बाल्यावस्था व बालसंगोपन : सामान्यत: जन्मापासून ते वयाच्या पाचव्या वर्षापर्यंतच्या माणसाच्या जीवनावस्थेला बाल्यावस्था म्हणतात. बालकाची वाढ, पोषण व स्वास्थ्य यांकडे लक्ष पुरविणे आणि त्याचे पुढील जीवन सामाजिक दृष्ट्या समर्थ बनविण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी बालसंगोपनात मोडतात. या वयात बालक बहुतांशी परावलंबी असते आणि यामुळे त्याची काळजी घेणाऱ्याची जबाबदारी वाढते. बालसंगोपन हे बालकावरील प्रेम व तत्संबंधीची माहिती यांवर आधारलेले असते पण केवळ माहिती असून भागत नाही, तर बालकाविषयी आपलेपणाची भावना असणेही आवश्यक असते. बालसंगोपनकालाची वयोमर्यादा बार वर्षापर्यंतही समजली जाते आणि सहा ते बारा वर्षांचा काळ बाल्यावस्थेचा दुसरा टप्पा मानतात. पहिल्या व पाचव्या या वाढदिवसांमधील चार वर्षांचा काळ मानसिक व शारीरिक वाढीचा महत्त्वाचा भाग असतो. प्रस्तुत नोंदीत बालसंगोपनाचा विचार (१) पहिले वर्ष आणि (२) एक ते पाच वर्षे, अशा दोन विभागांत केला आहे.
पहिले वर्ष : पहिल्या बारा महिन्यांत मूल नव्या परिसराशी जमवून घेत असते. या काळात शरीर व मेंदू यांमध्ये बदल जलद होतात. याच काळात शीलसंवर्धनाची सुरुवात होत असल्यामुळे योग्य काळजी घेणे भावी सुस्थितीस पोषक व महत्त्वाचे असते. बालसंगोपनाचा विचार करताना प्रथम काही अत्यावश्यक गोष्टीसंबंधी माहिती असणे जरूर आहे. मूल शक्यतो स्तनपानावरच वाढवावे. [⟶ दुग्घस्त्रवण व स्तनपान]. मातेचे दूध अगदी योग्य आहार आहे एवढेच नव्हे, तर स्तनपानामुळे बालकामध्ये आपलेपणाची व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. शास्त्रीय प्रगतीमुळे एकवेळ कृत्रिम दूध अगदी मानवी दुधासारखेच बनविता येईल परंतु स्तनवानामुळे माता व अपत्यामध्ये जी भावनिक आत्मियता उत्पन्न होते, ती इतर कोणत्याही मार्गाने साधणे अशक्यच आहे. प्रसूतीनंतरच्या पहिल्या चार आठवड्यांच्या काळातील संगोपन, अकाल अर्भकाविषयीची माहिती, नवजात अर्भकातील प्रमुख रोग इत्यादींविषयी विस्तृत माहिती ‘नवजात अर्भक’ या नोंदीत दिली आहे.
वजन : जन्मत: सर्वसाधारणपणे ३ किग्रॅ. असणारे वजन सहाव्या महिन्यात ६ किग्रॅ. आणि बाराव्या महिन्यात ९ किग्रॅ. पर्यंत वाढते. पहिल्या आठवड्यांत जन्मत: असलेले वजन किंचित घटते. पहिले काही महिने दुसऱ्या आठवड्यापासून दर आठवड्यात सुमारे १५१.५ ग्रॅ. ते १८०.५ ग्रॅ. वजन वाढते. मूल वाढत जाते तसतशी ही साप्ताहिक वजनवाढ कमी होते. मुलाचे वजन मुलीपेक्षा थोडे अधिक असते. पहिल्या वर्षी वजन हळूहळू परंतु सतत वाढावयास हवे. दोन आठवडे वजन कायम राहिल्यास आजार किंवा अयोग्य व अपुरे पोषण त्यास कारणीभूत असू शकते. सर्वसाधारणपणे सहा महिन्यांच्या सुमारास वजन जन्मत: असलेल्या वजनाच्या दुप्पट आणि बारा महिन्यांच्या सुमारास तिप्पट होते.
लांबी : नवजात अर्भकाची लांबी सर्वसाधारणपणे ५१ सेंमी. असते. सहाव्या महिन्यात ६१ सेंमी., नवव्या महिन्यात ६८.५ सेंमी. आणि बाराव्या महिन्यात ७६ सेंमी. होते. म्हणजेच वयाच्या पहिले वर्षात बालकाची लांबी जवळजवळ २५ सेंमी. ने वाढते.
दंतोदभवन : (दात येणे). मानवाला ⇨ दात दोनदा येतात. प्रथम येणाऱ्या दातांना दुधाचे दात म्हणतात व ते सहा महिन्यांनंतर ठराविक क्रमाने येऊ लागतात. खालचे दोन मध्यवर्ती कृतंक सहाव्या ते सातव्या महिन्यात, वरचे दोन मध्यवर्ती कृंतक सातव्या ते आठव्या महिन्यात, खालचे व वरचे दोन दोन पार्श्व कृंतक नवव्या ते दहाव्या महिन्यात आणि पहिल्या दाढा बाराव्या ते चौदाव्या महिन्यात येतात. दात येण्याचे वय अगदी निश्चित नसते. काही मुलांना लवकर, तर काहींना उशीरा दात येतात परंतु त्यांच्या सर्वसाधारण वाढीवर याचा कोणताही दुष्परिणाम आढळत नाही. दाताचा आकार, प्रकार व स्थान आनुवंशिकता ठरविते. मातेचा गर्भारपणातील आहार, अर्भकाचे पोषण इ. गोष्टी दंतोदभवनावर परिणाम करतात
दात येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे ती सर्वसाधारणपणे बिनतक्रार पूर्ण होते. प्रत्यक्षात मात्र पुष्कळ वेळा दात येताना मूल अस्वस्थ, चिडखोर, झोप कमी झालेले आढळते. ज्वर व अतिसार यांचा दंतोदभवनाशी संबंध जोडला जातो तो मात्र निराधार आहे. या सुमारासकधीकधी लालास्त्रवण वाढते. अतिलालास्त्रवणता (लाळेचे प्रमाणापेक्षा जादा स्त्रवण) काही विकृतींचे लक्षण असू शकते. काही मुलांत जन्मत:च एखादा दात आलेला असतो, तर फार क्वचितच पूर्ण अदंतता (एकही दात न येणारी विकृती) असू शकते. साधारणपणे वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत दुधाचे सर्व म्हणजे वीस दात यावयास हवेत. पुढील सर्वसाधारण नियम याबाबतीत उपयुक्त असतो. वयाचे महिने उणे ६=दातांची संख्या. उदा., वय १२ महिने उणे ६=६ दात.
