बास – १: (इं. रॅफिया-टेप लॅ. रॅफिया फॅरिनीफेरा, रॅ. रूफिया कुल-पामेसी). बास हे इंग्रजी नाव मॅलॅगॅसीतील रॅफिया या नावाच्या माडासारख्या ताल वृक्षापासून मिळणाऱ्या धाग्यांना दिलेले असून व्यापारी क्षेत्रात तेच रूढ आहे. रॅफिया-फायबर, रॅफिया-टेप असेही त्यांना म्हणतात, कारण रॅफिया या वंशातील एका जातीपासून (रॅ. रूफिया) ते धागे काढतात. रॅफिया वंशात एकूण वीस जाती असून त्यांपैकी भारतात फक्त तीन जाती आणून लावलेल्या आहेत आफ्रिका व अमेरिका या प्रदेशांत रॅफियाच्या जाती निसर्गतः आढळतात. बासचा वृक्ष मूळचा मॅलॅगॅसीतील असून तेथे तो सखल भागात तळ्यांच्या आसपास व टेकड्यांवर सु. १,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. ह्याचे खोड सु. ९ मी. उंच व १ मी. व्यासाचे असते. पाने मोठी, संयुक्त, पिसासारखी व सु. १५ मी. लांब व दले १.५ मी. लांब असतात. फुलोरा [स्थूल-कणिश ⟶ पुष्पबंध] सु. २ – ३ मी. लांब असतो. फळ भोवऱ्यासारखे, २.५ – ५ सेंमी. लांब, काहीसे खाचदार व टोकास दबल्यासारखे बी आकाराने तसेच व टोकास गोलसर इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलाची संरचना पामीमध्ये (ताल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असते [⟶ पामी पामेलीझ].

पानाच्या खालच्या बाजूच्या त्वचेपासून व देठांपासून व्यापारी महत्त्वाचा व रेशमासारखा नरम, चिवट व टिकाऊ धागा काढतात तो फिकट व सु. १२० सेंमी. लांब असतो चटया विणण्यास, अनेक वस्तू एकत्र बांधण्यास, पिशव्या, हॅट, पडदे इत्यादींकरिता त्याचा उपयोग करतात तद्देशीय लोक ह्याचे कापडही बनवितात यूरोप व अमेरिकेत ह्या कापडास फार चांगली किंमत येते. तसेच रंग शोषणाच्या गुणामुळे धाग्यांच्या चित्रविचित्र वस्तूही तयार करतात. कोवळ्या पानांवर खालच्या बाजूस मेणाचा लेप असतो त्यापासून ‘रॅफिया वॅक्स’ या नावाचे मेण काढतात हे मेण पिवळट ते गर्द तपकिरी असून पानांच्या वजनाच्या ०.७५% (शुद्ध स्वरूपात) असते बूट पॉलिश, लाकडी जमिनीचे पॉलिश व मेणबत्त्या इत्यादींकरिता ते वापरतात. फळांच्या मगजातील (२४%) व बियांतील (१%) तेल शुद्धीकरणानंतर खाण्यास व साबणाकरिता उपयुक्त असते. मेण नेहमीच्या सामान्य (मधमाश्यांनी पोवळ्यांत साठविलेल्या) मेणापेक्षा कठीण व ठिसूळ असून त्याचे भौतिक गुणधर्म ‘कार्नोबा’ (कोपर्निशिया सेरीफेरा) मेणासारखे असतात [⟶ मेण].

पानांची जाडजूड व कठीण मध्यशीर तंबूचे खांब, दारे व किरकोळ सजावटी सामानास वापरतात. दलांच्या मध्यशिरा मॅलॅगॅसीत टोपल्या आणि मासे पकडण्याच्या चौकटी बनविण्यास वापरतात. फळांच्या करवंट्यांपासून लहान वाट्या, तपकिरीच्या डब्या, सिगारेटच्या नळ्या व बटने तयार करतात.

