारूपकारास तत्काळ मोसूलला पाठविण्यात आले. उत्खनित अवशेषांपैकी काहींची मोडतोड होणे वा काही पूर्णतः नष्ट होणे शक्य असल्याने त्यांचे रेखांकन उत्खननाच्या स्थळी करणे आवश्यक होते. बॉताने उपलब्ध झालेले अवशेष दोन जहाजांत घालून फ्रान्सला पाठविले. प्रवासात एक जहाज बुडाले. मात्र उर्वरित जहाजातील अवशेष फ्रान्सला पोहोचले. ते पॅरिस व लूव्ह्‌र येथील संग्रहालयांत ठेवण्यात आले. त्याने लावलेला ॲसिरियन राजवाड्याचा शोध ॲसिरियन पुरातत्त्वविद्येच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. त्यामुळे पुढील पुरातत्त्वीय संशोधनास चालना मिळाली आणि क्यूनिफॉर्म लिपीतील मजकुरामुळे ॲसिरियन संस्कृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती इतिहासज्ञांना उपलब्ध झाली. यानंतरही त्याने पुरातत्त्वीय दृष्टीने महत्त्वाचे असे अनेक प्राचीन अवशेष उघडकीस आणले. जेरुसलेम (१८४६) आणि ट्रिपोली (१८६८) येथेही त्याने वाणिज्यदूत म्हणून काम केले. त्याने उर्वरित आयुष्य क्यूनिफॉर्म लिपीच्या अभ्यासास वाहून घेतले.

बॉताने मॉन्युमेन्ट्स ऑफ निनेव्ह … (इं. शी.) या ग्रंथात उत्खनित अवशेषांचे सविस्तर वर्णन एका खंडात केले असून यूजीन नेपोलियन फ्लांदँ याने त्या ग्रंथात वर्णिलेल्या वास्तूंची व मूर्तींची रेखाचित्रे चार खंडांत प्रसिद्ध केली आहेत (१८४९-५०). याशिवाय बॉताने Memoires de I’ ecriture Cuneiforme Assyriaenne (१८४८) या दुसऱ्या एका पुस्तकात क्यूनिफॉर्म लिपीतील लेखनासंबंधी महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे. ॲकरेस (फ्रान्स) येथे तो मरण पावला.

शेख, रुक्साना