शीर्ष परिघ : (डोक्याचा घेर). जन्मत: डोक्याचा घेर सर्वसाधारणपणे ३३ ते ३५.६ सेंमी. असतो. तो सहाव्या महिन्यात ४०.६ सेंमी. व बाराव्या महिन्यात ४५.७ सेंमी. होतो. सर्वसाधारणपणे परिघाची वाढ मेंदूची वाढ दर्शविते. लघुशीर्षता मानसिक मंदतेची निदर्शक असू शकते. बृहतशीर्षता जलशीर्ष [मेंदूच्या विवरांत प्रमाणाबाहेर जास्त मस्तिष्कमेरुद्रवाचा संचय होऊन ती मोठी होणे ⟶ तंत्रिका तंत्र], जन्मजात उपदंश इ. विकृतीचे लक्षण असू शकते. कधीकधी ती नैसर्गिक असून काही कुटुंबातील मुलांत आढळते व तीला ‘कौटुंबिक बृहतशीर्षता’ म्हणतात. डोक्याचा घेर जन्मत: छातीच्या घेरापेक्षा सु.२.५ सेंमी. अधिक असतो. बाराव्या महिन्यापर्यंत दोन्ही सारखेच होतात. जन्मत: कवटीची हाडे पूर्ण वाढलेली नसल्यामुळे डोक्यावर पुढील बाजूस ३.७१ सेंमी. ते ५ सेंमी. अस्थिरहित जी जागा असते तिला अग्र-टाळू म्हणतात व ही जागा १८ महिन्याच्या सुमारास भरून येते.
अस्थिभवन : नवजात अर्भकात क्ष-किरण तपासणीत पुढील पाच अस्थिभवन केंद्रे (ज्या ठिकाणी अस्थिऊतक–समान रचना व कार्य असलेल्या अस्थिपेशींचे समूह–वाढत जाते त्या हाडातील जागा) आढळतात : (१) ऊर्वस्थीचे दूरस्थ टोक (मांडीच्या हाडाचे गुडघ्याकडील टोक), (२) बाह्य जंघास्थीचे (गुडघ्यापासून घोट्यापर्यंतच्या पायात असलेल्या दोन हाडांपैकी बाहेरच्या हाडाचे) वरचे (गुडघ्याजवळचे) टोक, (३) घुटिकास्थी (घोट्याच्या सांध्याचे पावलातील हाड), (४) पार्ष्ण्यास्थी अथवा टाचेचे हाड आणि (५) घनास्थी (पावलाच्या कमानीतील करंगळीकडील हाड).
सहाव्या महिन्याच्या सुमारास ⇨मनगटातील शिरकास्थी व अंकुशिका या दोन हाडांत अस्थिभवन केंद्रे दिसू लागतात. या तपासणीवरून मुलाच्या वयाचा अंदाज करता येतो आणि याला ‘अस्थिवय’ म्हणतात. कालगणनेनुसार असणारे वय व अस्थिवय यांतील फरक काही विकृतींच्या निदानास उपयुक्त असतो. अस्थिवृद्धीवर वंश व लिंग परिणाम करतात. उदा., नीग्रोत गोऱ्या लोकांपेक्षा आणि मुलींत मुलांपेक्षा जलद अस्थिवृद्धी होते. याशिवाय वैयक्तिक कारणेही परिणाम करतात. या विविध कारणांकरिता अस्थिभवन केंद्र-तपासणी मुलाच्या वाढीचा अंदाज बांधण्याकरिता फारशी उपयुक्त नसते. सर्वसाधारणपणे मनगटातील हाडांतील अस्थिभवनाची केंद्रसंख्या वयाच्या वर्षसंख्येत एक मिळवून मिळते. उदा., दोन वर्षे वयाच्या मुलात २+१=३ अस्थिभवन केंद्रे असावयास हवीत.
बालकाच्या वाढीचे टप्पे : मुलांची वाढ म्हणजेच काही कसब संपादन करणे आणि ज्या क्रिया करण्याकरिता विशिष्ठ हालचाली कराव्या लागतात त्या करू लागणे. वाढीची प्रगती डोक्याकडून पावलांकडे होते. मान धरणे, हातांवर नियंत्रण, धडावर नियंत्रण आणि पायांवर नियंत्रण या गोष्टी क्रमश: येतात.
नवजात अर्भकात स्वकृत हालचालींची प्रवृत्ती नसते. तसेच त्याला उजेड (प्रकाश) आवडत नसल्यामुळे पापण्या नेहमी मिटलेल्या असतात. काही दिवसांनंतर झोप सोडून इतर वेळी डोळे उघडे राहू लागतात. पूर्ण वाढीच्या तसेच अकाल अर्भकातही श्रवणज्ञान निर्माण झालेले असते. आजूबाजूच्या परिसरासंबंधी काहीशी जिज्ञासा तिसऱ्या महिन्यात जागृत होते. पाचव्या महिन्यात मुलामध्ये जवळ घेणाऱ्या व्यक्तीबद्दल आवड-नावड निर्माण होते तसेच साद देणे आणि मोठ्याने हसणे सुरू होते. सातव्या महिन्यात खेळणी आवडू लागतात, ती घेऊन खेळता येते आणि मुखातून पहिले अर्थहीन शब्द बाहेर पडतात. नवव्या महिन्यात मूल आपण होऊन उठून बसू लागते. याच सुमारास रांगू लागते व बाराव्या महिन्याच्या सुरुवातीस चालू लागते. वाढीचे टप्पे व वय यांबद्दलचा आलेख आ. २ मध्ये दिला आहे. टप्पे सर्वसाधारण असून त्यांत थोडाफार फरक आढळल्यास तो प्राकृतिक (सर्वसामान्य) असू शकतो.
नवजात काळात काही ⇨ प्रतिक्षेपी क्रिया मिळतात व त्या बहुतकरून तिसऱ्या व चौथ्या महिन्यांच्या दरम्यान मिळेनाशा होतात. या प्रतिक्षेपी क्रिया नेहमीपेक्षा अधिक काळ मिळत राहिल्यास ते मेंदूच्या बाह्यकाची (मोठ्या मेंदूच्या सर्वात बाहेरील बाजूच्या करड्या रंगाच्या पट्ट्याची) वाढ लांबणीवर पडल्याचे दर्शवितात. उदा., मॉरो प्रतिक्षेपी क्रिया [⟶ नवजात अर्भक] नेहमी चौथ्या महिन्यानंतर नाहीशी होते. ती अधिक काळ मिळत राहणे मानसिक मंदता वा प्रसूतीच्यावेळी मेंदूस झालेली इजा दर्शविते. पकड प्रतिक्षेपी क्रिया (बोट किंवा पेनासारखी वस्तू तळहातावर ठेवल्यास मूल घट्ट पकडते) चौथ्या महिन्यात किंवा त्या अगोदर नाहीशी होते.
