क्लेप्स, गेओर्ख : (२३ ऑक्टोबर १८५७ — १५ ऑक्टोबर १९५८). जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. यांचा जन्म पूर्व प्रशियातील नायडनबुर्कमध्ये झाला. त्यांनी केनिग्झबर्ग येथे रसायनशास्त्राचा अभ्यास केला व नंतर त्यांनी प्रथम द बारी यांच्याबरोबर व नंतर प्फेफर यांच्याबरोबर ट्युबिंजेन येथे संशोधन केले. बाझेल येथे ते रेक्टर व नंतर हायड्लबर्गमध्ये वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक होते. ⇨ शैवले व ⇨ कवके यांच्या वाढीवर आणि जीवनावस्थेवर होणाऱ्या बाह्यपरिस्थितीच्या परिणामासंबंधीचे त्यांचे संशोधनकार्य फार महत्त्वाचे असून त्यांचा या विषयावरील ग्रंथ १८९६ मध्ये प्रसिद्ध झाला. केशिका शोषनळीच्या (केसासारख्या बारीक व्यासाच्या नलिकेने शोषण करण्याच्या) पद्धतीने चरबिजुकापासून (चल लाक्षणिक प्रजोत्पादक अवयवापासून) संवर्धन करण्याच्या पद्धतीचा शोध लावून त्यांनी संवर्धनतंत्र सुधारले.

जमदाडे, ज. वि.