वाइन-पाम : (रॅ.हुकेरी ). बासच्या वंशातील ह्या दुसऱ्या जातीचा तालवृक्ष मूळचा उष्ण कटिबंधीय प. आफ्रिकेतील असून भारतात उद्यानांतून लावलेला आढळतो. याची उंची सु. १० मी. व व्यास सु. ३० सेंमी. असून खोडावर टोकाजवळच्या भागात पानांच्या तळापासून बनलेल्या काळपट धाग्यांचे वेष्टन असते. खोडाला जमिनीत १ – ४ अधश्चर (मुनवे) फुटतात परंतु खोडांचा दाट झुबका बनत नाही. संयुक्त पाने सु. १२ मी. लांब व दले १.५ मी. X ४ सेंमी. असून खालच्या मेणचट व निळसर असतात. फुलोरे (स्थूलकणिश) २.५ मी. लांब, चपटे पण दंडाकृती व शाखायुक्त असतात. फळे ६ – १२ X ४.५ सेंमी. असून त्यांवर १ – १.५ सेंमी. चोचीसारखा भाग असतो. बोर्दा नावाची दारू (मद्य) मुख्यतः या झाडाच्या फुलोऱ्यावर जखम करून त्यातून गळणाऱ्या रसापासून मिळवितात. हा रस प्रथम २ – ३ दिवस आंबविण्याकरिता ठेवतात ताजी दारू जिंजर-बीरसारखी लागते. पुढे तिच्यापासून ऊर्ध्वपातनाने (द्रवांचे मिश्रण तापवून मिळणारे बाष्प थंड करून घटक अलग करण्याच्या क्रियेने) ‘अरक’ मद्य बनवितात खोडापासून काढलेल्या धाग्यांपासून (पियासावा) ताठ झाडू बनवितात. नायजेरियात या धाग्यांचा उपयोग चटया, टोपल्या करण्याकरिता केला जात असून तो एक महत्त्वाचा उद्योग बनला आहे. धागा बळकट असल्याने दोऱ्या, दोर इ. वस्तू करतात. ऊन व ओलावा यांच्या संपर्काने तो खराब होत नाही.

 बांबू-पाम : (फरोह पाम रॅ. व्हिनिफेरा). आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळच्या खाड्यांच्या आसपास ही तालवृक्षाची तिसरी जाती आढळते व भारतात उद्यानांतून लावलेली आढळते. याचे खोड खुजे असून त्याच्या टोकास आलेल्या संयुक्त पिसासारख्या व सरळ वाढणाऱ्या पानांच्या झुबक्यामुळे तो एखाद्या मोठ्या तुऱ्यासारखा दिसतो. स्थूलकणिशावरील महाछदे मोठी, शाखायुक्त व लोंबती असतात कणिशके [⟶ पुष्पबंध] काहीशी बाकदार, चपटी व चितीय-लंब-गोलाकृती असतात. प. आफ्रिकी ‘पियासावा’ किंवा ‘लागोस बास’ या नावाचा धागा या वृक्षाच्या आवरक (वेढणाऱ्या) पर्णतलापासून काढतात पानाचे दांडे उभे कापून त्यांपासून काढलेल्या पट्ट्यांच्या जुड्या ६-१२ आठवडे पाण्यात ठेवून, कुजवून, बडवून काढलेले सुटे धागे सावलीत सुकवितात ते धागे सु. ६० – १५० सेंमी. लांब, फिकट लालसर तपकिरी रंगाचे असतात ते झाडण्या व विशिष्ट प्रकारच्या सफाईकरिता लागणारे ब्रश आणि दोर-दोऱ्या इत्यादींकरिता वापरतात. गाद्या भरण्याकरिता काथ्याप्रमाणे ह्या धाग्यांचा व पानांच्या टाकाऊ भागांचा (भुसकटाचा) उपयोग करतात, त्याला ‘पियासावा टो ’ म्हणतात. पानांपासून मेणही मिळवितात. पानांचे देठ व मध्यशिरा यांचा उपयोग पडाव, छपराचे वासे, खांब व सजावटी सामान इत्यादींकरिता करतात. फळातील आठळीचा पृष्टभाग शिल्पचित्रित असून त्यावरही शल्कयुक्त सालीच्या आतील बाजूस पिवळट तेलकट मगज असतो. तो कडवट चवीकरिता किंवा खाण्यास घेतात तो दीपक (भूक वाढविणारा) व सारक असून त्याचा मर्दनौषधाप्रमाणे वापर होतो. आठळ्या पाण्यात उकळून ‘रॅफिया लोणी’ नावाची पिवळी वसा (स्निग्ध पदार्थ) मिळते ती ताजेपणी चवदार असते. प. आफ्रिकेत तिचा वापर दिव्यांकरिता, वंगणाकरिता, पोमेडसारखा व स्वयंपाकात करतात. खोबरे भाजून खातात. बटने व अलंकार ह्यांकरिता त्यांचा उपयोग करतात. कोवळे कोंब भाजीकरिता वापरतात.

पहा : पामी मेण.

संदर्भ : 1. C. S. I. R. The wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.

           2. MacMillan, H. F. Tropical Planting and Gardening, London, 1956,

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.