संवेदना व ज्ञानेंद्रियांची वाढ : जन्मत: स्पर्श, वेदना, तापमान इ. संवेदना पूर्ण वाढलेल्या असल्या, तरी त्यांचे मेंदूतील स्थाननिर्धारण अनिश्चित असते. प्रतिसाद मिळण्याकरिता देण्यात येणारे उद्दीपन अर्भकास अधिक जोरकस असावे लागते. सहाव्या ते नवव्या महिन्यात बालकाला उद्दीपन स्थानाची अस्पष्ट जाणीव होऊ लागते आणि वर्ष ते दीड वर्ष वयापर्यंत मूल डोळ्यांची हालचाल करून उद्दीपन स्थान निश्चित करू शकते. शक्य असल्यास त्रासदायक उद्दीपन दूर सारण्याचा प्रयत्न करते. काही शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे मस्तिष्क बाह्यक या सुमारास प्रथम क्रियाशील बनतो.
गंध व रुचिज्ञान पूर्ण वाढलेल्या तसेच अकाल अर्भकात जन्मत: अस्तित्वात असतात. दुधाचा वास ओळखता येतो. तिसऱ्या ते चौथ्या महिन्यात रुची पूर्ण वाढते व आंबट, खारट, तुरट यांतील फरक समजू लागतो. या सुमारास लालास्त्रवण अभिसंहित (अवलंबी) प्रतिक्षेपी क्रियेने होऊ लागते. अनवलंबी प्रतिक्षेपजन्य लालास्त्रवण जन्मजात असते. तोंडात बोटे घालणे, हातातील वस्तू, खेळणी वगैरे तोंडाकडे नेणे याच वयात सुरू होते. श्रवणेंद्रियांची तीव्रता हळूहळू वाढते व सहाव्या महिन्यात मूल परिचित व अपरिचित आवाजातील फरक ओळखते. दृष्टी जन्मत: पूर्ण वाढलेली नसते व दुसऱ्या महिन्यापासून मूल मातेस ओळखू लागते. चौथ्या महिन्यात ते डोळ्यासमोरची वस्तू धरण्याचा प्रयत्न करते व एक वर्ष पूर्ण होण्याच्या सुमारास प्राथमिक रंग ओळखते. जन्मजात तिरळेपणा काही मुलांत आढळतो परंतु तो तिसऱ्या महिन्याच्या सुमारास नाहीसा होतो. सहाव्या महिन्यानंतर टिकून राहिलेला तिरळेपणा नेत्रविशारदाकडून तपासून घ्यावा. बोलण्याची सुरुवात होण्याचे वय व्यक्तिगत निरनिराळे असते. मुलाशी अधून मधून बोलणाऱ्या मातेचे मूल अबोल मातेच्या मुलापेक्षा लवकर बोलू लागण्याची शक्यता असते. पाचव्या ते सहाव्या महिन्यात मूल ‘बा, बा’, ‘दा,दा’ असे आवाज काढू लागते परंतु ते अर्थहीन आवाज असतात. सातव्या-आठव्या महिन्यात तोंडातून निघणाऱ्या आवाजांची विशिष्ट गरजांशी सांगड घातली जाते पण तरीही शब्दसादृशता नसते. दहाव्या-आकराव्या महिन्यात कानावर प़डलेले विशिष्ट शब्द मुखातून बाहेर पडू लागतात. मूल पूर्ण वर्षाचे झाल्यानंतर काही शब्दोच्चार स्पष्ट येऊ लागतात.
हातांचा उपयोग : तिसऱ्या महिन्याच्या सुमारास मूल एखादी वस्तू हातात धरू शकते परंतु पडलेली वस्तू उचलून घेऊ शकत नाही. पाचव्या ते सहाव्या महिन्यात समोर ठेवलेली हलकी वस्तू ते उचलून घेऊ शकते. सातव्या महिन्यात वस्तू एका हातातून दुसऱ्यात नेऊ लागते.दहाव्या महिन्यात अंगठा व तर्जनी या बोटांत गोष्टी धरू शकते. आठव्या महिन्यात बिस्किट हातात धरून खाऊ लागते. पंधराव्या महिन्यात मदतीशिवाय खाऊ लागून भांडे हातात धरून पाणीही पिऊ लागते.
झोप व रडणे : झोपेचे निरनिराळे प्रकार असतात व ते पूर्ण वाढीवर अवलंबून असतात. प्रत्येक बालक स्वसमाधानाप्रमाणे वैयक्तिक झोपेचा प्रकार निर्माण करते. गाढ व शांत झोप बालकाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यास आवश्यक असते. नवजात काळापासून पहिले काही महिने मूल दिवसातील १८–२० तास झोपते. सहाव्या महिन्यापासून एक वर्षांपर्यंत ते १६–१८ तास झोपते. वर्षाचे होईपर्यंत झोप हळूहळू कमी होते व ती १४-१६ तासांवर येते. वर्षापर्यंत भूक, सूक्ष्मजंतुसंसर्ग, वेदना, भिजलेला लंगोट, उष्णता किंवा थंडी बालकाच्या झोपेतील बिघाडास कारणीभूत होऊ शकतात. काही बालकांत झोपेपूर्वी काही विशिष्ट कृती करण्याची सवय उत्पन्न होते. उदा.,अंगठा चोखणे, डोलवून घेणे वगैरे. काही मुले झोपण्यापूर्वी पुष्कळ रडतात व मग झोपतात.
रडणे ही क्रिया स्मित करू लागण्यापूर्वीच बालक करू शकते. संपर्क साधण्याचे पहिले साधन म्हणजे रडण्याची क्रिया होय. भूक, उचलून जवळ घेण्याची सूचना वा कोणत्याही अस्वास्थ्यकारक गोष्टीची सूचना मूल रडण्याद्वारे देते. रडण्याचे प्रकार निरनिराळे असतात व ते शरीरप्रकृती, पचनक्रिया इत्यादींवर अवलंबून असतात. काही मुले अंधार केल्यास रडतात, तर काही दिव्याचा उजेड पडताच रडतात. मुलाच्या रडण्याचा अर्थ मातेला हळूहळू कळू लागतो. कधीकधी मूल नक्की का रडते हे सांगणे कठीण असते व अशा वेळी बालरोगतज्ञाचा सल्ला घेणे जरूर असते.
सवयी : चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या सवयी लहान मुले चटकन शिकतात. जननेंद्रियाशी चाळा करणे, केस उपटणे, दात चावणे, अभक्ष्य-भक्षण (माती, भिंतीचा रंग वगैरे) इ. सवयी आपोआप निर्माण होतात. काही मुले एका हाताचा अंगठा तोंडात घालून सतत चोखतात. ही सवय कधीकधी काही वर्षे टिकून राहते मात्र तीन वर्षांनंतर ती दातावर दुष्परिणाम करते. कोणतीही सवय सुटण्याकरिता रागावणे, ओरडणे, मारणे इ. उपाय योजू नयेत. मुलाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा वारंवार प्रयत्न करावा. अन्नसेवन, झोप, मलमूत्र उत्सर्जनाच्या सवयी लावण्याचे प्रयत्न फाजील भर देऊन करू नयेत.
