नॉयमान, जॉन (यानोश) फोन : (२८ डिसेंबर १९०३–८ फेब्रुवारी १९५७). हंगेरियन अमेरिकन गणितज्ञ. त्यांनी गणित व भौतिक यांतील विविध शाखांत महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. त्यांचा जन्म बूडापेस्ट येथे झाला. हंगेरीतील कम्युनिस्ट राजवटीच्या काळात १९१९ साली ते देशाबाहेर पडले आणि त्यांनी बर्लिन, झुरिक व त्यानंतर बूडापेस्ट येथे शिक्षण घेतले. गटिंगेन येथे त्यांची ⇨ जूलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांच्याबरोबर ओळख झाली. १९२३ मध्ये त्यांनी बूडापेस्ट विद्यापीठाची गणितातील डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांनी झुरिक येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची रासायनिक अभियांत्रिकीची पदवीही मिळविली. १९२६–२९ या काळात बर्लिन विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून काम केल्यानंतर त्यांची हँबर्ग विद्यापीठात साहाय्यक प्रध्यापक म्हणून नेमणूक झाली. अमेरिकेतील प्रिस्टन विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. प्रिन्स्टन येथे इन्स्टिट्यूट फॉर अँडव्हान्स्‌ड स्टडीज या संस्थेची स्थापना झाल्यावर १९३३ मध्ये नॉयमान यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून तेथे नेमणूक झाली आणि त्याच पदावर त्यांनी अखेरपर्यंत काम केले.

 

⇨ पुंजयामिकीमध्ये त्यांनी केलेल्या संशोधनामुळे कारण आणि परिणाम हा संबंध फक्त मोठ्या प्रमाणावरील भौतिक घटनांबाबत लागू पडतो आणि उप-आणवीय घटनांबाबत लागू पडत नाही, हे तत्त्व तर्कशुद्ध पायावर सिद्ध झाले. त्याचप्रमाणे पुंजयामिकीच्या गणितीय पायासंबंधी (याविषयी त्यांनी १९२६ साली लिहिलेला मॅथेमॅटिकल फाऊंडेशन्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे) त्यांनी केलेल्या कार्यातूनच त्यांना हिल्बर्ट अवकाशातील रैखिक कारकांचा वर्णपटीय सिद्धांत विकसित करण्यात, तसेच कारकांच्या वलयासंबंधीचा सिद्धांत व अखंडित भूमितीची संकल्पना मांडण्यात यश मिळाले [→कारक सिद्धांत]. थिअरी ऑफ गेम्स अँड इकॉनॉमिक बिव्हेव्हियर (१९४४) या ओ. मॉर्गेनश्टेर्न यांच्याबरोबर नॉयमान यांनी लिहिलेल्या ग्रंथात त्यांनी डावपेचांचा उपयोग करणे आवश्यक असलेले जटिल (गुंतागुंतीचे) खेळ व डावपेच न लागणारे खेळ यांतील फरक दाखवून दिला. त्यांच्या ⇨ खेळ सिद्धांताचा ⇨ सांख्यिकीय अनुमानशास्त्र आणि आर्थिक प्रणालींची गणितीय प्रतिरूपे [→ अर्थमिति] यांच्या संकल्पनांवर मोठा परिणाम झाला.

त्यांनी १९३० नंतरच्या दशकात अध्यापनाबरोबरच अमेरिकेच्या नौदलाचे आणि भूदलाचे सल्लागार म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी लॉस ॲलॅमॉस (न्यु मेक्सिको) येथील अणुबाँब प्रकल्पात काम केले. त्यांच्या अंत:स्फोटनाच्या संकल्पनेमुळे अणुबाँब प्रत्यक्षात येण्यास मोठी मदत झाली. तसेच त्यांनी आघात तरंगांबाबत [→ तरंग गति] केलेल्या गणितीय कार्यामुळे हीरोशीमा व नागासाकी येथील अणुस्फोटांची उंची काढणे शक्य झाले. १९४५–५५ या काळात ते इलेक्ट्रॉनीय संगणकासंबंधीच्या (गणकयंत्रांसंबंधीच्या) सरकारी प्रकल्पाचे संचालक होते. अतिशय जलद गतीने गणितीय कृत्ये करण्याच्या प्रक्रियेसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधन कार्यामुळे हायड्रोजन बाँबच्या विकासासाठी उपयोगात आणले गेलेले मोठेमोठे इलेक्ट्रॉनीय संगणक तयार करणे शक्य झाले. हायड्रोजन बाँबचे प्रकल्प पुढे चालू ठेवण्याबाबत ओपेनहायमर यांच्याबरोबर त्यांचे मतभेद होते, पण अमेरिकन सरकारने केलेल्या ओपेनहायमर यांच्यावरील आरोपांच्या चौकशीच्या वेळी नॉयमान यांनी ओपेनहायमर यांची राष्ट्रनिष्ठा व सचोटी यांबाबत ग्वाही दिलेली होती. १९५४ मध्ये अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगावर त्यांची नेमणूक झाली व १९५६ मध्ये कर्करोगामुळे रूग्णालयात रहावे लागले असतानाही त्यांनी आयोगाचे कार्य मृत्यूपावेतो पुढे चालू ठेवले. १९५६ साली त्यांना ५०,००० डॉलरचे फेर्मी पारितोषिक मिळाले.

त्यांचे कार्य एकत्रित स्वरूपात ६ खंडांमध्ये (१९६१–६३) प्रसिद्ध झालेले असून त्यावरून त्यांनी गणितीय तर्कशास्त्र, संच सिद्धांत, गट सिद्धांत, संगणकांचे अभिकल्प (आराखडे), संख्यात्मक विश्लेषण, खगोलीय भौतिकी इ. बहुविध विषयांत कार्य केलेले होते, असे दिसून येते. त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या आणि ए. डब्ल्यू. बर्क्स यांनी पूर्ण करून संपादित केलेल्या थिअरी ऑफ सेल्फरिप्रोड्युसिंग ऑटोमॅटा (१९६६) या ग्रंथात त्यांनी मानवी तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) अभ्यासातून व्यापक सायबरनेटिक सिद्धांताची (मानवी शरीरातील नियंत्रण तंत्र आणि त्यास अनुसरून तयार केलेले यांत्रिक आणि विद्युत् नियंत्रण तंत्र यांसंबंधीच्या सिद्धांताची) मांडणी करून त्यावरून अधिकाधिक जटिल संगणक तंत्रविद्या प्रगत होईल, असा विचार मांडलेला होता. ते वॉशिंग्टन येथे मृत्यू पावले.

फरांदे, र. कृ.