बॉटलब्रश : (म. लाल कुंचला हिं. लाल बोतल ब्रश लॅ. कॅलिस्टेमॉन कुल-मिर्टेसी). हे नाव मूलतः ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या सु. तीस जातींच्या फुलझाडांना लावले जाते. त्यांचा समावेश कॅलिस्टेमॉन ह्या वंशात केला असून इंग्लंड, फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया इ. प्रदेशांत त्यांचा प्रसार अनेक वर्षांपासून शोभेकरिता लावण्यासाठी झाला आहे. भारतातही विशेषतः पंजाबात व उत्तर प्रदेशात काही जाती बागेत व काही वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावलेले आढळतात. बहुतेक जाती, लहानमोठी क्षुपे (झुडपे) किंवा वृक्ष असून पाने लहान एकाआड एक, अरुंद, अखंड व तैल प्रपिंडयुक्त (तैल ग्रंथियुक्त) असतात आणि ती चुरगळली असता सुगंध येतो. ज्या रंगीत फुलोऱ्यामुळे विशेषतः ह्या जातींना शोभा प्राप्त होते, त्यांचा आकार बाटली स्वच्छ करण्यास वापरात असलेल्या कुंचल्याप्रमाणे असल्याने त्या अर्थाचे बॉटलब्रश हे इंग्रजी नाव पडले आहे. फुले लहान असली, तरी त्यातील केसरदले मोठी, अनेक व सुटी असून अनेक फुलांचा लांबट झुबका कुंचल्यासारखा उठावदार असतो.
कॅलिस्टेमॉन लॅंसेओलेटस (कॅ. कॉक्सिनियस) ही सदापर्णी जाती सामान्यपणे बागेत आढळते. ऑस्ट्रेलियात हिची उंची ९मी. पर्यंत पण इतरत्र सरासरीने ३ मी. असते. पाने साधी, टोकदार, काहीशी, जाड व गुळगुळीत व भाल्यासारशी असतात ती कोवळेपणी तांबूस दिसतात. फुलोरे [कणिशे ⟶ पुष्पबंध ], ५-९ सेंमी.
व लोंबते असून ते फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात फुलात पाच संदलांचा पेला व त्यात पाच लवकर गळून पडणाऱ्या सुट्या आणि किरमिजी पाकळ्या असून केसरदले गर्द लाल व बहिर्गत असतात फुलांचा आकर्षक भाग हाच असतो. फुले पक्षिपरागित व फळे [करंडरूप बोंडे ⟶ फळ] लहान अंडाकृती व अनेक बीजी असून झाडावर दीर्घकाल राहतात फुलोऱ्याचा दांडा पुढे वाढून त्यावर नवीन पालवी व फुले येतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨मिर्टेसीमध्ये (जंबुल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
कॅ. फॉक्सिनियस, कॅ. सॅलिग्नस, कॅ. स्पेसिओसस इ. जातीही सामान्यपणे लावलेल्या आढळतात. सर्वच जातींना कसलीही जमीन चालते. बिया व कलमे यांपासून अभिवृद्धी (लागवड) होते. भरपूर बहार येण्यासाठी व नीटस आकारासाठी छाटणी करावी लागते. सु. ९३०मी.पेक्षा उंच भागात कॅ. लँसेओलेटसची वाढ अधिक चांगली होते. कॅ. विमिनॅलिसच्या फुलांत मध भरपूर मिळत असल्याने मधमाश्यांचे थवे त्यांकडे आकर्षित झालेले आढळतात. ऑस्ट्रेलियात कॅ. लँसेओलेटसच्या जड व कठीण लाकडाचा उपयोग चाकाकरिता आणि लाकडी हातोड्याकरिता करतात. अनेक जातींत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते व त्यात सिनीओल भरपूर आढळते. फळात ५.३९ टक्के स्थिर तेल (वसा) असते आणि त्यात पामिटिक, स्टिअरिक, ओलेइक, लिनोलीइक व लिनोलीनिक ही अम्ले असतात.
पहा : मिर्टेलीझ, मिर्टेसी.
संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.
जमदाडे, ज. वि.
“