मलमूत्र उत्सर्जनाची शिस्त लावण्याची घाई करू नये. पहिले काही महिने या क्रिया संपूर्णपणे अनैच्छिकच असतात व त्यांवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणे अशक्य असते. सर्वसाधारणपणे आधाराशिवाय न गडबडता चालू लागलेले मूल अशी शिस्त लावण्यास योग्य समजावे. मलोत्सर्जनावरील नियंत्रण मूत्रोत्सर्जन नियंत्रणापूर्वीच तयार होते. मुलगे मुलीपेक्षा अगोदर मलोत्सर्जन नियंत्रण करू लागतात, तर मुली मूत्रोत्सर्जन नियंत्रण लवकर करतात. सर्वसाधारणपणे मूल दोन-तीन वर्षांपेक्षा मोठे झाल्यानंतरही अंथरुणात न कळत मूत्रोत्सर्जन करीत राहिल्यास त्यास असंयत मूत्रतेचा विकार असल्याचे समजून वैद्यकीय सल्ला घ्यावा. लहान मुलांची त्वचा संवेदनशील असते आणि मूत्राने ओला लंगोट किंवा दुपटे तसेच ठेवल्याने त्वचेवर उत्स्फोट (पूरळ) उमटतो. उत्सर्जित मूत्र लगेच अपघटन (घटक द्रव्ये अलग होणे) पावू लागते व उत्पन्न होणारा अमोनिया वायू त्वचेचा क्षोभक असतो.
पोषण : पहिले चार ते सहा महिने बालकाचे पोषण दुधावरच होणे योग्य असते. ‘दुग्धस्त्रवण व स्तनपान’ या स्वतंत्र नोंदीमध्ये स्तनपान व कृत्रिम दुग्धपान यांविषयी माहिती दिली आहे.
या ठिकाणी बालकाच्या ‘स्तन्यमोचनाच्या’ म्हणजे अंगावरून तोडण्याच्या वयानंतरच्या पोषणाचा विचार केला आहे. बहुतेक उष्ण कटिबंधीय देशांतून स्तनपान वयाच्या दुसऱ्या वर्षांपर्यंतही चालू ठेवल्याचे आढळते. आधुनिक वैद्यकीय मतप्रणालीनुसार चार ते सहा महिन्यांनंतर किंवा जरूर पडल्यास चार ते सहा आठवड्यांनंतरही स्तनपान बंद करून बालकास थोडे घट्ट अन्नपदार्थ देण्यास हरकत नाही. काही मुले चौथ्या महिन्यापासून स्तनाग्रे चावू लागतात. या मुलांना घट्ट अन्नपदार्थ योग्य रीतीने तयार करून जिभेवर ठेवल्यास ती गिळतात.
पुढील परिस्थितीत बालकास घट्ट अन्नपदार्थ देण्यास हरकत नाही : (१) सर्वसाधारणपणे स्तनपान करणाऱ्या मुलास दोन आठवडे वयात अर्धा लिटर आणि ३-६ महिने वयात तीन-चतुर्थांश लिटर दूधमिळावयास हवे. दररोज १,००० ते १,२०० मिलि. दूध मिळूनही ज्या मुलांचे समाधान होत नाही अशा मुलांना घट्ट अन्नपदार्थ द्यावेत. (२) मुलाचे वजन ६.८ ते ७.२५ किग्रॅ. असून ते वरीलप्रमाणे दूध पीत असल्यास घट्ट अन्न देण्यास सुरुवात करावी. (३) अपुरा स्तनदुग्ध-पुरवठा असल्यास तिसऱ्या महिन्यापासूनच मिश्रान्न द्यावे. (४) अति दुग्धपानाने मूल अतिलठ्ठ बनत असल्यास. (५) मातेचा आजार.
मूल चांगले गिळू लागेपर्यंत मिश्रान्नाचा घट्टपणा हळूहळू वाढवावा, तसेच प्रमाणही हळूहळू वाढवावे. तेच अन्न तीन-चार दिवस सुरुवातीस फक्त चमचाभरच देऊन नंतर बदल करावा. हळूहळू केलेले बदल जठरांत्रमार्ग (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून होणारा अन्नमार्ग) बिघडू देत नाहीत. घट्ट मिश्रान्न व दूध दोन्ही चालू असल्यास स्तनपानापूर्वी किंवा बाटली देण्यापूर्वी घट्ट पदार्थ द्यावेत.
घट्ट अन्नाचे पुढील प्रकार सुचविण्यात आले आहेत : पहिला प्रकार : (पाच ते सहा महिने). (अ) तृणधान्य : तांदूळ, मका किंवा गहू, दूध व साखर घालून आणि डाळीचे पीठ (तूर, मूग वगैरे) मिसळून पेज बनवून देणे.(आ) अंड्याचा पिवळा बलक.
दुसरा प्रकार : (१५ दिवस वरील पदार्थ एकसारखे दिल्यानंतर बदल म्हणून वापरावयाचे पदार्थ). शिजवून चेचलेले बटाटे आणि शिजविलेल्या व चाळणीतून गाळलेल्या भाज्या.
तिसरा प्रकार (आणखी पंधरा दिवसानंतर). शिजवलेले मांस बारीक वाटून संपूर्ण अंडे, पावाचे तुकडे, बिस्किटे.
या वयात बालकांना देण्याकरिता मुद्दाम बनविलेली फॅरेक्ससारखी तृणधान्यमिश्रित ⇨ बालक अन्ने मिळतात पण ती फक्त सुस्थितीतील लोकांनाच परवडणारी आहेत. पहिले घट्ट अन्न म्हणून शिजवून चेचून दिलेली फळेही उत्तम असतात. भिजवत ठेवून मऊ केलेले खजूर, शेंगदाणे, हरबऱ्याची डाळ हे पदार्थही सहा महिन्यांनंतर द्यावयास हरकत नाही. भाज्यांची सुरुवात एका चमच्यापासून करून दिवसास चार चमच्यांपर्यंत वाढवावी. वाटाणा, टोमॅटो, गाजर व हिरव्या भाज्या उत्तम शिजवून देता येतात. मांसरस हळूहळू वाढवीत दररोज ३० मिलि.पर्यंत वाढवावा, वर्ष पूर्ण होण्याच्या सुमारास आठवड्यातून दोनदा मासे भाजून किंवा उकडून द्यावेत (तळलेले देऊ नयेत). चपातीचे तुकडे, पावाचे तुकडे, बिस्किटे दात येण्याच्या सुमारास दिल्यास चर्वणक्रियेने जबड्याला थोडाफार व्यायाम होतो.
दुसऱ्या सहामाहीत क्षुधाशमन तातडीने करण्याची बालकाची इच्छा काहीशी कमी होते. या वयात आहाराच्या वेळा हळूहळू कमी करावयास लागून, दिवसातून तीन वेळा अन्न देणे योजता येते. दूध व मिश्रान्न दोन्ही चालू असल्यास त्यात कोणते किती प्रमाणात घेतले यात थोडीफार अनियमितता असू शकते. कोणतेही अन्न बळजबरीने सेवन करावयास लावू नये. अल्पसंभरण (प्रमाणापेक्षा कमी अन्न भरविणे) आणि अतिसंभरण (प्रमाणापेक्षा जादा अन्न भरविणे) कटाक्षाने टाळावे.
