बाँइसी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आयडाहो राज्याची राजधानी. लोकसंख्या १,०२,१२५ (१९८०). हे बॉइसी नदीच्या खोऱ्यात रॉकी पर्वतउतारावर सस. पासून ८३५ मी. उंचीवर वसले आहे. एकोणिसाव्या शतकारंभी फ्रेंच-कॅनडीयन फासेपारध्यांनी बॉइसी नदीतीरावरील वृक्षांच्या ओळींवरून शहराला ‘बॉइसी’ (फ्रेंच शब्दाचा अर्थ- ‘जंगलमय’) हे नाव दिले. १८६२ मध्ये बॉइसी खोऱ्यात सोन्याच्या साठ्याचा शोध लागला व पुढल्या वर्षी खाणीतील मजुरांच्या संरक्षणार्थ येथे एक किल्ला बांधून शहराची स्थापना करण्यात आली. १८६४ पासून हे आयडाहो राज्याच्या राजधानीचे आणि त्यातील एडा परगण्याचे मुख्य ठाणे बनले.

बॉइसी खोरे दूध, अंडी आणि मांसोत्पादनात अग्रेसर असून हे व्यापाराचे व दळणवळणाचे मुख्य केंद्र आहे. याच्या आसमंतात धान्य, बीट, फळे यांचे उत्पादन होते. त्याच्या परिसरात अनेक जलसिंचन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. येथे राज्य व केंद्र शासनाची अनेक कार्यालये आहेत. खाद्य पदार्थांवर प्रक्रिया, बांधकामाचे साहित्य, कृषियंत्रे, रसायने, मादक पेये तसेच पूर्वविरचित व फिरत्या घरांची निर्मिती इ. उद्योगधंदे शहरात चालतात. बॉइसी महाविद्यालय, ऐतिहासिक मंडळ व वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय, रुग्णालय, सुधारगृह, कलावीधी इ. सुविधा येथे उपलब्ध आहेत. येथील राजभवन, ॲरोरॉक धरण, जुल्या डेव्हिस उद्यान, ॲन मॉरिसन उद्यान व त्यातील प्राणिसंग्रहालय इ. प्रेक्षणीय असून शहराजवळच उष्ण पाण्याचे झरे आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नाला तोंड देण्याकरिता १९६४ पासून महानगरीय नियोजन हाती घेण्यात आले आहे.

चौधरी, वसंत