स्पायरूला : मॉलस्का संघाच्या सेफॅलोपोडा वर्गापैकी डाय-ब्रँकिया गणातील स्पायरूलिडी कुलामधील सागरी प्राण्यांची एक प्रजाती. स्पायरूलाच्या तीनच जाती ध्रुवीय प्रदेशातील आणि उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील समुद्रांत आढळल्या आहेत. स्पायरूला स्पायरूला ही एकमेव अस्तित्वात असलेली जाती आहे. हे प्राणी विरळाच आढळतात, कारण ते सामान्यतः सु. २०० मी. खोलीच्या पाण्यात राहतात. या प्राण्यांचे शरीर ३५ — ४५ मिमी. लांब असते. त्यांना आठ भुजा व दोन लांब संस्पर्शके असतात. चूषकासहित भुजा आणि संस्पर्शके प्रावरणात गेलेली असतात. या प्राण्यांत रेत्रिका नसतात. त्यांच्या डोक्याच्या खाली असलेल्या नळीसारख्या नसराळ्याद्वारे पाण्याची चिळकांडी जोराने बाहेर सोडून ते मागे-पुढे, वर-खाली व काही अंतरापर्यंत आजूबाजूस जाऊ शकतात. या प्राण्यांमध्ये प्रकाश सोडण्यासाठी विशिष्ट अवयव असतो.

स्पायरूलाच्या शरीराभोवती सर्पिल, सप्रकोष्ठ व निनालिका असणारे चूर्णीय कवच असते. ते वजनाने हलके व बळकट असून ॲरॅगोनाइट जातीच्या चुनखडीचे बनलेले असते. हे कवच विशिष्ट अशा प्लावक भागामुळे पाण्यावर तरंगते आणि इतर भाग पाण्याखाली लोंबकळत्या स्थितीत राहतो. हे सर्पिल कवच एका पातळीत दोन ते तीन अलग वेढे असलेले असते. प्रावाराच्या एका जागेतील फटीतून उघडा पडलेला कवचाचा थोडासा भाग वगळला तर बाकीचे सर्व कवच आंतरिक असते. ही कवचे पाण्यावर तरंगत दूरवर जाऊ शकतात, परंतु त्यांच्या जिवंत वा मृत शरीराच्या मऊ भागांचे नमुने अत्यंत दुर्मिळ असतात.

केळकर, क. वा. एरंडे, कांचन