सहा महिने ते १ वर्षापर्यंतच्या बालकाच्या दैनंदिन आहाराकरिता पुढील खाद्यपदार्थ सुचविले आहेत : दूध व फॅरेक्स १ : १ या प्रमाणात, फॅरेक्सऐवजी मेल्टम, सोयामिल्क इ. चालतील [⟶ बालक अन्न]. अ व ड जीवनसत्वांचे थेंब, कॅल्शियमचे पातळ औषध, बाल अमूल, भाताची पेज, मऊ गुरगुट्या भात, वरण, बटाटे,खजूर, केळी, नाचणीची पेज, खारीक, आदल्या रात्री पाण्यात भिजवलेले शेंगदाणे, चण्याची डाळ इत्यादी.
स्नान व कपडे : पहिले सर्वांग स्नान नाळ सुकल्यानंतर म्हणजे पंधरा दिवसांनंतर घालणे हितावह असते. तोपर्यंत कोमट पाण्यात भिजवलेल्या मऊ फडक्याने चेहरा व शरीर पुसून स्वच्छ करणे पुरेसे असते. भारतीय पारंपारिक पद्धतीप्रमाणे बाळाची टाळू भरून, दोन्ही पाय लांब करून त्यावर एकदा पालथे व एकदा उलथे झोपवून गरम पाण्याने अंघोळ घालण्याच्या पद्धतीत फारसे दोषास्पद काही आढळत नाही पण अलीकडे योग्य अशी उथळ रुंद तोंडाची प्लॅस्टिकची टिपे उपलब्ध झालेली असून ती बालकाच्या स्नानास योग्य असतात. याला ‘टीप-स्नान’ म्हणतात.पाण्याचे तापमान ३५° से. ते ३६.६७° से. पर्यंत असावे. स्नानापूर्वी सर्वांगास तेल (खोबऱ्याचे) लावावे व अल्पसा साबणाचा उपयोग करावा. स्नानानंतर सर्वांग कोरडे करावे व शक्य असल्यास बेबी पावडर (झिंक ऑक्साइड, संगजिरे-टाल्क व बोरिक अम्ल यांच्या मिश्रणापासून बनविलेली पावडर) सर्वांगास विशेषेकरून काख, जांघ, नितंब इ. जागी लावावी. स्नान आणि त्यानंतरची कोरडे करण्याची क्रिया फार वेळ लांबवू नये. बराच वेळ उघडे राहिल्याने पोटाचे व इतर विकार होण्याचा संभव असतो. दररोज योजनाबद्ध व योग्य स्नान मुलाला आवडू लागते. स्नानामुळे स्वच्छता व मानसिक उभारी हे दोन्ही साधता येतात.
अलीकडील संशोधनानुसार लहान मुलांचे कपडे वजनाने हलके व अंगावर घट्ट न बसणारे असावेत. कपड्यांचा अतिवापर करून मुलास गुंडाळून ठेवण्याची गरज नसते. कारण त्यांची उष्णता नियामकयंत्रणा प्रौढांपेक्षा अधिक क्रियाशील असते. याशिवाय खेळती हवा व प्रकाश हे दोन्ही त्वचेच्या चयापचयास (सतत होणाऱ्या रासायनिक–भौतिक घडामोडींस) मदत करतात. लोकरीच्या कपड्यांपेक्षा सुती व रेशमी कपडे बालकास पुरेसे असतात.
अपघात व बालके : अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत कोणत्याही बालरोगापेक्षा अपघातामुळे होणारी बालमृत्युसंख्या अधिक आहे. ब्रिटनमध्ये एक वर्षावरील मुलांमध्ये अपघातामुळे होणारी मृत्युसंख्या अर्बुदांमुळे (नविन पेशींच्या अतिरिक्त वाढीमुळे निर्माण होणाऱ्या आणि शरीरक्रियेला निरुपयोगी असणाऱ्या गाठींमुळे) होणाऱ्या मृत्युसंख्येच्या तिप्पट आहे. पाश्चात्य देशांच्या मानाने भारतात अपघातामुळे होणाऱ्या बालमृत्यूंची संख्या बरीच कमी आहे.
मूल उठून बसू लागण्यापूर्वीच अपघाताने प़डण्याची शक्यता असते. अशा पडण्यामुळे सहसा गंभीर इजा होत नाही. कारण बालकांच्या हाडांत प्रौढांपेक्षा अधिक प्रत्यास्थता (विकृती निर्माण करणारी प्रेरणा काढून टाकल्यावर मूळ आकार धारण करण्याची क्षमता) असते. रांगावयास आणि चालावयास लागणे सुरू होताच आजूबाजूच्या परिसराचा शोध घेणे सुरू होते व अपघाताचे धोके वाढतात. जिना चढण्याच्या सुरुवातीच्या वयात जिन्याच्या सुरुवातीस मुलाने एकटे चढू नये म्हणून संरक्षक दार असावेचाकू, कातरी, टाचण्या, सुया यांसारख्या वस्तू उभे राहू लागलेल्या मुलांच्या हाती पडणार नाहीत, अशी खबरदारी घ्यावी. घरातील औषधे, केरोसीन यांसारखे पदार्थ बंदोबस्तात ठेवावेत. इतस्तत: पडलेल्या, आढळणाऱ्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या पिशव्या खेळावयास घेऊन मुले त्यात तोंडाने हवा भरतात. त्यांत घर्षणाने स्थिर विद्युत् उत्पन्न होऊन पिशवी तोंडावर घट्ट बसून मूल गुदमरण्याची शक्यता असते. अपघाताविरुद्ध महत्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक मातेला ⇨ प्रथमोपचारांचे ज्ञान असावयासच हवे.
कोष्टक क्र. १ मध्ये एक वर्षापर्यंतच्या मुलाच्या वाढीचा अंदाज दर्शविणारी शारीरिक मापे दिली आहेत. ती सरासरीची असून अगदी तंतोतंत जुळावयासच हवीत असे नाही.
कोष्टक क्र. १. एक वर्षापर्यंतच्या मुलांची वाढ दर्शविणारी शारिरिक मापे.
वय |
माप |
मुलगे |
मुली |
जन्म |
उंची (लांबी) (सेंमी. मध्ये) |
४७.१ |
४६.७ |
३ महिने |
” |
५९.१ |
५८.१ |
६ महिने |
” |
६४.७ |
६३.७ |
९ महिने |
” |
६८.२ |
६७.० |
१२ महिने |
” |
७३.९ |
७२.५ |
जन्म |
वजन (किग्रॅ. मध्ये) |
२.६१० |
२.५६० |
३ महिने |
” |
५.२७५ |
४.९९५ |
६ महिने |
” |
६.७०५ |
६.१९५ |
९ महिने |
” |
७.३७५ |
६.९१५ |
१२ महिने |
” |
८.४ |
७.८ |
जन्म |
छातीचा घेर (सेंमी. मध्ये) |
३०.६ |
३०.४ |
३ महिने |
” |
३८.४ |
३७.३ |
६ महिने |
” |
४१.० |
३९.७ |
९ महिने |
” |
४२.२ |
४१.१ |
१२ महिने |
” |
४३.३ |
४२.३ |
जन्म |
डोक्याचा घेर (सेंमी. मध्ये) |
३३.३ |
३२.८ |
३ महिने |
” |
३९.४ |
३८.६ |
६ महिने |
” |
४३.२ |
४१.० |
९ महिने |
” |
४३.५ |
४२.८ |
१२ महिने |
” |
४४.४ |
४३.६ |
एक ते पाच वर्षे : बालकाच्या वयाची ही चार वर्षे शारीरिक, मानसिक आणि नैतिक वाढीच्या दृष्टीने महत्वाची असतात. कोष्टक क्रं. २ मध्ये या वयातील उंची, वजन इत्यादींविषयी माहिती दिली आहे.
