बासेन : ब्रह्मदेशातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३,५५,५८८ (१९७३). हे रंगूनच्या पश्चिमेस सु. १६० किमी. इरावती नदीच्या त्रिभुज प्रदेशातील बासेन या उपनदीवर वसले आहे. याचे पूर्वीचे नाव ‘पाथेन’. ब्रह्मी भाषेतील मुसलमानांना उद्देशून वापरल्या जाणाऱ्या ‘पंथी’ या शब्दाचा ‘पाथेन’ हा अपभ्रंश असावा. दुसऱ्या ब्रह्मी लढाईत (१८५२) हे शहर प्रसिद्धीला आले.
शहराच्या आसमंतात भातशेती व मासेमारी हे प्रमुख व्यवसाय चालतात. बासेन हे देशातील भात निर्यातीचे प्रमुख बंदर असून महासागरी बोटीही येथे येतात. भातसडीच्या गिरण्यांसाठी हे शहर प्रसिद्ध असून लाकूड कापणे, जहाजदुरुस्ती, यंत्रे, मातीची भांडी व रंगीत छत्र्या तयार करण्याचे व्यवसायही चालतात. जल, लोह व हवाई मार्गांनी हे देशातील महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडलेले आहे. बासेन महाविद्यालय रंगूनच्या कला व विज्ञान विद्यापीठाशी संलग्न आहे. शहराच्या मध्यभागी असलेला श्वे-मोक-ताँ पॅगोडा विशेष उल्लेखनीय आहे.
चौधरी, वसंत