कोष्टक क्र. २. एक ते पाच वर्षे वयाच्या मुलांची वाढ दर्शविणारी शारीरिक मापे.
वय |
लिंग उंची |
उंची (सेंमी.) |
वजन (किग्रॅ.) |
छातीचा घेर (सेंमी.) |
डोक्याचा घेर (सेंमी.) |
१-२ वर्षे |
मुलगे |
८१.६ |
१०.१ |
४५.८ |
४५.९ |
मुली |
८०.१ |
९.६ |
४५.२ |
४५.२ |
|
२-३ वर्षे |
मुलगे |
८८.८ |
११.८ |
४८.० |
४७.३ |
मुली |
८७.२ |
११.२ |
४७.२ |
४६.२ |
|
३-४ वर्षे |
मुलगे |
९६.० |
१३.५ |
– |
– |
मुली |
९४.५ |
१२.९ |
– |
– |
|
४-५ वर्षे |
मुलगे |
१०२.२ |
१४.८ |
– |
– |
मुली |
१०१.४ |
१४.५ |
– |
– |
या कोष्टकावरून हे ध्यानात येईल की, वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत छातीच्या घेरापेक्षा मोठा असणारा डोक्याचा घेर दुसऱ्या वर्षात छातीबरोबर होतो आणि छातीचा घेर तिसऱ्या वर्षापासून डोक्याच्या घेरापेक्षा मोठा होत जातो.
वाढीचे टप्पे : (अ) एक ते दीड वर्ष : आपण होऊन छोट्या खुर्चीत बसणे आधाराशिवाय उभे राहणे आधाराशिवाय चालणे उभे असताना चेंडू फेकणे जिना रांगत रांगत चढणे किंवा एक हात धरल्यास उभ्याने जिना चढणे बाटलीच्या तोंडात गोटी घालणे व बाहेर काढणे पुस्तकाची दोन-तीन पाने एकत्र उलटणे लाकडी ठोकळे समोर ठेवल्यास तीन-चार ठोकळे एकावर एक रचणे टेबलावर कागद ठेवून त्यावर रंगीत खडूने रेषा काढल्यास मूल तशी कृती करते. दहा शब्दांपर्यंत अर्धवट शब्दोच्चार करणे ‘मला दे’,‘खाली ठेव’ यांसारख्या सूचना समजतात.
(आ) दोन वर्षे : एकट्यानेच जिना चढणे व उतरणे छोट्या स्टूलावरून उडी मारणे चित्रांच्या पुस्तकाचे एक एक पान उलटणे काही चित्रांची नावे बरोबर सांगणे तीन शब्द असलेले वाक्य उच्चारणे स्वत:शी बडबडणे जेवण व मलमूत्रविसर्जनासंबंधी स्वत: सांगणे.
(इ) तीन वर्षे : चवड्यावर चालून दाखवल्यास तसे चालणे व्यवस्थित पळणे तीन चाकी सायकल चालविणे नऊ ते दहा लाकडी ठोकळे एकमेकांवर रचणे तीन ठोकळ्यांचा पूल मांडून दाखवल्यास तसा पुन्हा मांडणे कागदावर वर्तुळ काढणे छोटी छोटी वाक्ये बोलणे एखाद-दुसरे बालगीत गाणे मलमूत्रोत्सर्जनावर पूर्ण नियंत्रण फारशी मदत न घेता कपडे घालणे व उतरवणे अनुभव शब्दांकित करणे स्वत:चे पूर्ण नाव सांगणे नाचणे बागडणे एका पायाने लंगडी घालणे.
(ई) चार वर्षे : डोळे मिटून एका पायावर उभे राहणे व पाय आलटून पालटून बदलणे कातरीने चित्र कापणे चौकोन, त्रिकोण व बहुकोनी आकृती काढून दाखवल्यास तशा काढणे जड व हलकी हा वस्तूतील फरक ओळखणे मागे, बाजूला, खाली इत्यादींचा अर्थ समजणे.
(उ) पाच वर्षे : वस्तू (उदा., चेंडू) बरोबर फेकणे चार रंग ओळखणे लांब वाक्य बोलणे दहा ते वीस नाणी मोजणे ब्रशाने दात घासणे, हात-पाय धुणे व कोरडे करणे बुटाचे बंद बांधणे एकट्याने मलमूत्रविसर्जन करणे इतर मुलांची संगत आवडणे व सांघिक खेळ खेळणे डावी व उजवी समजणे.
दात : वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत सर्वच्या सर्व म्हणजे वीस दुधाचे दात येतात व ते सहाव्या वर्षापर्यंत टिकतात. दुधाचे दात पडून त्यांची जागा कायमचे दात घेतात. दुधाचे दातही किडतात व त्याकडे दुर्लक्ष न करता दंतवैद्याचा सल्ला घेणे जरूर असते. दात न किडण्याकरिता योग्य वेळी दात साफ करण्याची सवय लावणे, कार्बोहायड्रेटाचे (चॉकोलेट वगैरे) अतिसेवन करू न देणे, प्रत्येक जेवणानंतर तोंड पाण्याने खळखळून स्वच्छ करावयास शिकवणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. फ्ल्युओराइडयुक्त दंतधावने आणि फ्ल्युओरीनमिश्रित पिण्याचे पाणी दातकिडीस प्रतिबंधक असतात.
आहार: वयाच्या पहिल्या वाढदिवसानंतर वाढीचा वेग मंदावतो व त्यामुळे भूकही मंदावते. अशा वेळी अज्ञानी माता मुलास सक्तीने भरवण्याचा प्रयत्न करतात. तसे करण्याची गरज नसते कारण कोणतेही मूल उपाशी राहू नये अशी निसर्गाची योजना असतेच. वयाचे दुसरे वर्ष संपण्याच्या सुमारास जेवण्याच्या बाबतीत मूल बहुतांशी स्वावलंबी बनावयास हवे. वाढत्या वयाबरोबर शरीराच्या दर किलोग्रॅम वजनामागील ऊर्जा (कॅलरी) गरज कमी होते. (उदा., अर्भकावस्थेत दर किलोग्रॅम शरीर वजनामागे ११० कॅलरी लागतात, तर वयाच्या पंधराव्या वर्षी ५० कॅलरी पुरतात). या चार वर्षात शारीरिक व मानसिक वाढ अतिशय जलद होते म्हणून दैनंदिन आहाराकडे लक्ष पुरविणे महत्वाचे असते. प्रौढाप्रमाणेच वसा (स्निग्ध पदार्थ), प्रथिने, कार्बोहायड्रेटे, लवणे, जीवनसत्वे व पाणी या सर्व अन्नघटकांची मुलांनाही गरज असते. प्रौढांच्या मानाने मुलांना प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे तसेच ऊर्जेची गरज सापेक्षतेने अधिक असते. ताजी फळे व भाज्या आहारात असाव्यात. प्रत्येक जेवणात दोन वर्षांपर्यंत दूध हा प्रमुख घटक असावा. सर्वसाधारणपणे ७५० मिलि. दूध दिवसातून द्यावे व जसजसे इतर घटक वाढतात तसतसे हे प्रमाण ५०० मिलि. वर आणावे. जेवणाच्या वेळा ठराविक व नियमित असाव्यात. या वेळी वातावरण आनंदी ठेवावे व जेवणाच्या चांगल्या सवयी मोठ्यांनी प्रत्यक्ष कृतीने लावणे इष्ट असते. विशिष्ट आजाराकरिता बालकांना विशिष्ट आहार देण्याची गरज असते. त्याकरिता तज्ञांचा सल्ला घेणे जरूर असते. [⟶ बालक अन्न].
एक ते दोन वर्षे वयाच्या मुलांकरिता पुढील आहार सुचविला आहे :
सकाळी (सहा वाजता) : (दात घासल्याशिवाय खावयास देऊ नये). १ कप दूध व दोन पावाचे तुकडे किंवा चार बिस्किटे, एक अंडे किंवा एक लाडू किंवा चिक्की किंवा इडली, शिरा, डोसा, पोहे, उपमा, चपातीचा लाडू यांपैकी एक.
दुपारी (अकरा वाजता) : ११/२ वाटी वरणभात किंवा १ १/२ वाटी खिचडी आणि अर्धी वाटी दही व एक चमचा लोणी किंवा तूप. (स्वत:च्या हाताने जेवू द्यावे. तोंड बरबटले वा सांडले म्हणून रागावू नये).
दुपारी (एक वाजता): एक चपाती किंवा दोन पावाचे तुकडे किंवा अर्धी भाकरी, आमटी किंवा उकडलेला मासा, मटण, कोंबडी किंवा भाजी, मोडाचे धान्य, कडधान्ये उकडून मीठ घालून द्यावीत.
दुपारी (तीन वाजता) : बाळाला आवडणारे कोणतेही फळ आणि एक कप दूध आणि २ बिस्किटे किंवा अर्धी वाटी शिरा, पोहे, गाजर हलवा, साबुदाणा खिचडी यांपैकी एक.
सायंकाळी (सहा वाजता) :१/२ चपाती किंवा पावाचा १ तुकडा, गूळतूप, मुरंबा किंवा जॅम.
रात्री (आठ वाजता) : ११/२ वाटी वरणभात किंवा तेवढीच खिचडी, एक कप दूध (खाण्यानंतर व झोपण्यापूर्वी दात साफ करावयास सांगावे). घरात शिजवलेले अन्न सर्वोत्तम असते. अन्नात सतत बदल करणे आवश्यक असते. (फार तिखट पदार्थ देऊ नयेत).
झोप : एक वर्ष पूर्ण होण्याच्या सुमारास बालकास रात्रीचे बारा तास व दिवसाचे दोन तीन तास मिळून चौदा ते पंधरा तास झोप पुरते. दीड वर्ष पूर्ण झाल्यावर सकाळच्या झोपेपैकी तासभर कमी करावी परंतु वयाची पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत दुपारचा तासभराची झोप चालू ठेवावी. अतिश्रमामुळे मुले कधी कधी नीट अन्नसेवन करीत नाहीत. त्यांची पचनक्रिया बिघडते व झोपेत व्यत्यय येतो. अती कपडे किंवा अत्यल्प कपडे, ओला लंगोट, माश्या, डास, भूक किंवा अपचन, वाजवीपेक्षा जादा खाणे या गोष्टी झोप बिघडविण्यास कारणीभूत असतात.
खेळ व व्यायाम : लहान मुलांना शक्य तेवढे मोकळे सोडून नाचू, बागडू व पळू द्यावे. त्यामुळे त्यांच्या स्नायूंची नैसर्गिक वाढ होते. अलीकडे मुलांच्या खेळाकरिता खास क्रीडांगणे व उद्याने मोठ्या शहरांतून उपलब्ध झाली आहेत. आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या कुटुंबातील मुले काही तास शिशुगृहांतून ठेवण्याची सोयही उपलब्ध झाली आहे. अशा गृहांतून मुलांना मोकळेपणाने उघड्या जागी खेळण्याकरिता विशिष्ट उपकरणे ठेवलेली असतात.
बाजारात निरनिराळी खेळणी मिळतात. त्यांपैकी साधी व इजा न होईल अशी खेळणी निवडावी. यांत्रिक खेळण्यांपेक्षा अशी खेळणी कल्पनाशक्ती हळूहळू विकसित करण्यास उपयुक्त असतात. कागदाचे कपटे, रिकामी कागदी पाकिटे यासारख्या साध्या गोष्टी पुरेशा असतात. हळूहळू लाकडी बैलगाडी वगैरे वस्तू दिल्यास कल्पनावृद्धी होते. खेळ व ज्ञानार्जन हे दोन्ही एकमेकांशी निगडित असतात. साधे लाकडी हलके ठोकळे एकमेकांवर रचणे, इकडून तिकडे ठेवणे इ. क्रिया आकार, वजन इत्यादींविषयी नवीन माहिती पुरवून मुलांच्या कल्पनाशक्तीस चालना देतात.
खेळताना विशेषेकरून उघड्यावर खेळताना मुलांच्या अंगाला माती वगैरे लागण्याची शक्यता असते. त्याबद्दल सारखा धाक दाखवणे, रागावणे टाळावे. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले असले म्हणजे पुरे. मुलाबरोबर खेळात सहभागी होण्याने मातेस लक्ष पुरवता येऊन त्याचा आनंद द्विगुणित करता येतो.
आंघोळ व कपडे : सर्वसाधारणपणे सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान आंघोळ घालणे सोईचे असते. आंघोळीपूर्वी तेल लावून हलक्या हातांनी मालिश करावे. खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने आंघोळ घालणे उत्तम. अंगावर कपडे नसल्या वेळी जीवनसत्वयुक्त सरबत पाजणे चांगले. ओल्या कापसाच्या बोळ्याने डोळ्यांच्या पापण्या, नाकपुड्या आधीच स्वच्छ करून घ्याव्या. पाण्याचे तापमान सुसह्य असावे. लहान मुलाकरिता बनविलेले खास साबण वापरावे. डोक्यावरील केसांची, विशेषेकरून मुलींच्या बाबतीत योग्य काळजी घ्यावी. कपडे स्वच्छ व नीटनेटके असावेत. कारण आपण या वयात कसे दिसतो याविषयी मुलाचा अभिमान जागृत झालेला असतो. सैल कपडे हालचालीत अडथळा आणीत नाहीत.
बालकाच्या मानसिक विकासासंबंधीची माहिती ‘बालमानसशास्त्र’ या स्वतंत्र नोंदीत दिली आहे.
रोगप्रतिबंधक उपाय : जागतिक आरोग्य संघटनेपुढे १९५० साली आंतरराष्ट्रीय बालक वर्षाची कल्पना प्रथम भारतानेच मांडली. भारतात एकूण लोकसंश्येशी बालकांचे प्रमाण ४०% आहे. वयाच्या पहिल्या वर्षी मृत्युमुखी पडणारी बालकांची संख्या दर हजारी ५ आहे, तर पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एकूण बालकसंख्येशी ४०% एवढे मृत्युप्रमाण अ जीवनसत्वाच्या अभावी अंध बनणाऱ्या बालकांची संख्या २.५ कोटी आहे. एक ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना दैनंदिन १, ३५० कॅलरी मिळतील असा पोषक आहार मिळावयास हवा.
भारतातील मुलांना प्रत्यक्षात ७०० ते ८५० कॅलरी मिळतील एवढीच पोषणद्रव्ये मिळतात. भारतातील एकूण २५ कोटी बालकांपैकी ८१% बालके खेड्यांतून राहतात. अशा परिस्थितीत रोगप्रतिबंधक उपाय फार महत्त्वाचे ठरतात. बालसंगोपनात ५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील रोगप्रतिबंधक उपाय अतिशय महत्त्वाचे असून त्याविषयी येथे थोडी माहिती दिली आहे. सविस्तर माहिती ‘रोगप्रतिकारक्षमता’ या नोंदीत दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नागरी व ग्रामीण भागांतील बालकांत अशी क्षमता निर्माण करण्याकरिता सुचविलेले सूचिपत्रक कोष्टक क्र. ३ मध्ये दिले आहे आणि भारतातील बहुसंख्य बालरोगकेंद्रांतून कोष्टक क्र. ४ मध्ये दिलेले सूचिपत्रक उपयोगात आहे.
कोष्टक क्र. ३. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेले रोगप्रतिकारक्षमता उत्पादन सूचिपत्रक.
नागरी क्षेत्र
वय |
लस प्रकार |
० ते १ महिना |
क्षयप्रतिबंधक बीसीजी लस व देवीप्रतिबंधक लस. |
३ ते ४ महिने |
त्रिप्रतिरक्षात्मक (घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यांना प्रतिबंधात्मक असलेली ट्रिपल) लस शक्यतो तुरटीमिश्रित अंत:क्षेपण (इंजेक्शन), बालपक्षाघात (पोलिओ) लस (तोंडाने), पूर्वी दिली नसल्यासबीसीजी लस. |
५ ते ६ महिने |
त्रिप्रतिरक्षात्मक लस (दुसरी मात्रा), बालपक्षाघात लस(दुसरी मात्रा) पूर्वी दिली नसल्यास बीसीजी लस |
२ वर्षे |
त्रिप्रतिरक्षात्मक लस (वर्धक मात्रा) व बालपक्षाघात लस (वर्धक मात्रा). |
५ ते ६ वर्षे(शालाप्रवेश) |
आंत्रज्वर (टायफॉइड) प्रतिबंधक लस (एक मात्रा) धनुर्वातप्रतिबंधक विषाभ मात्रा (दोन्ही मिसळून अंत: क्षेपण) बीसीजी लस (दुसरी मात्रा), देवीप्रतिबंधक लस (दुसरी मात्रा). |
११ ते १२ वर्षे (प्राथमिक शाळा सोडताना) |
देवीप्रतिबंधक लस (तिसरी मात्रा), धनुर्वात विषाभ व आंत्रज्वरप्रतिबंधक लस यांचे मिश्रण(वर्धक मात्रा). |
ग्रामीण क्षेत्र |
|
वय |
लस प्रकार |
० ते १ महिना |
बीसीजी लस व देवीप्रतिबंधक लस. |
३ ते ४ महिने |
त्रिप्रतिरक्षात्मक लस (तुरटीमिश्रित). पूर्वी दिली नसल्यास देवीप्रतिबंधक लस |
५ ते ६ महिने |
त्रिप्रतिरक्षात्मक लस (दुसरी मात्रा), पूर्वी दिली नसल्यास बीसीजी लस |
५ ते ६ वर्षे |
आंत्रज्वरप्रतिबंधक लस (एक मात्रा) धनुर्वात विषाभ मात्रा (मिश्रण), बीसीजी लस (दुसरी मात्रा), देवीप्रतिबंधक लस (दुसरी मात्रा). |
११ ते १२ वर्षे |
धनुर्वात विषाभ मात्रा-आंत्रज्वरप्रतिबंधक लस (मिश्रण वर्धक मात्रा), देवीप्रतिबंधक लस (तिसरी मात्रा). |
कोष्टक क्र. ४. भारतात बहुसंख्य बालरोगकेंद्रांतून उपयोगात असलेले रोगप्रतिकारक्षमता उत्पादन सूचिपत्रक.
लस |
वय |
विशेष सूचना |
देवीप्रतिबंधक (प्राथमिक) |
पहिले तीन दिवस |
पहिल्या महिन्यात केव्हाही, जर मूल देखरेखीखाली असेल तरच. रोगसंसर्ग झाल्यास वय किंवा पूर्व मात्रा विचारात न घेता ही मात्रा देणे. |
देवीप्रतिबंधक (दुसरी मात्रा) |
३ वर्षे |
बालक शिशुगृहात जात असल्यास. |
५ वर्षे |
प्राथिमिक शालारंभ. |
|
त्रिप्रतिरक्षात्मक लस |
२ महिने |
(पहिली मात्रा) |
३ महिने |
(दुसरी मात्रा) |
|
४ महिने |
(तिसरी मात्रा) |
|
वर्धक मात्रा |
२ वर्षे |
|
” |
५ वर्षे |
|
बालपक्षाघात लस |
२ महिने |
|
(साबिन लस तोंडाने) |
३ महिने |
|
४ महिने |
||
वर्धक मात्रा |
२ वर्षे |
|
” |
५ वर्षे |
पहा : बालमानसशास्त्र बालरोगविज्ञान.
संदर्भ : 1. Achar, S. T. Vishwanathan. J. Pediatrics in Developing Tropical Countries, Bombay, 1973.
2. Gupta, Satya, Ed., A Textbook of Pediatrics, New Delhi, 1978.
3. Nelson, W. E., Ed., Textbook of Pediatrics, Philadelphia, 1964.
4. Prasad, L. S., Ed. Robinson and Wallgren’s Manual of Pediatrics, Bombay, 1973.
5. Wallace, W. H. S. Infant and Child Care, London, 1951.
कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.
“